Home | Editorial | Agralekh | divya marathi article on vidhan parishad election

नेतृत्वाची नामुष्की (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - May 05, 2018, 02:00 AM IST

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विधान परिषदेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य सत

 • divya marathi article on vidhan parishad election

  विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विधान परिषदेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य सत्ताधाऱ्यांसाठी त्यातही भाजपसाठी भलतेच डोकेदुखी ठरले आहे. त्यामुळे परिषदेतले संख्याबळ वाढवण्याची संधी भाजप सोडणार नाही. शिवसेनेलाही ताकद दाखवून द्यायची आहे. समोरून दोन्ही काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप या दोघांनीही समयसूचकता दाखवत व्यावहारिक भूमिका घेतली.


  काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमक्या याच स्थितीचे भाकीत केले होते. त्याचा प्रत्यय एवढ्या लवकर येईल असे वाटले नव्हते. सरकारच्या नावाने बोटे मोडल्याशिवाय सेना नेतृत्वाचा दिवस ढळत नाही. स्वतःचा पक्ष सत्तेचा वाटेकरी आहे याचाही विसर पडल्याप्रमाणे सध्याचे सरकार सर्वात निकम्मे असल्याचे मत शिवसेना नेतृत्व वारंवार व्यक्त करत असते. भाजपसोबत सरकारमध्ये राहण्याची जराही इच्छा नसल्याची जपमाळ याच नेतृत्वाकडून अहोरात्र ओढली जात असते.

  भाजपबद्दलचा प्रचंड तिटकारा न कंटाळता, सार्वजनिकरीत्या व्यक्त करण्याचा शिवसेनेचा अखंड उत्साह वाखाणण्याजोगाच आहे. तरीही मित्रपक्षाबद्दल एवढा तिरस्कार बोलून दाखवणारी शिवसेना सत्ता का सोडत नाही, असा प्रश्न मात्र अलीकडे जनतेच्या मनात येईनासा झाला आहे. कारण शिवसेनेला कोणी गांभीर्याने घेईनासे झाले आहे. एका वृत्तपत्राने आणि वृत्तवाहिनीने मिळून नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणामधून हीच बाब स्पष्ट झाली. आता निवडणूक झाल्यास मत कोणाला, या प्रश्नावर शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. पुढचा मुख्यमंत्री कोण असावा, यावर सर्वाधिक लोकांची पसंती देवेंद्र फडणवीसांना मिळाली. येथेही उद्धव ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल विचारले तर सेनेच्या मंत्र्याला मिळालेली सर्वाधिक मते होती अवघी दोन टक्के. या सगळ्याचा अर्थ काय तर शिवसेनेबद्दलचा विश्वास जमीनदोस्त होतो आहे. राजकीय वर्तुळात विनोदाचा विषय बनत चाललेली शिवसेना लोकांच्या मनातूनही उतरत चालली आहे. वास्तविक ठाम मते, ठोस भूमिका हे बाळासाहेब ठाकरेंचे बलस्थान होते.

  शिवसेनेची लोकप्रियता वाढण्यामागे बाळासाहेबांच्या रोखठोक निर्णयक्षमतेचा प्रभाव मोठा होता. ‘जे बोललो तो बोललो, माघार नाही,’ या पद्धतीने ‘एक घाव दोन तुकडे’ करणारे बाळासाहेब शिवसैनिकांना आवडत. या तुलनेत उद्धव ठाकरेंनी सध्याच्या भाजप सरकारवर, पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांवर कितीदा आगपाखड केली, साथ सोडण्याची बात केली याची गणती ठेवणेही आता मुश्कील झाले. राजीनामे खिशात असल्याच्या शिवसेना मंत्र्यांच्या वक्तव्याची तर अजूनही यथेच्छ चेष्टा होते.  खरे तर भाजपबद्दलचा तीव्र असंतोष व्यक्त करण्याची चांगली संधी विधान परिषद निवडणुकीने शिवसेनेला दिली होती. काय झाले असते? फार तर तीन जागी पराभव झाला असता. पण त्या बदल्यात शिवसेनेबद्दलची विश्वासार्हता कितीतरी पटीने वाढली असती. सन २०१४ मध्ये यापेक्षा मोठी संधी शिवसेनेपुढे चालून आली होती. विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढल्यानंतर सरकार स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ भाजपकडे नव्हते. त्या वेळी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतरच्या काही तासांतच शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन केले. स्वतंत्र बाणा दाखवत पंचवीस वर्षांची युती तोडण्याचा जो धडाका शिवसेनेने दाखवला तीच हिंमत सरकारमध्ये सहभागी न होण्यासाठीही दाखवली गेली असती तर आज शिवसेनेच्या लोकप्रियतेची उंची वेगळी असती. पण या दोन्ही प्रसंगी शिवसेनेने कच खाल्ली. याचे कारण एकच - पक्षातले आमदार, कार्यकर्ते, नेते दुरावण्याची शंका. पक्ष फुटण्याची भीती. भाजपच्या अामिषांपुढे शिवसेनेचा गड अभेद्य राहीलच याची खात्री उद्धव ठाकरेंना वाटत नाही. दुसरीकडे भाजपलाच याची एवढी हमी असावी की शिवसेनेकडे दुर्लक्ष करणे त्यांना जड जात नाही. अगदी अलीकडे सुधीर मुनगंटीवारांनीही सांगून टाकले, ‘शिवसेनेची इच्छा नसल्याने यापुढे आमच्याकडून युतीची चर्चा बंद.’ शिवसेनेच्या वाघाचे शेपूट इतक्यांदा यापूर्वी कोणी पिरगाळले नाही.

  विधान परिषदेच्या तीन जागांसाठीही शिवसेना स्वबळ आजमावून पाहण्याचे धाडस दाखवू शकत नाही. पुढच्या वर्षी काय होणार याची ही नांदी मानता येईल. संख्याबळामुळे युतीतले थोरलेपण २०१४ मध्येच भाजपकडे गेले. आता शिवसेनेच्या कचखाऊ भूमिकांमुळे आब राखणेही शिवसेनेला जमेना. माफक शब्द आणि वर्मी लागणाऱ्या कृतीच्या आधारे ताकद नसतानाही मित्रपक्षाच्या गोटात धास्ती कशी निर्माण करता येते हे कसब शिवसेनेने शरद पवारांकडून शिकून घ्यावे. युती करावी लागण्यात नामुष्की नसते. परंतु मित्रपक्षाच्या अटी-शर्थींमुळे, दबाव-डावपेचांमुळे करावी लागणे हे पक्ष नेतृत्वाचे अपयश असते.

Trending