आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक: नक्षलींना हादरा, पण..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षानुवर्षे नक्षलवादाच्या विळख्यात सापडलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि सुरक्षा दलाने केलेल्या धडक कारवाईमुळे नक्षलवाद्यांना मोठाच हादरा बसला आहे. गेल्या तीन दिवसांत जवळपास तीन डझन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

 

नक्षलवादाविरोधातली आजवरची ही सगळ्यात मोठी कारवाई समजली जात आहे. अशा धडाकेबाज पावलांमुळे सुरक्षा यंत्रणांचे मनोबल उंचावते. मात्र, त्याच वेळी आपल्याकडे अनेकदा त्यावर प्रश्नचिन्हसुद्धा उपस्थित केले जातात आणि त्यातून संशयकल्लोळ निर्माण होतो. आताही तसे होण्याची दाट शक्यता आहे. नक्षली विचारधारेची  पाठराखण करणारे बुद्धिजीवी नक्षलवादाची नेहमीची ‘थिअरी’ मांडण्यासाठी पुढे सरसावतील. आर्थिक, भौतिक अथवा सामाजिक विकासाचा वारासुद्धा या ठिकाणी शिवलेला नसल्याने संबंधितांकडे दुसरा पर्याय नसल्याचा युक्तिवादही केला जाईल. पण, तेवढ्यावरच न थांबता यानिमित्ताने प्रस्तुत विषयाची चर्चा अधिक खोलात जाऊन करायला हवी. 

 


पोलिसांच्या ‘सी ६०’ दलाने नुकत्याच केलेल्या कारवाईचा आढावा घेतेवेळी गेल्या काही वर्षांत गडचिरोली परिसरात सुरक्षा दलांनी केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीची पार्श्वभूमी जाणून घ्यायला हवी. ती पाहिल्यास २०१४ पासून पोलिस दलाने नक्षलींना त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. परिणामी पोलिसी कारवाईत या काळात तब्बल पाऊणशेहून अधिक नक्षलींचा खात्मा झाला. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या नक्षल कमांडर्सचा समावेश आहे. आताच्या कारवाईतसुद्धा त्याचाच प्रत्यय येतो आणि या भागातील नक्षलींचे प्रभावक्षेत्र घटत असल्याचेच ते द्योतक म्हणावे लागेल. तसे असेल तर ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण, कोणतीही व्यवस्था रक्ताळलेल्या स्वरूपात फार काळ टिकून राहू शकत नाही. नक्षलींचे समर्थन करणाऱ्या तथाकथित विचारवंतांनी व बुद्धिवाद्यांनी खरे तर नक्षलींना हे पटवून द्यायला हवे. अन्याय होत असेल, दुर्लक्ष होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचे अन्य मार्ग अधिक प्रभावी आणि परिणामकारक आहेत.

 

पण, त्याऐवजी संपूर्ण व्यवस्थाच मोडीत काढणे कुणासाठीही हितावह ठरत नाही आणि नेमका हाच मुद्दा इथे कळीचा बनतो. कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेला आकार देताना जी लोककल्याणकारी व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला त्या व्यवस्थेवरच नक्षलींना विश्वास नाही. शोषित, पीडितांना केंद्रबिंदू मानून तयार केलेल्या या व्यवस्थेत काही त्रुटी दिसल्या किंवा काळानुरूप काही सुधारणा कराव्याशा वाटल्या तर त्यासाठी वैध मार्गांची उपलब्धताही याच व्यवस्थेत समाविष्ट आहे. परंतु, त्याकडे डोळेझाक करत फक्त अन्यायाचे कढ काढण्यातून काहीच हाती लागणार नाही.

 

व्यवस्थेत सुधारणा करायची असेल तर सीपीआय, सीपीएम अथवा तत्सम डाव्यांप्रमाणे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याशिवाय गत्यंतर नाही. अन्य राजकीय मंडळी भ्रष्टाचारी असतील तर सत्तेच्या माध्यमातून व्यवस्था स्वत:च्या हाती घेण्याचा पर्याय नक्षलींकडे आहे. तेव्हा आपल्या प्रभावक्षेत्रातील निवडणुका लढवून नक्षलींनी किमान ग्रामपंचायती जरी ताब्यात घेतल्या तरी बरेच काही साध्य होऊ शकते. त्याउलट केवळ हिंसक क्रांतीचा मार्ग अवलंबला जात असेल तर अंतिमत: तो सगळ्यांसाठीच अहितकारक असेल. हिंसेमुळे भावनांना चटकन हात घालता येतो, पण त्यातून मूळ समस्या मार्गी लागू शकत नाही.

 

हिंसक अतिरेक मग तो हिंदुत्ववाद्यांचा असो, डाव्यांचा असो की अन्य कुणाचा असो, कायमच निषेधार्ह ठरतो. त्या त्या विचारसरणीची पाठराखण करणारे बुद्धिजीवी प्रसंगी हिंसक आंदोलने अथवा चळवळींना वैचारिक मुलामा देऊन बौद्धिक, राजकीय व आर्थिक कुमक पुरवण्याचा प्रयत्न करतात. पण, त्यातून समस्येचे निराकरण कधीच होत नाही. उलट कालांतराने हिंसेची पातळी वाढत जाते आणि मग त्याला उत्तरही त्याच प्रकारच्या कारवाईने देणे भाग पडते. 

 

गडचिरोलीतल्या आताच्या कारवाईलासुद्धा हाच नियम लागू पडतो. या धडक कारवाईमुळे नक्षलींची तूर्त पीछेहाट होणार असली तरी आजवरचा इतिहास पाहता त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होणार हेसुद्धा उघड आहे. तेव्हा ती खबरदारी घेतानाच सकारात्मक आणि समाधानकारक स्वरूपाच्या दीर्घकालीन उपाययोजनांवर अधिक भर देण्याची रणनीती आता सुरक्षा यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांनी अवलंबणे इष्ट ठरेल.

 

- ‌अभिजित कुलकर्णी

डेप्युटी एडिटर, नाशिक

बातम्या आणखी आहेत...