आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडी घसरली ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभर गाजावाजा झालेल्या गुजरात मॉडेलमुळे १५० अधिक जागा मिळतील अशी स्वप्ने पाहणाऱ्या भाजपने धर्माचा मुद्दा गुजरात विधानसभा निवडणुकांत आणून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण ते स्वत: जातीय राजकारणात गुरफटत गेले. पहिल्यांदा हिंदुत्व, नंतर राम मंदिर, गुजराती अस्मिता, काँग्रेसचे नेते अहमद पटेल हे गुजरातचे मुस्लिम मुख्यमंत्री होतील अशी आवई व अखेर पाकिस्तान गुजरात अस्थिर करत असल्याचा आरोप अशा टप्प्याटप्याने भाजपची प्रचाराची गाडी घसरत गेली. त्यात काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी मोदींवर अर्वाच्य शब्दांत टीका करून भाजपच्या हातात एक कोलीत दिले. या कोलिताच्या साहाय्याने मोदी यांनी काँग्रेसविरोधात आग पेटवण्याचा प्रयत्न केला. अय्यर व मोदी यांच्यातली राजकीय दुश्मनी नवी नाही. पण अय्यर यांना पाकिस्तानप्रेमी करण्याची घाई मोदींना झाली व त्यात ते मोठी राजकीय चूक करून बसले. पाकिस्तानला गुजरातच्या निवडणुकांत रस असेल व त्या देशाच्या काही कारवाया सुरू असतील तर ते पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी पंतप्रधान म्हणून मोदी यांची आहे, ती काँग्रेसची नाही. ज्या भेटीचा उल्लेख करून मोदींनी काँग्रेसवर हल्ला केला त्या भेटीत पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त होते. शिवाय भारताचे माजी लष्करप्रमुख, माजी पंतप्रधान, माजी उपराष्ट्रपती, काही काँग्रेसेतर व प्रशासनात काम करणारे माजी अधिकारीही होते. भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत व्हावे अशी भूमिका घेणारे अनेक घटक दोन्ही देशांत आहेत. अशा बैठका गेली अनेक वर्षे ‘ट्रॅक टू डिप्लोमसी’च्या पातळीवर दोन्ही देशांत होत असतात. (काही दिवसांपूर्वी भाजपनेच काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत यावी म्हणून तेथील विविध राजकीय पक्ष व खोऱ्यातील फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी भारतीय गुप्तचर खात्याच्या माजी संचालकांना काश्मीरमध्ये पाठवले होते.) जर अशा बैठकीत देश अस्थिर करण्याची कारस्थाने घडत असतील तर मोदींनी पंतप्रधान म्हणून या बैठकीवर पोलिस कारवाई करून तो प्रयत्न उधळून लावायला हवा होता. तो त्यांनी का टाळला, हा प्रश्न आहे. काँग्रेसने या बैठकीत झालेला वृत्तांत व त्यात हजर असलेल्या व्यक्तींची नावे उघड करून मोदींचीच कोंडी केली. त्यात पाकिस्तानने भारत सरकारला उत्तर देऊन मोदींच्याच कोर्टात चेंडू लगावला. थोडक्यात, मणिशंकर अय्यर व पाकिस्तान यांच्यामध्ये गहिरी दोस्ती आहे असे समीकरण प्रस्थापित करण्यासाठी मोदींनी गुजरात निवडणूक निवडायला नको होती. त्यातून राज्यात हिंदू-मुस्लिम धुव्रीकरण करण्याचा त्यांचा असहाय प्रयत्न दिसतो. राजकारणात तीन दशके असलेला एक मुरब्बी नेता, जो पंतप्रधान आहे, त्याच्याकडून असा वावदूकपणा निश्चितच खेदजनक आहे. त्याच्यामुळे भारतीय राजकारणात अनेक विखारी पायंडे यापुढे पडण्यास मदत होणार आहे.  


भाजपचा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतला प्रचार गुजरात मॉडेल, काँग्रेसचा भ्रष्टाचार, काळा पैसा व हिंदुत्व अशा मुद्द्यांवर केंद्रित होता. त्यावर त्यांनी केंद्रात बहुमत मिळवले. नंतर एक वर्षाने भाजपने देशातल्या जवळपास सर्वच सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक संस्थांचा ताबा घेत या संस्थांवर आपली विचारसरणी लादण्यास सुरुवात केली आणि त्याआधारे देशात विकास दिसू लागला असल्याचा दावा करण्यास सुरुवात केली. पुढे नोटबंदी व जीएसटीमुळे काळ्या पैसेवाल्यांचे धाबे दणाणले, भ्रष्टाचार संपण्यास सुरुवात झाली व अच्छे दिन दिसू लागल्याचा प्रचारही त्यांनी धूमधडाक्यात सुरू केला. एवढी शिदोरी असतानाही गुजरात निवडणुकांत हिंदू-मुस्लिम मुद्दा आणण्याचे त्यांना काहीच कारण नव्हते. महत्त्वाचे म्हणजे ज्या गुजरात मॉडेलचा पाया खुद्द नरेंद्र मोदी यांनी घातला व त्यावर कळस चढेपर्यंत अविरत, अविश्रांत प्रयत्न घेतले ते मॉडेल खुद्द मोदी यांनी या निवडणुकांत झिडकारून टाकले. ते का टाकले याचे उत्तर ना भाजप देत आहे ना मोदी व ना त्यांच्या जवळचे विचारवंत, कॉर्पोरेट लॉबी, धनाढ्य उद्योजक! मोदींना २०१९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवलेली दिसते असे मान्य करून आगामी लोकसभा निवडणुकीत ते आपली प्रतिमा विकासपुरुष अधिक हिंदू नेता अशी व्यापक करण्यासाठी गुजरात निवडणुकांचा वापर करत असतील तर या दोन दगडांवर पाय ठेवणे त्यांच्यासाठी आत्मघाताचे आहे. कारण ते आता विरोधी नेते नाहीत तर पंतप्रधान आहेत. विरोधक व जनता त्यांच्याकडे पाच वर्षांच्या फक्त विकासवादी राजकारणाची उत्तरे मागणार आहे. गुजरात निवडणुकीत काँग्रेसने मोदींच्या गुजरात मॉडेलवर सातत्याने प्रश्न विचारत भाजपला बॅकफूटवर नेले व भाजपला जातीय राजकारणाकडे जाण्यास भाग पाडले. गुजरात िनवडणूक प्रचारातून हेच चित्र दिसते.

बातम्या आणखी आहेत...