आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत - बांगला संबंधाचा सुवर्णकाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेश नावाचा देश आता गरीब राहिलेला नाही, तो आता विकसनशील देश बनला आहे. त्याचा विकास दर सध्या ७.२८ टक्के आहे. या विकासप्रवासात भारताची साथ महत्त्वाची ठरते आहे. जगात आर्थिक ठसा उमटवणाऱ्या भारताला बांगलादेशासारखे शेजारी मित्र सोबत ठेवावे लागणार आहेत आणि त्यांचेही पोट भरते आहे ना, याची काळजी घ्यावी लागणार आहे. 


भारत जगात दिसतो, त्या बाजूने जगाचा नकाशा पाहिला की आपला शेजारी बांगलादेश जगाच्या मध्यभागी टिकली लावल्यासारखा दिसतो. इंग्रजांनी फाळणी केल्यापासून त्या भागाची वेगळी ओळख झाली असली तरी जनजीवनाचा विचार करायचा तर तो आजही भारताचाच भाग असल्यासारखा आहे. मात्र १९७१ च्या युद्धाने तो पूर्व पाकिस्तान न राहता स्वतंत्र देश झाला. भारताने ते घडवून आणले. त्यामुळे भारत बांगलादेश संबंध तसे चांगलेच राहिले आहेत. मात्र त्या देशात असलेली राजकीय अशांतता, त्या देशाच्या लोकसंख्येची प्रचंड घनता (प्रति चौरस किलोमीटर १२५२, भारत ४२५) आणि भौगोलिक रचनेमुळे पाचवीला पुजलेली नैसर्गिक संकटे, यामुळे आर्थिक विकासाला खीळ बसली आणि तरुणांपुढील संधी कमी झाल्या. त्यात काही कट्टरपंथीय मुस्लिमांनी देशाला बदनाम केले. त्याचा भारतालाही त्रास झाला. देशात पुरेसा रोजगार नसल्याने बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करण्याचे प्रमाण प्रचंड आहे आणि ती भारताची डोकेदुखी झाली आहे. एवढ्याशा या देशात १६ कोटी लोक राहतात, त्यामुळे लोकसंख्येचा विचार करता तो जगातला आठव्या क्रमांकाचा देश आहे. 


बांगलादेश असा असला तरी तो गेली काही वर्षे बदलण्याचा प्रयत्न करतो आहे. चार हजार किलोमीटर एवढी सामाईक सीमा असल्याने भारताला या देशाकडे दुर्लक्ष करता येत नाही. प्रादेशिक समतोल राखण्यासाठी आणि घुसखोरांना रोखण्यासाठी भारताने जे धोरण स्वीकारले आहे, त्याची फळे आता मिळू लागली आहेत. सीमाभागातील वादातील काही गावे बांगलादेशात गेली आणि काही गावे भारतात आली, असे अघटित दोन वर्षांपूर्वी घडले. आणि आता तर दोन्ही देशांचे संबंध अधिकच दृढ होत आहेत. त्याचे कारण मात्र वेगळे आहे. भारताने आर्थिक पातळीवर त्या देशाला जी मदत केली, त्या आधारावर त्याचा विकास दर गेली किमान एक दशक वाढतोच आहे. त्यामुळे बांगलादेश आता जगातील अविकसित देशांच्या यादीतून गेल्या आठवड्यात विकसनशील देशांच्या यादीत आला आहे. जग आज ज्या अर्थकारणाने बांधले गेले आहे, त्याच अर्थकारणाचा वापर करून शेजारी देशांशी शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते, हेच आधुनिक जगाचे तत्त्व भारताने वापरले आहे. 


भारत-बांगलादेश संबंधांचा हा सुवर्णकाळ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश भेटीत म्हटले होते. त्याची प्रचिती अनेक आघाड्यांवर येऊ लागली आहे. भारताला भूतान, नेपाळ आणि बांगलादेशाबाबत मोठ्या भावाची भूमिका निभवायची असून अर्थकारणातून त्याची प्रचिती येऊ लागली आहे. रस्ते बांधणी, रेल्वे, आंतरराष्ट्रीय जलमार्ग आणि जहाज वाहतूक या क्षेत्रात दोन्ही देशांचे सहकार्य वाढले आहे. बंगाली भाषा, रवींद्रनाथ टागोर आणि बंगाली संस्कृती हा धागा दोन्ही देशांना बांधून ठेवतो. रवींद्रनाथ टागोरांचे जन्मगाव कुथीबारी बांगलादेशात आहे, त्यांच्या तेथील घराचे पुनर्निर्माण भारत करणार आहे तर बंधन नावाची वातानुकूलित रेल्वे दोन देशांदरम्यान गेल्या वर्षीच (कोलकाता खुलना) सुरू झाली आहे. हे भावनिक बंध आहेतच, पण अर्थकारणाने हे बंध खऱ्या अर्थाने पक्के होतात, हे भारताने ओळखले आहे. 


