Home | Editorial | Agralekh | divya marathi editorial article

त्यांचा, आमचा ‘राम’ (अग्रलेख)

दिव्‍य मराठी | Update - Apr 03, 2018, 06:39 AM IST

‘माझा मुलगा मरण पावला आहे; पण दुसऱ्या घरातला मुलगा मारला जावा, त्याचे घर जाळले जावे अशी माझी इच्छा नाही. मी ३० साल इमाम

  • divya marathi editorial article

    ‘माझा मुलगा मरण पावला आहे; पण दुसऱ्या घरातला मुलगा मारला जावा, त्याचे घर जाळले जावे अशी माझी इच्छा नाही. मी ३० साल इमाम म्हणून काम करतोय. माझे काम समाजात शांतता, सौहार्द प्रस्थापित करायचे आहे. माझ्या मुलाच्या हत्येचा बदला म्हणून तुम्ही हिंसाचारावर येणार असाल तर हे शहर मी कायमचे सोडून जाईन.’ आपला १६ वर्षांचा मुलगा सिब्तुल्ला राशिदी याची आसाममधील आसनसोल शहरात जमावाने हत्या केल्यानंतर इमाम असलेल्या त्याच्या वडिलांनी संतप्त जमावापुढे केलेले हे वक्तव्य. या वक्तव्याने हिंदू-मुसलमान धर्मांतील कट्टरवाद्यांच्या हृदयात माणुसकीचा झरा निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त करणे धाडसाचे ठरेल. कारण ही संधी यांनी घालवली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतल्या अंकित सक्सेना या युवकाची एका मुस्लिम कुटुंबाने प्रेमप्रकरणातून हत्या केली, तेव्हा संतप्त झालेल्या जमावाला शांत करताना अंकित सक्सेनाचे वडील यशपाल सक्सेना यांनी, ‘माझ्या मुलाचा खून मुसलमानांनी केला आहे; पण त्यासाठी मी सर्व मुस्लिम समाजाला जबाबदार धरणार नाही. माझी कोणत्याही धर्माविरोधात तक्रार नाही. त्यामुळे मुसलमानांच्या विरोधात भावना भडकावणारी विधाने मला नको आहेत. जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचा धर्माशी संबंध नाही, त्यातून दंगली घडाव्यात अशी माझी इच्छा नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. या दोघांच्या मनातली माणुसकीची स्पंदने हिंदू-मुस्लिम कट्टरतावाद्यांपर्यंत पोहोचली असती तर आज प. बंगाल, बिहार, राजस्थानमध्ये कट्टरतावाद्यांचा जो उन्माद उफाळला आहे तो दिसला नसता. या देशात प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा मूलभूत हक्क आहे. तो आपल्या श्रद्धास्थानाच्या मिरवणुकाही काढू शकतो. पण आपल्या राज्यघटनेने फाळणीदरम्यानची धार्मिक विद्वेषाची, हिंसाचाराची भयाणता लक्षात घेऊन, या स्वतंत्र देशाने आपल्या श्रद्धा आपल्या घरात ठेवाव्या व त्याचे पालन करावे हा शहाणपणा दिला होता. पण हे शहाणपण आपल्या राजकारण्यांना लोकांना शिकवायचे नाही. म्हणून पोलिसांचे आदेश धुडकावून मिरवणुका काढा, मिरवणुकांमध्ये प्रतीकांमधून उन्माद पसरवा, दुसऱ्या धर्माच्या विरोधात बेधडकपणे घोषणाबाजी करा, परधर्मीयांच्या दुकानांवर-घरांवर दगडफेक करा, शेवटी हिंसाचार करून त्यांच्या हत्या करा असा त्यांचा प्रयत्न असतो. जंगल कायदा पद्धतशीरपणे कायद्याचे राज्य असलेल्या व्यवस्थेत आणला जावा अशी ही रणनीती आहे. या देशात रामराज्य असावे अशी इच्छा कट्टर उजव्यावाल्यांची आहे, पण या रामराज्यात जिथे रामाचे धार्मिकदृष्ट्या प्राबल्य नाही तेथे रामनवमीच्या मिरवणुका काढल्या गेल्या याला काय म्हणावे! मिरवणुका म्हणजे धार्मिक सलोखा जपणाऱ्या असतात. पण ‘या’ मिरवणुकांत तळपत्या तलवारी, हॉकी स्टिक, त्रिशूल, डीजे, शेकडो देवदेवतांचे पुतळे, जातीय तेढ पसरवणाऱ्या घोषणा यांना उधाण आले होते. २०१९ची लोकसभा निवडणूक एक वर्षावर आल्याने आतापासूनची ही रंगीत तालीम नाही ना, अशी शक्यता वाटते. एकमेकांच्या धर्माविरोधात पद्धतशीरपणे जातीय तेढ निर्माण करावी असा या मागचा सरळ सरळ हेतू आहेच आणि दुर्दैव असे की, या उद्दिष्टांसाठी भाजप, संघ परिवार, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासारख्या कट्टर उजव्या संघटना थेट रस्त्यावर उतरलेल्या दिसतात. भागलपूरमध्ये एका केंद्रीय मंत्र्याचा मुलगा पोलिसांच्या आदेशाला धुडकावून मिरवणूक काढून आगलावी वक्तव्ये करतो. राजस्थानात एका मुस्लिमाला मारणाऱ्या तुरुंगवास भोगणाऱ्या हल्लेखोराचा पुतळा देवदेवतांच्या पुतळ्यांमध्ये ठेवला जातो हे कशाचे द्योतक आहे? जो बिहार सुशासनसाठी चर्चेत आहे, ज्या नितीशकुमार यांना भाजप हा सेक्युलर पक्ष वाटला होता, ज्या बिहारमध्ये रामनवमी उत्सवाची परंपरा नसते त्या राज्यात सर्वाधिक दंगली घडताहेत हे कशाचे लक्षण?


    यशपाल सक्सेना व इमाम राशिदी ही सामान्य माणसे, पण त्यांचे मोठेपण हे की, विद्वेषाच्या राजकारणाची त्यांना झळ पोहोचूनही त्यांना आपला देश पेटावा, माणसे मारली जावीत असे हृदयापासून वाटले नाही. उलट जातीयवाद्यांना कुणी पहिला दगड मारला, कुणी कुणाला पहिले ठार मारले यातून पुढच्याला ठेचण्यात अधिक स्वारस्य वाटते. दंगली करून निवडणुका जिंकल्या म्हणजे समोरचा समाज/धर्म आपसूकच आपली हत्यारे म्यान करतो अशा मानसिकतेत हा सगळा खेळ सुरू आहे. आज देशातल्या लाखो तरुणांना हाताशी काम नाही, पण त्यांच्या हातात सोशल मीडिया आहे. या हातात तलवारी, हॉकी स्टिक, झेंडे दिल्यास आपले राजकीय इप्सित साध्य होते असा राजकारण्यांचा सरळ हिशेब आहे. महासत्तेच्या दिशेने निघालेल्या एका देशातले हे विरोधाभासी चित्र आहे.

Trending