Home | Editorial | Agralekh | divya marathi editorial article

प्रश्न विश्वासार्हतेचा ( अग्रलेख )

दिव्‍य मराठी | Update - Apr 02, 2018, 06:45 AM IST

बँकिंग व्यवस्थांमधील कोट्यवधी, अब्जावधी रुपयांचे घोटाळे सहजपणे उघडकीस येत आहेत. ज्या व्यवस्था सामान्य माणसाच्या बचतीवर,

  • divya marathi editorial article

    बँकिंग व्यवस्थांमधील कोट्यवधी, अब्जावधी रुपयांचे घोटाळे सहजपणे उघडकीस येत आहेत. ज्या व्यवस्था सामान्य माणसाच्या बचतीवर, क्रयशक्तीवर, विश्वासावर उभ्या राहिल्या आहेत, तेच त्या व्यवस्थेचा भरभक्कम पाया आहेत, अशा व्यवस्थेत उंचावर बसलेले बिनबोभाट भ्रष्टाचार करताना, देशाबाहेर पळून जाताना दिसताहेत. भारतातील सर्वच बँकिंग व्यवस्था भ्रष्टाचार, वशिलेबाजी व लोभी भांडवलशाहीच्या आवर्तनात सापडली आहे. म्हटले तर कायदा, पोलिस चौकशी, प्रसारमाध्यमांचा दबाव आहे, राजकीय नेते घोटाळेबहाद्दरांना अटक करू, अशी आश्वासने देत आहेत, संसदेत नवे कायदे आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत, पण प्रत्यक्षात जमिनीवर काहीच घडताना दिसत नाही. गेल्या आठवड्यात देशातील प्रसिद्ध खासगी बँक व जिचे नाव आदराने सर्वत्र घेतले जाते, त्या आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची सीबीआय कथित भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करणार असल्याचे वृत्त आले. २००८मध्ये व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनी दीपक कोचर यांच्याबरोबर एक कंपनी स्थापन केली व त्यांनी आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेतले. त्यानंतर अनेक वेगवेगळे आर्थिक व्यवहार होऊन आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला ३२५० कोटी रु.चे कर्ज दिले व आता हे कर्ज म्हणजे बँकेची आर्थिक फसवणूक झाली, असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न होत आहे. ही फसवणूक म्हणजे नीरव मोदी प्रकरणानंतर बँकिंग व्यवस्थेला बसलेला दुसरा धक्का आहे. कारण आता आर्थिक घोटाळ्यात खासगी बँकेचेही नाव आले आहे. आयसीआयसीआय बँक ही तशी जुनीच आहे व तिचा विस्तार गेल्या दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या बँकेच्या सीईओपदी चंदा कोचर यांची निवड झाली तेव्हा त्यांचे मोठ्या प्रमाणात कोडकौतुक झाले होते. बँकिंग व्यवस्थेत केवळ प्रतिनिधित्व नाही तर त्याची जबाबदारीही महिलांवर दिल्याने या कौतुकाला एक चंदेरी किनार होती. कोचर पुढे नावारूपाला आल्या त्या त्यांच्या व्यवस्थापन शैलीमुळे. यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वेळा त्यांचा गौरव करण्यात झालेला आहे. जगातल्या काही मोजक्या प्रभावशाली महिलांच्या यादीतही (फोर्ब्ज) त्यांचे नाव सातत्याने येत असताना त्यांच्या कार्यशैलीवर संशय निर्माण होणे हे तसे धक्कादायकच. हा संशय आला तो हितसंबंधांच्या संघर्षामुळे. गेली काही वर्षे हितसंबंधांच्या संघर्षावरून माध्यमांमध्ये बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. कायद्याने प्रत्येकाला व्यवसाय करण्यास मुभा आहे. कोणाचे आई-वडील-भाऊ-बहीण-नवरा-बायको उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, मंत्री असो वा बँकेतले बडे अधिकारी असले तरी त्या व्यक्तीला कोणताही व्यवसाय, नोकरी करण्यास मुभा आहे. पण मंत्री-सरकारी अधिकारी-बँकेतील अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा आपल्या सग्यासोयऱ्यांच्या फायद्यासाठी वापर करून द्यावा का, हा प्रश्न आहे. चंदा कोचर यांच्यावर त्यांनी पती दीपक कोचर यांच्या कंपनीला कर्ज देण्यासाठी आपले वजन, पद-प्रतिष्ठा वापरली असे आरोप आहेत. पण हे आरोप संचालक मंडळाने फेटाळून लावले आहे. व्हिडिओकॉनला सुमारे २० बँकांनी कर्ज दिले आहे, त्यापैकी एक बँक आयसीआयसीआय असून कर्ज प्रक्रियेवर सीईओ वा एमडी म्हणून चंदा कोचर यांचा प्रभाव नाही, असे बँकेचे स्पष्टीकरण आहे.


    बँकेचे बुडालेले काही हजार कोटी रु. कुठे आहेत, याचा खुलासा अजून झालेला नाही. किंवा बँकेने या कर्ज बुडवण्यावर काय पावले उचलली आहेत हे स्पष्ट झालेले नाही. बँका आपल्या बुडीत कर्जामागचा पारदर्शी व्यवहार खातेधारकांपुढे मांडतील की नाही, हेही स्पष्ट नाही. महत्त्वाचे म्हणजे एप्रिल २०१२ मध्ये आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला ३२५० कोटी रु.चे कर्ज मंजूर केले. त्याअगोदर एक वर्ष आधी दीपक कोचर यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टचे संशयित व्यवहार सीबीआय तपासत आहे. हा सगळा संशयास्पद व्यवहार एका खातेदाराने पंतप्रधान कार्यालयापासून अनेक सरकारी यंत्रणांशी पत्रव्यवहार केल्यानंतर उघडकीस आला व त्यानंतर धांदल उडाली. हे सगळे प्रकरण पुढील चौकशीत निष्पन्न होईलच. पण यामुळे बड्या उद्योगपतींचा सरकारी नव्हे तर खासगी बँकांवरचा प्रभाव नाकारता येत नाही. सध्या सामान्य उद्योजकाला कर्ज मिळवताना बँकांच्या फेऱ्या माराव्या लागतात तर बड्या उद्योगपतींसाठी बँका रेड कार्पेट अंथरतात. हे बँकिंग प्रणाली अपारदर्शक असल्याचे, हितसंबंधांचा आपल्याच सग्यासोयऱ्यांना फायदा करून देणारे निदर्शक आहे. सरकारी बँकांबद्दलचे जनमत अजून बरे आहे, पण खासगी बँकांना असे आरोप कठीणप्राय ठरू शकतात. विश्वासार्हता जपली तरच त्या टिकतील.

Trending