Home | Editorial | Agralekh | divya marathi editorial article

अखंड कृतिनिर्धारू ( अग्रलेख )

दिव्‍य मराठी | Update - Apr 04, 2018, 02:00 AM IST

माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाच्याच अायुष्याला मर्यादा असते; हे आपण जाणतो. पण जे काही क्षण लाभतात त्या प्रत्येक

  • divya marathi editorial article

    माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाच्याच अायुष्याला मर्यादा असते; हे आपण जाणतो. पण जे काही क्षण लाभतात त्या प्रत्येक क्षणाचे सार्थक करणारा भाई वैद्य यांच्यासारखा कार्यकर्ता, संघटक, नेता आणि मार्गदर्शक महादुर्लभ असतो, याची जाणीव भाईंच्या निधनामुळे ठळक बनली आहे. ९० वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य भाईंना लाभले आणि त्यातील प्रत्येक क्षण भाईंनी ‘कृतिशील’ ठरवला. रिकामे बसलेले भाई, असे दृश्य त्यांच्या उभ्या अायुष्यात तरी कुणी पाहिलेले नाही. निवांतपणा भाईंच्या कोशातच नव्हता. त्यांच्या पायाला सतत भिंगरी लागलेली असे. घरात असलेच, तरी कार्यकर्त्यांचा घोळका त्यांच्या अवतीभवती असे. त्या प्रत्येकाशी त्यांचा वैयक्तिक संपर्क असे. त्याच्या कामाविषयी, कामाच्या ठिकाणाविषयी, कुटुंबाविषयी, अडचणींविषयीचा रिपोर्ट त्यांच्या मनात जागता असे. त्यानुसार भाई त्याला काम वाटून देत. भाईंच्या अंत्यदर्शनासाठी दूरदूरच्या गावांतून धडपडत आलेले अनेक कार्यकर्ते साश्रुनयनांनी मूकपणे वावरत असताना पाहिल्यावर भाईंविषयी त्यांच्या मनात असणाऱ्या भावनांना वेगळे शब्दरूप देण्याची गरज वाटली नाही. ‘हे सारे कुठून येते, कुठल्या झऱ्याचे पाणी या व्यक्तींमधून वाहत असते,’ असा कवीप्रश्न मनात येतो, तेव्हा भाईंच्या जडणघडणीच्या काळातली काही उत्तरे गवसतात. भाईंचे बालपण स्वातंत्र्यपूर्व धगधगत्या दिवसांमधले. मूल्याधिष्ठित राजकारण आणि समाजकारणाचे संस्कार, विवेकी वृत्ती, संयम, स्वत:पलीकडे पाहण्याची दृष्टी, हे पाथेय भाईंनी स्वीकारले आणि निभावले. वयाच्या नव्वदीतही त्यांचा उत्साह, प्रवास आणि कार्यकर्त्यांचा चमू कायम होता. नव्वदीचे भाई आणि विशी-पंचविशीतले कार्यकर्ते, असेच दृश्य साऱ्यांच्या परिचयाचे होते. चले जाव चळवळीचे पर्व भाईंना समाजकारण, राजकारणात ओढणारे ठरले. भाईंचा जन्म १९२८ चा. त्यामुळे चले जाव आंदोलनात भाई किशोरवयीन होते. पण त्या काळाचे मंतरलेपण विलक्षण असल्याने भाई आपसूक चळवळीत ओढले गेले आणि मग चळवळी, आंदोलने, संघटन.. अशा वाटेने समाजवादाचे तत्त्वज्ञान अंगी बाणवून भाई स्वत:ला घडवत गेले. राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रातच त्यांनी औपचारिक शिक्षण पूर्ण केले. जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी यांनी स्थापन केलेल्या ‘काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’चे सदस्यत्व स्वीकारून भाईंच्या राजकीय व सामाजिक कार्याचा श्रीगणेशा १९४६ मध्ये झाला आणि त्या कृतिशीलतेचे पर्व २ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी शांत झाले. ७२ वर्षे भाई सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. वयाच्या ८८ व्या वर्षीही शिक्षणहक्कासाठी तुरुंगवास सोसणारे भाई ‘केजी टू पीजी – मोफत शिक्षणा’साठी आग्रही होते. १९५५ चा गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, १९६१ मधील कच्छ (भूज) येथील सत्याग्रह, आणीबाणीच्या काळातील तुरुंगवास, १९८३ मधील चंद्रशेखर यांच्यासमवेतची भारतयात्रा, समाजवादी अध्यापक सभा.. असे चळवळींचे मुख्य टप्पे भाईंच्या चौफेर कर्तृत्वाने, संघटन कौशल्याने, नेतृत्वगुणांनी उजळून निघाले. आणीबाणीनंतर भाई पुलोद सरकारमध्ये गृह राज्यमंत्री झाले आणि मंत्रिपदाच्या अल्प काळातही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे पहिले विधेयक भाईंनी मांडले. पोलिसांना फुल पँट देण्याचा ऐतिहासिक निर्णयही त्यांनीच घेतला. मंत्री असताना लाच देणाऱ्यांना पकडून देणारे ते पहिले गृह राज्यमंत्री होते.


    भाईंचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वत: स्वयंसेवक – कार्यकर्ते या भूमिकेत कायम असत. महात्मा गांधी जेव्हा पुण्याजवळ उरुळीकांचन येथे वास्तव्यास होते, तेव्हा तिथले स्वयंसेवक भाईच होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना तर भाईंच्या घरीच झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात नव्या विचारांचे भारावलेपण हळूहळू ओसरत, विरत गेले तरीही समाजवादी विचारधारेचा, तत्त्वज्ञानाचा आणि कृतिशीलतेचा धागा भाईं अखंड विणत राहिले. त्यामुळेच वैचारिक व राजकीय मतभिन्नता असूनही भाईंचा संचार सर्वत्र स्नेहाचा, मैत्रीपूर्ण राहिला. भाईंचे सार्वजनिक जीवन म्हणजे सामाजिक नीतिमत्तेचा आदर्श म्हणावा लागेल. उपेक्षित, दलित, मागास अशा सर्व समाज घटकांमधून भाई या मूल्याधिष्ठित कर्मयाेग्याने अक्षरश: एकेक माणूस कार्यकर्ता म्हणून घडवला आणि उभा केला. देशभर केलेली भ्रमंती आणि जोडीला वाचनाचा अखंड व्यासंग हे भाईंचे वेगळेपण होते. त्यातून समाजवादी विचारांचा जागतिक आवाका त्यांना आला. आपल्या कार्याला, कार्यकर्त्यांना आणि चळवळींना, आंदोलनांना भाईंनी भक्कम वैचारिक बैठक त्यातून मिळवून दिली. अलीकडच्या काळात फारशा सक्रिय नसलेल्या समाजवादी, लोकशाहीवादी विचारांच्या आघाड्या परिवर्तनाच्या वाटेने नेण्याचा प्रयत्न करणे, हीच अखंड कृतीचा निर्धारू, अशा व्यक्तिमत्त्वाच्या भाईंना खरी आदरांजली ठरेल.

Trending