आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोखणारे राजकारण (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय शिक्षा वर्षाच्या निमित्ताने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे गुरुवारचे भाषण काँग्रेसला चक्रावून टाकणारे ठरले. कारण प्रणवदा यांना संघाने आमंत्रण दिल्याने काँग्रेसमध्ये एकाएकी अस्वस्थता पसरली होती. आजच्या घडीला प्रणवदा यांच्यासारखा कुशल व देशाचे राजकारण पाच दशके जगलेला आणि काँग्रेस विचारधारेच्या मुशीत घडलेला नेता संघाच्या व्यासपीठावर जाणे हे काही काँग्रेसजनांना रुचलेले नव्हते.

 

प्रणवदांनी संघाच्या व्यासपीठावर जाऊन कितीही सेक्युलर, सर्वधर्मसमभाव, बहुसांस्कृतिकतेचे समर्थन केले तरी संघाच्या भूमिकेत तिळमात्र फरक पडणार नाही असा काहींचा आक्षेप होता. पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी ट्विट करून ज्यांना ऐकण्याची, आत्मसात करून बदलण्याची इच्छा असते त्यांच्याशी चर्चा केली जाते. आरएसएस आपल्या मुख्य उद्देशापासून केव्हाच दूर गेली आहे असे म्हटले. तर प्रणवदा यांची मुलगी शर्मिष्ठा यांनीही आपल्या वडिलांनी संघाच्या व्यासपीठावर जाऊन भाजपवाल्यांना खोट्या बातम्या व अफवा पसरवण्याची संधी दिली, अशी खंत व्यक्त केली होती.

 

काही ज्येष्ठ काँग्रेसजनांनी प्रणवदा संघाच्या व्यासपीठावर नेमके काय बोलतील त्यानंतर प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल, असा पवित्रा घेतला. पण वास्तविक प्रणवदा यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर जर तरच्या गोष्टींना अर्थ उरला नव्हता. त्यांनी वाद वाढताच स्पष्ट केले की जे मला बोलायचे आहे ते मी तेथे जाऊन बोलेन! त्यामुळे प्रणवदा संघाचे कान टोचतात की संघाला शरण जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.  


प्रणवदा यूपीए-२ सरकारमध्ये अर्थमंत्री असताना राजकारणही सांभाळायचे. त्यांचा सर्वच पक्षांशी चांगला संवाद असल्याने ते यूपीए सरकारला राजकीय कोंडीतून बाहेर काढत असत. पण त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की यूपीए-२ सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपाने घायाळ झाले असताना, मंत्र्यांना मंत्रिपद सोडावे लागत असताना भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप प्रणवदांवर ना भाजपने लावले होते ना मोदींनी. त्यानंतर जेव्हा राष्ट्रपतिपदी प्रणवदा यांची निवड झाली व २०१४ मध्ये मोदींचे सरकार सत्तेवर आले तेव्हा दोघांचे समीकरण उत्तम होते.

 

दोघांनीही एकमेकांची स्तुती केल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा प्रणवदांबद्दल संघात आदरच होता. त्यात पंतप्रधानपद न मिळाल्याने प्रणवदा दुखावले असून ते काँग्रेस पक्षापासून (काँग्रेस विचारधारा नव्हे) दूर गेले आहेत, याचीही जाणीव संघाला होती. त्यामुळे अशा व्यक्तीला संघाच्या व्यासपीठावर बोलावणे त्यांनी पसंत केले.    


प्रणवदांनी केलेले भाषण सरसंघचालकांच्या भाषणाचे वेगळे रूप होते असे आता म्हटले जात आहे. पण हे भाषण कोणीही कोणत्याही अंगानेही मांडू शकतो. मुळात सध्याच्या राजकारणात संघाची समरसता विरुद्ध सेक्युलरवाद्यांची समता, संघाचा देशी राष्ट्रवाद विरुद्ध काँग्रेसचा वैश्विक राष्ट्रवाद, संघाचे सांस्कृतिक राजकारण विरुद्ध या देशाचा बहुसांस्कृतिकवाद असा तात्त्विक संघर्ष सुरू आहे. या विषयाचा परीघ इतका व्यापक आहे की राष्ट्रपतिपद भोगून झालेला एक नेता संघाच्या मंचावर जाऊन संकुचित विचारधारांचे समर्थन करू शकतो, असा अंदाज व्यक्त करणे मूर्खपणाचे होते. प्रणवदा आता काँग्रेसचे नेते नाहीत.

 

माजी राष्ट्रपती असल्याने ते राजकीय शिष्टाचारानुसार काँग्रेस पक्षाच्या दैनंदिन राजकारणाचे भाग होऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रणवदांपुढे भारताच्या राष्ट्रपतीला जी घटनात्मक शपथ घ्यावी लागते त्याला स्मरून आपली वैचारिक राजकीय भूमिका मांडण्याचे बंधन होते. तर दुसरीकडे संघाने काँग्रेसमधील घायाळ नेता आपल्या मंचावर आणून हुशारी दाखवली. त्यांना याची नक्कीच जाणीव होती, की या देशाचा माजी राष्ट्रपती संघाच्या राजकारणाची तोंडभरून स्तुती करणे शक्य नाही. एकुणात संघाला देशाच्या राजकारणात आलेले स्थान अनेक अंगांनी प्रस्थापित करून दाखवायचे आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्रणवदा यांना आमंत्रण दिले. तर प्रणवदा यांना माजी राष्ट्रपती म्हणून देशाच्या राजकारणात असलेल्या अन्य विचारधारांना टाळणेही शक्य नव्हते. त्यात संघाची देशात अप्रत्यक्ष सत्ता सार्वत्रिक निवडणुकांमधून आली असल्याने त्या सत्तेचे निमंत्रण धुडकावून लावणे हे शिष्टसंमत नव्हते.

 

त्यामुळे संघाचे निमंत्रण स्वीकारत त्यांच्या मंचावर जाऊन प्रणवदा यांनी संघाच्या संकुचित राष्ट्रवादाला देशभक्ती ही कोणाची मक्तेदारी नाही असे खडे बोल सुनावले. या देशाला भूगोल, भाषा, धर्म-पंथाची चौकट नाही. भारतीय राष्ट्रवादामध्ये विविधता आहे, हा राष्ट्रवाद म्हणजे वसुधैव कुटुंबकम्’ ही नेहरूंची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. एकूणच परवाचे राजकारण दोन्ही बाजूंनी होते, एकमेकांचा कस पाहणारे व तुल्यबळ व्हावे असाही प्रयत्न होता. प्रणवदा यांनी हा खेळ चांगलाच पेलला.

बातम्या आणखी आहेत...