अविकसित देश ते विकसनशील देश ही बांगलादेशाची वाटचाल भारतासाठी अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे. एका दशकात सातत्याने सहा टक्क्यांपेक्षा अधिक विकास दर साध्य केल्यामुळे जगाच्या दृष्टीने बांगलादेश आता विकसनशील देश झाला आहे. भारताने बांगलादेशातील गुंतवणूक जाणीवपूर्वक वाढवली आहे. किफायतशीर दरांत पतपुरवठा, बांगलादेशातील काही उत्पादनांना बाजारपेठ आणि व्हिसा नियमांत सुलभता अशा मार्गाने भारत जातो आहे. भारत बांगलादेशाला आठ अब्ज डॉलरचा पतपुरवठा करतो. त्याशिवाय त्या देशातील पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि रेल्वे क्षेत्रासाठी अनुदान देतो. भारतातील उद्योगांनी विशेषतः ऊर्जा क्षेत्रात १३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. भारतातच अनेक ठिकाणी पतपुरवठ्याची आणि गुंतवणुकीची गरज असताना बांगलादेशात ती का केली जाते, हा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो. पण तो गैरलागू आहे. कारण शेजारी देशात गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रादेशिक समतोल राखणे, त्या देशातील आर्थिक विकासाचे फायदे मिळवणे हा व्यापक आणि दीर्घकालीन धोरणाचा भाग असतो. जगातील प्रत्येक देश सध्या हे करतो आहे. विशेषतः भारतीय उपखंडात चीनचा प्रभाव वाढू द्यायचा नसेल तर हे करणे क्रमप्राप्त आहे, हे समजून घेतले पाहिजे. अमेरिका किंवा इतर प्रगत देश भारतातील गुंतवणुकीकडे जसे पुढील संधी म्हणून पाहतात, तसेच हे आहे. जपानने भारताला किरकोळीत ९० हजार कोटी रुपये कर्ज बुलेट ट्रेनसाठी दिले. अशा देवघेवीत दोन्ही देशांचे हितसंबंध असतात. जपानला आपले तंत्रज्ञान भारताला विकायचे आहे, तर भारताला विकासासाठी भांडवल वापरायला मिळते आहे, रोजगार संधी वाढत आहेत. त्यामुळे अशा व्यवहाराविषयी कितीही वाद झाले तरी अर्थकारण पुढे जाते, असा आधुनिक जगाचा अनुभव आहे. बांगलादेशातील भारतीय गुंतवणुकीचा हा एक पैलू आहे. 


जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत हा जसा सर्वाधिक विकास दर असलेला देश आहे, तसाच बांगलादेश पुढील विकसनशील देशाच्या यादीतील सर्वाधिक विकास दर असलेला (७.२८ टक्के) देश झाला आहे. गारमेंट निर्यातीत जगात दुसरा क्रमांक, आऊटसोर्सिंगमध्ये जगात तिसरा, तांदूळ उत्पादनात जगात चौथा, गोड्या पाण्यातील मासे उत्पादनात जगात पाचवा, जगाला काम करणारी माणसे (कायदेशीर) पुरवणारा जगातील पाचवा देश, आठव्या क्रमांकाचा रिमिटन्स स्वीकारणारा आणि अन्नधान्य उत्पादनात जगात दहाव्या क्रमांकाचा असा हा बांगलादेश. तो आज भारतापेक्षा गरीब असला तरी त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही, त्याची एवढी काही कारणे पुरेशी आहेत. भारतासारखी डिजिटल क्रांती त्याने हाती घेतली असून भारताचा अनुभव त्याला उपयोगी पडतो आहे. ते तंत्रज्ञान तो भारताकडून घेतो आहे. सध्या ६०० मेगावॅट विजेची देवाणघेवाण होते आहे आणि ती लवकरच १००० मेगावॅटपर्यंत जाणार आहे. भारतासाठी हे दोन कारणांनी महत्त्वाचे आहे. एक तर भारताचा ईशान्य भागाला जाण्यासाठी अख्खा बांगलादेश मध्ये आहे. त्यामुळे बांगलादेशातील प्रवेश भारताच्या फायद्याचा आहे, तर भारतात वीजनिर्मितीची क्षमता एवढी वाढणार आहे की त्याला बांगलादेशासारख्या ग्राहकाची गरज पडणार आहे. बंगालच्या उपसागरात तेल उत्खनन करण्यासाठी भारताची सरकारी कंपनी ओएनजीसी बांगलादेशाला मदत करते आहे. ग्रीन एनर्जी आणि अणुऊर्जा निर्मिती सहकार्याचे बांगलादेशाने भारताशी करार केले आहेत. गॅस उत्पादन आणि वितरणासंबंधी पेट्रोनेट कंपनी तेथे काम करते आहे. स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९४७ पूर्वी जे जलमार्ग खुले होते, ते मार्ग पुन्हा खुले झाले पाहिजेत, असा प्रयत्न भारत करतो आहे. एवढे सगळे होत असूनही चीनची आर्थिक ताकद एवढी प्रचंड आहे की चीनचा बांगलादेशाशी व्यापार १६ अब्ज डॉलर आहे तर भारताचा १० अब्ज डॉलर. पण भौगोलिक सलगता लक्षात घेता भारताशी आर्थिक संबंध बांगलादेशाच्या अधिक फायद्याचे आहेत. त्यामुळेच बांगलादेशाकडून भारतीय पुढाकाराला गेले काही वर्षे चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 


जागतिकीकरणानंतर जागतिक व्यापार प्रचंड विस्तारला आहे. त्यातील स्पर्धा आणि त्यावरून सध्या चालू असलेले कुरघोडीचे राजकारण सध्या पाहायला मिळते आहे. मात्र ग्राहक आणि क्रयशक्ती असलेल्या भारत आणि बांगलादेशासारख्या देशांना परस्पर सहकार्यातूनच पुढे जावे लागणार आहे. 

 

- यमाजी मालकर 
ymalkar@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...