आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकनेता ते हुकूमशहा ( अग्रलेख )

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माओच्या सांस्कृतिक चळवळीनंतर सत्तेचे जे केंद्रीकरण झाले होते त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून १९८२ मध्ये चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने चीनचा अध्यक्ष दोन कालावधींसाठीच असावा अशी घटनादुरुस्ती केली होती. या तरतुदीचे पालन नंतर चीनला आधुनिकतेकडे घेऊन जाणाऱ्या डेंग यांच्यासारख्या शक्तिशाली नेत्यानेही केले. त्यानंतर अध्यक्षपद भूषवलेल्या अन्य नेत्यांनीही केले होते. पण याला अपवाद सध्याचे अध्यक्ष शी जिनपिंग ठरले. चीनच्या संसदेने- नॅशनल पीपल्स काँग्रेसने- विक्रमी बहुमताने शी जिनपिंग हे चीनचे तहहयात अध्यक्ष राहतील, अशी जिनपिंग यांनीच आणलेली घटनात्मक तरतूद मंजूर केली. चीनच्या आधुनिक इतिहासात ही अभूतपूर्व व अनपेक्षित घटना म्हटली पाहिजे. अनपेक्षित यासाठी की चीनच्या कम्युनिस्ट पार्टीत व्यक्तिकेंद्रित राजकारणाला दुय्यम ठरवण्याची रीत आहे. कम्युनिस्ट पार्टी सर्वोच्च नेत्याचे हात, सामूहिक नेतृत्व बळकट करत असली तरी नेत्याला पक्षाच्या वरचढ होऊ न देणे याची काळजी पार्टी घेत असते. शी जिनपिंग यांच्याबाबतीत कम्युनिस्ट पार्टीने आपले सर्व संकेत, नियम, परंपरा मोडीत काढल्या. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाला विरोध करणारे एकही नेतृत्व खुद्द पक्षातून जन्माला आले नाही. ते येऊ नये याची खबरदारी शी जिनपिंग घेत होते. त्यांच्या अशा प्रयत्नांना यश आले असे म्हणावे लागेल. वास्तविक आजपर्यंत चीनच्या घटनेनुसार कोणत्याही सर्वोच्च नेतृत्वाला १० वर्षे अध्यक्ष राहण्याची परवानगी असे. शी जिनपिंग यांची २०१२ मध्ये पाच वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून निवड झाली व काही दिवसांपूर्वी त्यांची पुन्हा पाच वर्षांसाठी फेरनिवड झाली होती. ते २०२३ पर्यंत अध्यक्ष म्हणून पदावर राहणार होते. आता अध्यक्षपद शी जिनपिंग यांच्याकडे तहहयात आल्याने त्यांच्याकडे पक्षासह देशाचे अमर्याद अधिकार आले आहेत.   


कम्युनिस्ट पार्टीमधील अनेक बड्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराला लगाम घालणे, सार्वजनिक स्तरावर बोकाळलेला भ्रष्टाचार नष्ट करणे, आर्थिक तसेच लष्करी पातळीवर चीनचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्थान बळकट करणे, प्राचीन चीनच्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे अशा अजेंड्यामुळे शी जिनपिंग कम्युनिस्ट पार्टीत लोकप्रिय होते. ही लोकप्रियता जनतेत रुजवण्याच्या दृष्टीने त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सुमारे १० लाख प्रशासकीय कर्मचाऱ्यांना शिक्षा फर्मावली. आपल्या पक्षातील बड्या, बुजुर्ग पण भ्रष्टाचारी सहकाऱ्यांना त्यांनी गजाआड केले, जे आजपर्यंत अशक्य वाटत होते. आपली राष्ट्रवादी प्रतिमा ठसवताना चीनच्या प्राचीन व सांस्कृतिक वारसांना राजकारणात पुनरुज्जीवित केले. चीन केवळ भौगोलिक आकाराने मोठा देश नाही किंवा ती आर्थिक महासत्ता नाही, तर ती अमेरिकेला व्यापारापासून लष्करापर्यंत सगळ्याच पातळीवर आव्हान देणारी प्रबळ सत्ता आहे, अशी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा शी जिनपिंग यांनी तयार केली. त्यामुळे त्यांचे कम्युनिस्ट पार्टीवरचे नियंत्रण वाढत गेले. असे नियंत्रण त्यांनी चीनी प्रसारमाध्यमांवरही आणले. या माध्यमांना त्यांनी  केवळ सरकारधार्जिणे केले नाही, तर अन्य माध्यमे व त्यांच्याशी संलग्न असणारी चिनी बुद्धिवादी मंडळी यांच्या विचारस्वातंत्र्यावर त्यांनी बंधने आणली. विदेशी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनावर अटी घातल्या. व्यापारवृद्धीच्या पातळीवर चीनमध्ये परदेशी कॉर्पोरेट कंपन्यांना रेड कार्पेट घालण्यापेक्षा आपली संरक्षणवादी भूमिका आक्रमकपणे राबवली. स्वदेशी उद्योगांना बळ दिले. घरबांधणीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर दिला. ‘वन रोड, वन बेल्ट’ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी व्यापारी कॉरिडोर तयार करण्याच्या माध्यमातून त्यांनी भारतासह अमेरिका व युरोपीय राष्ट्रांना शह दिला. आसुरी महत्त्वाकांक्षा व लोभी भांडवलशाही यांच्या मिलनातून हुकूमशहा तयार होतात, असे जगाचा इतिहास सांगतो तशी काहीशी परिस्थिती चीनमध्ये निर्माण झाली आहे. २०१२ पासून सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या तीन वर्षांत शी जिनपिंग यांच्या राजकीय वाटचालीचा अंदाज घेणाऱ्या पाश्चात्त्य जगतातील सर्वच विचारवंतांनी व प्रसारमाध्यमांनी चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीची वाटचाल सामूहिक नेतृत्व ते हुकूमशाही अशी सुरू असल्याचे भाकीत केले होते. ते भाकीत आता सत्यात अवतरले आहे. चिनी प्रसारमाध्यमांनी शी जिनपिंग यांची निवड तहहयात झाली असली तरी त्याचा अर्थ ते हुकूमशहा आहेत, असा घेण्याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. चीनबद्दल पाश्चात्त्य जगाला जी एक प्रकारची असूया, अढी आहे त्यातून चीनची प्रतिमा कलंकित केली जात असल्याचे सरकारी प्रसारमाध्यमांचे मत आहे. चीनमधील प्रसारमाध्यमे एखाद्या नेत्याला तहहयात अध्यक्ष करण्यामागची कम्युनिस्ट पार्टीची अपरिहार्यता सांगू शकत नाहीत. कम्युनिस्ट पार्टीही जगापुढे या मागचे राजकीय समीकरण सांगण्यास असमर्थ ठरले आहेत.

बातम्या आणखी आहेत...