आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आडमुठी शिवसेना ( अग्रलेख )

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोकणात नाणार येथे होऊ घातलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला खोडा घालण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या आडमुठ्या राजकारणाला धरून हे सर्व होत आहे. शिवसेनेच्या विरोधामागे ना अभ्यास आहे, ना कोकणवासीयांची खरीखुरी काळजी. भाजपला विरोध करून आपले अस्तित्व दाखवून देण्याची केविलवाणी धडपड यापलीकडे या प्रयत्नांना किंमत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात ज्या मिजाशीत कमळाबाई म्हणून भाजपची थट्टा होत होती, ती मिजास मोदींसमोर संपली. भाजपने निवडणुका जिंकत मुंबईत तोडीस तोड जागा मिळवल्या. तेव्हापासून भाजपबरोबर जायचे नाही या निश्चयावर सेना नेते आले. पण सत्तेचा लोभ सुटत नसल्याने सत्तेत राहून आक्रमक विरोधी पक्ष होण्याचे नवे राजकारण सेनेने सुरू केले. महापालिका निवडणुकीनंतर भाजप अधिक आक्रमक होईल, असे सेनेला वाटत होते. 

 

पण देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय शहाणपण दाखवून संयमाचे धोरण ठेवले. युती नाही, असे उद्धव ठाकरे म्हणत असले तरी परिस्थिती युती करण्यास भाग पाडेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते खरेही आहे. युती झाली नाही तर भाजपपेक्षा शिवसेनेचे अधिक नुकसान होईल यात शंका नाही. सध्या विरोधात असलेली सेना शेवटी युती करणार, असा अप्रत्यक्ष प्रचार भाजपकडून सुरू झाल्यावर अस्वस्थ सेना अधिक आक्रमक झाली. नाणार प्रकल्पाला विरोध हा त्यातील एक अध्याय आहे.


मात्र, अभ्यास करून विरोध करण्याचा सेनेचा स्वभाव नाही. देशहित, आर्थिक व व्यूहात्मक फायदा याचा सारासार विचार करण्याची पद्धत नाही. कोकणची जनताही प्रामाणिक पण भावनेवर चालणारी. विरोध करण्यात कोकणवासीयांचा हात कोणी धरू शकत नाही. प्रामाणिक असल्यामुळे पैशाचा सोस नाही आणि दुसऱ्याला बुडवण्याचीही वृत्ती नाही. सरकारी वसुली सर्वात चांगली फक्त कोकणात होते, हा कोकणी माणसाच्या स्वच्छ मनाचा पुरावा आहे. यामुळेच देशासाठी एखादी गोष्ट आवश्यक असेल तर ती घडवून आणण्यासही कोकण मागे राहणार नाही. मात्र, त्यासाठी कोकणवासीयांशी संवाद साधला पाहिजे आणि त्यांचा भरभक्कम फायदा होईल अशा प्रकारे भरपाई दिली गेली पाहिजे. देशहित साधत असेल, रोजगार वाढत असेल तर सरकारबरोबर फायदेशीर वाटाघाटी करून जास्तीत जास्त फायदा स्थानिक जनतेच्या पदरात पाडून घेतला पाहिजे.

 

 जामनगर प्रकल्पात गुजराती जनतेने ते केले. कोकणवासीही तसे करू शकतात. मात्र, त्यासाठी शिवसेना पुढाकार घेणार नाही. कारण वाटाघाटी, देवाणघेवाण, भविष्यकालीन योजना असल्या गोष्टी शिवसेनेला झेपत नाहीत. त्यात सेनेचा फायदाही नाही. नाणार येथे येऊ घातलेल्या प्रकल्पाची व्याप्ती पाहता त्यामध्ये स्थानिकांना गुंतवणूक करण्याची संधी शिवसेनेने मिळवून दिली तर प्रकल्पग्रस्तांच्या कित्येक पिढ्या सुखाने नांदतील. जगात असे करार झाले आहेत. शिवसेनेला हे जमत नाही तसेच भाजपचे नेतेही अशा वाटाघाटींमध्ये लक्ष घालत नाहीत. आंदोलनकर्ते आपल्याकडे भरपूर असतात. माध्यमांमध्ये झटपट प्रसिद्धी मिळवण्याचे ते उत्तम साधन असते. आंदोलनाची धुळवड उठवून नव्या योजनांना आडकाठी घालून आपले नेतृत्व सिद्ध करायचे ही सवय भारतीयांच्या अंगी मुरलेली आहे. व्यावसायिक वाटाघाटी करून फायदेशीर व्यवहार करण्याची धडपड केली जात नाही. पुण्याजवळ मगरपट्ट्यात असा प्रयोग झाला व तेथील लोकांची श्रीमंती कित्येक पटींनी वाढली. पण तसा प्रयोग अन्यत्र झाला नाही.  नाणार प्रकल्पामुळे परकीय तेलावरील आपले अवलंबित्व निम्म्याने कमी होणार आहे आणि तेल क्षेत्रातील मक्तेदारी संपून स्पर्धेला वाव मिळणार आहे. या एकाच गोष्टीसाठी या प्रकल्पाचे स्वागत केले पाहिजे. अन्य अनेक उत्पादने मिळतील ती वेगळीच. सौदी अरेबियाची अाराम्को कंपनी फक्त भारतातच नव्हे, तर चीन, इंडोनेशिया अशा देशांतही करार करत आहे. भारताने कच खाल्ली तर चीन व अन्य देश झपाट्याने आपले प्रकल्प पुरे करतील व तेलासाठी उद्या चीनच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ भारतावर येईल. सौदीतून कच्चे तेल आणण्यासाठी कोकण हा जवळचा पट्टा आहे आणि प्रकल्पाच्या सध्याच्या नियोजित जागेवर वस्तीही फार नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानात पर्यावरणाचा कमीत कमी नाश होतो. जैतापूरप्रमाणेच नाणार प्रकल्पाचे अनेक फायदे आहेत, त्याचा तपशील इंटरनेटवर उपलब्ध आहे. महाराष्ट्रासह देशाचे अर्थशास्त्र गतिमान करण्यासाठी हे प्रकल्प लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र, या प्रकल्पातून मिळणाऱ्या लाभामध्ये स्थानिकांना वाटा मिळाला पाहिजे. त्यासाठी वाटाघाटी हव्यात. शिवसेनेला ते करणे जमणार नसेल तर भाजपने ते करावे. भाजपला ही संधी आहे. आडमुठ्या राजकारणापेक्षा वाटाघाटीचे धोरण देशाला पुढे घेऊन जाते.

बातम्या आणखी आहेत...