आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहो आश्चर्यम्! (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक सीमा, एक भाषा, एक वंश असलेल्या दोन देशांतील कमालीचे, कट्टर शत्रुत्व संपुष्टात आणायचे असेल तर त्यासाठीची राजकीय पातळीवरची शिष्टाई ही प्रत्यक्ष युद्धनीतीसारखी गुंतागुंतीची असते. कारण अशा शिष्टाईमध्ये संशय, मत्सर निवळण्यासाठी शब्दांचे खेळ करावे लागतात, सलोख्याचे वातावरण तयार करण्यासाठी कोणाची तरी वा पडद्यामागून मध्यस्थी घ्यावी लागते. उभय देशांमधील जनभावनांचा अंदाज घ्यावा लागतो.

 

त्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागतो. उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया हे १९५३ पासून परस्परांचे कट्टर शत्रू. दोघांच्या सीमारेषांमधून पाखरूही जात नव्हते. दोन्ही देश नेहमी युद्धाच्या पवित्र्यात. एक देश कट्टर कम्युनिस्ट, तर दुसरा पक्का भांडवलवादी. एका देशाकडे अणुबाँब, थेट अमेरिकेवर हल्ला करू शकतील अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, तर दुसऱ्याच्या संरक्षणासाठी अमेरिकेचे लष्कर सतत सज्ज. दोघांच्या सागरी क्षेत्रात युद्धनौका सतत कार्यरत.

 

असे शत्रुत्व असलेल्या या दोन देशांत एकाएकी शांततेच्या वाटाघाटी होतील, प्रमुख नेत्यांमध्ये हस्तांदोलन होईल, संपूर्ण द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त करण्याची घोषणा केली जाईल, याची खात्री जगाला नव्हती. कोणत्याही राजकीय पंडितांनी, सामरिक विश्लेषकांनी, पाश्चात्त्य वर्तमानपत्रांनी वा वृत्तवाहिन्यांनी उत्तर कोरियाचा वादग्रस्त हुकूमशहा किम जोंग उन स्वत:च्या पावलांनी दक्षिण कोरियाची सीमा ओलांडून त्या देशाचे अध्यक्ष मून-जे-इन यांच्याशी हस्तांदोलन करेल व दोन्ही देशांमध्ये कायमची शांतता स्थापन व्हावी या उद्देशाने करार करेल, असा अंदाज वा भाकीत वर्तवले नव्हते.

 

मात्र, हुकूमशहाच्या इतिहासातल्या प्रतिमेला छेद देत किम जोंग-उन यांनी चक्क उत्तर कोरिया-दक्षिण कोरियाच्या घट्ट मैत्रीची, कोरियन सामर्थ्याची भाषा केली. शुक्रवारी जेव्हा जगाने या दोन देशांच्या मैत्रीचा सोहळा पाहिला तेव्हा हे जग अण्वस्त्रमुक्ततेच्या दिशेने एक पाऊल पुढे गेले, असे म्हणावयास पाहिजे, जे अविश्वसनीय होते, अकल्पित होते. युद्धाने, भडक वक्तव्यांनी, धमक्यांनी  कोणतेच प्रश्न सुटत नाहीत, हे शहाणपण सहा दशकांनंतर दोन्ही देशांना समजले. ही जगाच्या इतिहासात अभूतपूर्व-ऐतिहासिक, अहो आश्चर्यम् अशी घटना आहे. 

 

हा चमत्कार एकाएकी घडला कसा, हा प्रश्न उपस्थित होतोच. कारण गेल्या महिन्यात द. कोरियात हिवाळी ऑलिम्पिक झाले होते. या ऑलिम्पिकला उ. कोरियाने आपला संघ पाठवला. पण या संकेतातून उभय देशांचे प्रमुख एकमेकांना भेटतील याची शक्यता कोणीच वर्तवली नव्हती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व किम जोंग-उन यांनी गेल्या वर्षी एकमेकांना भरपूर धमक्या दिल्या होत्या. या काळात उ. कोरियाने अमेरिकेतील शहरांचा वेध घेतील अशा क्षेपणास्त्रांच्या चाचण्याही घेतल्या. या चाचण्यांमुळे वातावरण इतके चिघळले होते की अमेरिकेच्या युद्धनौका कोरिया द्वीपकल्पात हाय अलर्टवर गस्त घालू लागल्या. अशा तणावाच्या वातावरणात उ. कोरिया अधिक आक्रमक होईल, अशाच अटकळी बांधल्या जात होत्या. यात एक घटना अशी घडली की, उ. कोरियाने लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागण्याचे तंत्रज्ञान आपण संपूर्णपणे विकसित केले असून ही मोहीम यापुढे नेण्याची इच्छा नसल्याचे जाहीर केले आणि या निर्णयानंतर उ. कोरियाची धमक्यांची भाषा निवळू लागली.

 

आता या शांतता करारामागील राजकीय मांडणी अशी केली जातेय की, अमेरिकेचे कोरियन द्वीपकल्पातील महत्त्व कमी करण्यासाठी उ. कोरियाने द. कोरियाशी हात मिळवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उ. कोरिया एक अण्वस्त्रधारी देश आहे, असे स्टेटस या देशाला अमेरिकेकडून मिळेल, शिवाय अण्वस्त्र कमी करण्याचा वा कोरियन द्वीपकल्प संपूर्ण अण्वस्त्रमुक्त करण्याचा निर्णय आपल्या पुढाकाराने घेतल्याची सकारात्मक प्रतिमा जगापुढे जाईल, अशी किम जोंग-उन यांची नीती आहे.

 

किम जोंग-उन यांची शांतता प्रस्थापित करणारी ही राजकीय शिष्टाई संशयाने पाहिली जाईल; पण जगाला एक दिलासा मिळाला आहे की, दशकानुदशके जपलेले शत्रुत्व या दोन देशांनी स्वत:च्या प्रगतीसाठी झिडकारले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उ. कोरियाने द. कोरियाशी संवाद साधण्यासाठी रस्ते व रेल्वे मार्गांना मंजुरी दिली. या निर्णयाने तुटलेला कोरियन समाज पुन्हा मैत्री, प्रेमाने जोडला जाईल. या जगाने बर्लिनची भिंत उद्ध्वस्त होत जर्मनीचे एकीकरण पाहिले आहे व नव्या जर्मनीची उत्तुंग झेपही पाहिली आहे. या घडीला उ. कोरिया व द. कोरियाचे एकीकरण होईल की नाही हे सांगता येणार नाही, पण कोरिया नावाची एक आर्थिक महासत्ता आपल्या आशिया खंडात जन्मास आली आहे, तिचे स्वागत केले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...