आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीतील सोशल इंजिनिअरिंग ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील गोरखपूर व फुलपूर या दोन लोकसभा मतदारसंघात समाजवादी पार्टी व बहुजन समाज पक्षाने जी जातीची नवी समीकरणे तयार केली त्यामुळे भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला. भाजपचा हा पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय वाटचालीशी जोडला जातोय. बहुतेक माध्यमांनी भाजपला २०१९च्या लोकसभा निवडणुकांतील त्यांची सर्वसमावेशक हिंदुत्वाची रणनीती बदलावी लागेल, असे म्हटले आहे. ते एका अर्थी बरोबर आहे, कारण २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सवर्णांपासून ओबीसी, दलित, अतिमागास अशा सर्व जाती भाजपच्या मागे उभ्या राहिल्याने ८२ पैकी ७१ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. तशीच किमया त्यांनी २०१७च्या विधानसभा निवडणुकांत तीनशेहून अधिक जागा मिळवून साधली होती. पण २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच जाती भाजपच्या मागे उभ्या राहतील याच्या शक्यता कमी झाल्या आहेत. कारण सपाने गोरखपूर व फुलपूरमध्ये यादव मतांना पुन्हा आपल्याकडे वळवून घेतले आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी २०१७ची विधानसभा निवडणूक हरल्यानंतर काही महिन्यांतच यादव समाजाचे एक संमेलन आयोजित केले होते. या संमेलनात यादव मतदार देशातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा मतदार असून तो प्रभावशाली असल्याचे मत त्यांनी मांडले होते. अखिलेश यांच्या प्रयत्नांमुळे निषाद, सैंथवार, पटेल, राजभर, मौर्य, विश्वकर्मा, प्रजापती, जयस्वाल, गुप्ता, कुर्मी अशा छोट्या जाती भाजपच्या िवरोधात उभ्या राहिल्या. तर दुसरीकडे मायावतींनी मुस्लिम व दलित मतदार सपाच्या मागे उभे केले. भाजपची ब्राह्मणांची मते काँग्रेसने मिळवली. थोडक्यात भाजपचा सर्वसमावेशक हिंदुत्वाला जातीय समीकरणांनी छेद दिला. महत्त्वाचे म्हणजे एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या सपा व बसपने भाजपच्या विरोधात उभे राहताना स्वत:ची जातीय समीकरणे व राजकारण यांना बाजूला ठेवून एकत्रित लढण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. हा एक वेगळा राजकीय प्रवाह उत्तर प्रदेशात जन्मास आला आहे. अखिलेश यांनी तर बसपसोबतची युती पुढील पोटनिवडणुकांत कायम राहील व भविष्यातही त्यावर विचार केला जाईल, असे संकेत दिले आहेत. अर्थात एखाद्-दुसऱ्या लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीत आपापले रुसवेफुगवे, कट्टर विचारधारा सोडून सहमतीचे राजकारण घडू शकते. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात राजकीय आघाडी करण्याचे प्रयत्न फार काळ टिकलेले नाहीत हा इतिहास आहे. भविष्यात २०१९च्या लोकसभा निवडणुकीत खरोखरीच युती करायची झाल्यास बसप व सपाला आपापले मतदारसंघ निश्चित करताना बऱ्याच राजकीय कसरती कराव्या लागतील. आजी-माजी नेत्यांमध्ये समन्वय घडवून आणावा लागेल. त्यांच्या महत्त्वाकांक्षांना आवर घातला पाहिजे. मायावतींना राष्ट्रीय राजकारणात कमबॅकची आवश्यकता आहे, तर मुलायमसिंहांना पुन्हा तिसऱ्या आघाडीत महत्त्वाचे स्थान असावे, अशी इच्छा आहे. उत्तर प्रदेशात सत्तापरिवर्तन करण्यासाठी बिहारमध्ये  महागठबंधनाचा जसा प्रयोग केला होता तसा तो करावा लागेल. पण महागठबंधनाचे पुढे काय झाले हेही देशाने पाहिले आहे. एकुणात भाजपला रोखण्यासाठी विरोधकांमध्ये समंजसपणा व राजकीय मतैक्य असले पाहिजे.  


बुधवारी जेव्हा गोरखपूर, फुलपूरचे िनकाल जाहीर झाले तेव्हा योगी आदित्यनाथ यांनी अतिआत्मविश्वासापायी आमचा पराभव झाल्याची कबुली दिली. भाजपला हा अतिआत्मविश्वास स्थानिक पातळीवर नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही झालेला दिसतोय. त्यामुळे सगळे नेते आपल्या कार्यकर्त्यांकडे, मतदारांकडे दुर्लक्ष करत ‘मोदी-मोदी’ असा गजर करण्यात धन्यता मानतात. खुद्द मोदीही त्रिपुरासारख्या छोट्या राज्यातील विजय मोठी उपलब्धी असल्याच्या थाटात तो साजरा करताना दिसतात. काही उजव्या राजकीय पंडितांनी मोदींनी गोरखपूर-फुलपूर पोटनिवडणुकांकडे पाठ फिरवल्यामुळे योगी आदित्यनाथ यांना पराभव पत्करावा लागला असा तर्क मांडला आहे. मतदारांवर मोदींचा करिष्मा अजूनही कायम आहे असे या पंडितांचे म्हणणे आहे. असे तर्क उलट्या बाजूनेही पाहता येतात. जर मोदींचा करिष्मा असता तर गुजरातमध्ये काँग्रेसने त्यांचा घाम का काढला याचे उत्तर द्यावे लागेल. तसेच राजस्थानमध्येही भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०१९चे राजकीय वातावरण हे २०१४ च्या तुलनेत खूप भिन्न होत चालले आहे. भाजपच्या विरोधात त्यांचे मित्र पक्ष व अन्य आघाड्या आकारास येत आहेत, भाजपने मोदींच्या पलीकडे जाऊन या राजकीय हालचालींकडे लक्ष दिले पाहिजे. योगी आदित्यनाथ यांचा गड जर सहज पाडता येत असेल तर मोदींनाही जबर राजकीय धक्का बसू शकतो. 

बातम्या आणखी आहेत...