आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाल शहाणपण (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण कम्युनिस्ट पार्टी अंकित करून शी जिनपिंग यांनी स्वत:ला चीनचे तहहयात अध्यक्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर असे वातावरण तयार झाले होते की चीन अधिक आक्रमक होईल व आपल्या शेजारी राष्ट्रांशी, विशेषत: भारताशी तो दुजाभाव करू लागेल. प्रत्यक्षात गेल्या आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शी जिनपिंग यांच्यात जी अनौपचारिक चर्चा झाली, त्यावरून स्पष्ट लक्षात येते की, चीनला भारताशी कोणत्याच प्रकारचा दीर्घ स्वरूपाचा संघर्ष करण्याची इच्छा नाही किंवा त्यांना सीमाप्रश्न अधिक ताणण्याचीही गरज वाटत नाही. 

 

चीनचे तसे काही हेतू असते तर डोकलाम विषयावर त्यांनी भारताची संपूर्ण बाजू ऐकून घेतली नसती, सहकार्याचा हात पुढे केला नसता. महत्त्वाची बाब अशी की, डोकलाम असो वा अन्य ठिकाणचा भारत-चीन सीमाप्रदेश असो, येथे कोणताही तणाव वाढू नये, अशा स्पष्ट सूचना उभय देशांनी आपापल्या सैन्याला द्याव्यात, दोहोंमध्ये मार्गदर्शन-संवादाचे मार्ग तयार व्हावेत यावर मोदी-जिनपिंग यांनी शिक्कामोर्तब केले. हे अविश्वसनीय आहे. मोदींच्या या दौऱ्यात औपचारिक असे कागदावर करार झाले नाहीत, पण जगातली एक आर्थिक व लष्करी महासत्ता असलेल्या चीनने -जी अमेरिकेशी आता व्यापाराच्या पातळीवर थेट संघर्षांच्या भूमिकेत आहे तिने - भारताचे आशिया खंडातील एकूण महत्त्व ओळखले. मोदींचा हा चीन दौरा भारताला फायद्याचा ठरला तो आणखी एक कारणाने - अफगाणिस्तानच्या आर्थिक विकास योजनांमध्ये चीनने भारताशी सहकार्य करण्याचा निर्णय घेऊन पाकिस्तानला चांगलाच धोबीपछाड दिला. वास्तविक अफगाणिस्तानच्या आर्थिक विकास कार्यक्रमात चीन सामील झाल्याने भारताला बचावात्मक पावले घ्यावी लागतील, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 

 

पण भारताने आपले अफगाणिस्तान धोरण नेटाने लावून धरले व त्याची फळे आता मिळू लागली आहेत. गेली पाच-सहा वर्षे पाकिस्तानचे भारताला येनकेन प्रकारे अफगाणिस्तानातून हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काबूल येथील भारतीय वकिलातींवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना पाकिस्तानचा छुपा पाठिंबाही आहे. पण भारत-पाकिस्तानचा वाद अफगाणिस्तानच्या भूमीवर ज्या पद्धतीने खेळला जातो त्याची झळ चीनला बसत होती. त्यात चीन पाकिस्तानचा मित्र असल्याने भारताला अफगाणिस्तानच्या आर्थिक विकास कार्यक्रमात चीनच्या हेतूंबद्दल संशय होताच. अफगाणिस्तान धुमसता ठेवला तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतात हे वास्तव चीनला त्यांचा वन बेल्ट वन रोड प्रकल्प रेटताना लक्षात येऊ लागल्याने त्यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. आशिया खंडाला विकासाच्या पथावर नेताना भारत-पाकिस्तान-अफगाणिस्तान या त्रिकोणाची आर्थिक बाजारपेठ चीनला महत्त्वाची वाटते. त्यामुळे भारताविरोधात अफगाणिस्तानात ज्या कुरापती पाकिस्तान काढत आहे, त्याला राजनैतिक पातळीवर स्पष्ट उत्तर देणे चीनला महत्त्वाचे वाटत होते.

 

 त्यातून चीन हा भारताशी गरज पडल्यास मैत्रीचा हात देऊ शकतो, असा एक पर्याय, किंबहुना दणका त्यांना पाकिस्तानला द्यायचा होता. तो त्यांनी दिला. भविष्यात भारत-पाकिस्तानने चर्चेस यावे, असाही दबाव चीन आणू शकतो. 


यापूर्वी शी जिनपिंग यांनी केवळ ओबामा व ट्रम्प यांच्याशी असा अनौपचारिक संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी मोदींना औपचारिक भेटीसाठी बोलावून घेतले. याला अन्य काही आंतरराष्ट्रीय कारणेही आहेत. या कारणातील एक म्हणजे अमेरिकेच्या विरोधात चीनचे जे व्यापारयुद्ध सुरू आहे त्याने चीनचीही आर्थिक कोंडी होत आहे. आशिया उपखंडात भारताची मोठी बाजारपेठ हाच एकमेव पर्याय चीनपुढे उभा आहे. अमेरिकेशी दोन हात करताना इतर देशांना जवळ करणे ही चीनची अपरिहार्यता आहे. भारताला चीनशी वाढणारे आर्थिक-सांस्कृतिक सहकार्य फायद्याचे आहे. सीमेवर रोजचा संघर्ष व लष्करावरचा वाढता खर्च ही भारताची डोकेदुखीच आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात भौगोलिक सीमांना महत्त्व देण्यापेक्षा व्यापारवृद्धींवर लक्ष दिले जाते. भारताची बाजारपेठ मोठीच आहे, पण हा देश अमेरिकेच्या जवळ जात असल्याचे संकेत यापूर्वी चीनपर्यंत दिले जात होते. मात्र आता भारत स्वत:चे हितसंबंध राखण्यासाठी चीनशीही मैत्रीचे पूल बांधू शकतो, असे संदेश जगापुढे जाण्याची गरज होती. ते मोदींच्या चीन दौऱ्यातून साध्य झाले. या घडामोडीत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहंमद व संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत भारताला चीनकडून अपेक्षित असलेला सदस्यत्वासाठीचा पाठिंबा हे विषय चर्चेस आले नाहीत. पण चीनने ‘वन बेल्ट वन रोड’वर भारतावर दबाव आणणार नाही असे स्पष्ट केले, हे एकुणात चीनला आलेले शहाणपण आहे.

 

बातम्या आणखी आहेत...