Home | Editorial | Agralekh | divya marathi editorial article

देर हैं, अंधेर नहीं... ( अग्रलेख )

दिव्‍य मराठी | Update - Apr 06, 2018, 02:00 AM IST

राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणात आरोपी असलेल्या सिनेअभिनेता सलमान खान यास सुनावण्यात आलेली पाच वर्षांची शिक्षा या देशा

  • divya marathi editorial article

    राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणात आरोपी असलेल्या सिनेअभिनेता सलमान खान यास सुनावण्यात आलेली पाच वर्षांची शिक्षा या देशात न्याय अजून शिल्लक असल्याचे द्योतक आहे. १९९८ मध्ये सलमान व त्याचे चार अन्य सहकारी काळवीट शिकार प्रकरणात सापडले होते व त्यानंतर हे प्रकरण देशभर चर्चेत आले. हे प्रकरण घडण्याअगोदर सलमान चिंकारा शिकार प्रकरणात अडकला होता, पण या खटल्यातून त्याची राजस्थान उच्च न्यायालयात निर्दोष सुटका झाली होती. त्यामुळे काळवीट प्रकरणात सलमान पुराव्याअभावी निर्दोष सुटेल, अशीच भावना पसरली होती. पण सलमानच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करण्याचे काम राजस्थान पोलिस व वन खात्याने नेटाने केले ते उल्लेखनीय आहे. हा खटला परिस्थितिजन्य पुराव्यांवर उभा होता. अशा पुराव्यांमध्ये छेडछाड करणे शक्य असते. जवळपास दोन तपे पुराव्यांमध्ये तशी कोणतीही छेडछाड झाली नसल्याने सलमान दोषी ठरू शकला. तसे या खटल्यात सलमानला शिक्षा होईल यासाठी बिष्णोई समाजाने शेवटपर्यंत लढा दिला. या समाजाच्या प्राण्यांबद्दल असलेल्या आत्यंतिक आस्थेमुळे, दयेमुळे सलमानला तुरुंगवास घडला. महत्त्वाचे म्हणजे बिष्णोई समाजातील एकही साक्षीदार एवढ्या प्रदीर्घ काळात उलटला नाही. त्यांच्या जाबजबाबात विसंगती आढळली नाही. आपल्या समाजाने आखलेल्या मूल्यांशी, शेकडो वर्षे चालत आलेल्या परंपरांशी त्यांनी प्रतारणा केली नाही.


    आपण बॉलीवूडमधील एका बड्या अभिनेत्याविरोधात लढतो आहोत, याचा दबाव या समाजाने घेतला नाही की त्यांच्यापुढे ते लीन झाले नाहीत. धनसंपत्ती, वेळकाढू न्यायप्रक्रिया व सेलिब्रिटी असल्याने चहुबाजूंनी येणारा दबाव यांची पत्रासही त्यांनी ठेवली नाही. त्यामुळे सलमानला जेव्हा शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा या समाजामध्ये समाधान व्यक्त झाले.


    बिष्णोई समाज हा प्रामुख्याने राजस्थानमधील थर वाळवंटाच्या परिसरात राहतो. या समाजाच्या पर्यावरण संवर्धनाविषयी विशिष्ट धारणा आहेत आणि त्यानुसार त्यांनी २९ नीती-नियम केले आहेत. हे सर्व नियम संपूर्ण समाजाकडून काटेकोरपणे पाळले जातात. या नीती-नियमांत ते जनावरांना ईश्वराप्रमाणे मानतात. हिरवी पाने असलेली झाडे तोडत नाहीत. आपण जगत असलेल्या अधिवासात एक सांस्कृतिक संचित निर्माण होतच असते, पण त्यातून पर्यावरण संवर्धनाची एक उल्लेखनीय व प्रशंसनीय रीत या समाजाने अंगीकारल्याने सलमानला हे प्रकरण अवघड होत गेले. त्यात सलमान या प्रकरणात खोलात गुंतत गेला तो या परिसरातल्या कडक वन्यजीव कायद्यांमुळे. ज्या जंगलात काळविटांची शिकार करण्यास तो गेला होता ते जंगल संरक्षित होते आणि त्यात काळविटांची शिकार करण्यास सक्त मनाई आहे. ही काळविटे प्रामुख्याने भारत-पाकिस्तान-नेपाळ भागात आढळतात. त्यांचा अधिवास हा वाळवंटी व मैदानी प्रदेशात प्रामुख्याने असतो, पण त्यांच्या शिंगांमुळे व मांसामुळे त्यांची कित्येक दशके बेसुमार शिकार होत असल्याने त्यांची संख्या काही हजारांवर येऊन पोहोचली आहे. म्हणून या काळविटांची प्रजाती लुप्त होऊ नये म्हणून केंद्र सरकारने त्यांच्या वंशवाढीसाठी संरक्षक कायदे राबवले आहेत. तरीही सलमानने आपल्या सहकाऱ्यांना जीपमध्ये बसवून जंगलात बंदुकांसह अवैधपणे प्रवेश केला व दोन काळविटांना ठार मारले. या सगळ्या कायदेशीर बाबी सलमानला या खटल्यात दोषी ठरवण्यास कारणीभूत ठरल्या. या खटल्याच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण कायद्याविषयी समाजाचे प्रबोधन होईल, अशी अपेक्षा ठेवण्यासही हरकत नाही. कारण आपल्याकडे (संरक्षित) वन्यजीवांची हत्या करण्याकडे पुरुषार्थाच्या, शौर्याच्या नजरेतून पाहिले जाते. ही मानसिकता राजेराजवाड्यांच्या काळापासून चालत आल्याने तिला एक वलय प्राप्त झाले आहे. कायद्यानुसार बंदुका बाळगणे, वन्यजीवांची बेकायदा शिकार करणे, त्यात सरकारी यंत्रणांना ठकवणे, त्यांची दिशाभूल करणे वा त्यांचा आवाज पैसे देऊन बंद करणे हे शिकारीपेक्षा प्रचंड असे साहस असल्याचा समज आहे. हे साहस सलमान खान व त्याच्या बड्या सेलिब्रिटी मित्रांनी केले व त्याची परिणती कशात होऊ शकते याचा एक दाखला यानिमित्ताने पुढे आला हे महत्त्वाचे आहे. यापुढे वन्यजीव कायद्यांबाबत समाजात जी अनभिज्ञता पसरली आहे ती दूर होईल व या कायद्यांचा धाक राहील यासाठी वन्यजीव प्रेमींसह सरकारी यंत्रणांनी पुढे आले पाहिजे. कारण त्यांच्याकडे सलमान सेलिब्रिटी असून तो मनुष्याच्या हत्येप्रकरणी निर्दोष सुटला असला तरी मुक्या प्राण्याच्या हत्या प्रकरणात तो दोषी ठरला हा संदेश ठळकपणे सांगण्यासारखा आहे.

Trending