Home | Editorial | Agralekh | divya marathi editorial article

कुचकामी तपास यंत्रणा (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Apr 18, 2018, 02:00 AM IST

१८ मे २००७ रोजी हैदराबाद शहरातील चारमिनार परिसरातील मक्का मशिदीत बॉम्बस्फोट होऊन ९ जण ठार झाले होते. हा स्फोट झाला तेव्ह

  • divya marathi editorial article

    १८ मे २००७ रोजी हैदराबाद शहरातील चारमिनार परिसरातील मक्का मशिदीत बॉम्बस्फोट होऊन ९ जण ठार झाले होते. हा स्फोट झाला तेव्हा पोलिसांचा संशय बांगलादेशी दहशतवादी संघटना ‘हुजी’वर होता. पण जेव्हा पोलिस खोलात गेले तेव्हा कट्टर हिंदुत्ववादी विचाराने पछाडलेल्या काही जणांचा कट असल्याचे उघडकीस आले आणि देशभर हलकल्लोळ माजला. त्या वेळच्या यूपीए सरकारने ही घटना म्हणजे ‘हिंदू दहशतवाद’ असल्याचा आरोप केला आणि या आरोपाने देशातील राजकीय वातावरण तप्त झाले. त्याअगोदर एक वर्ष मालेगावमध्ये, नंतर भारत-पाकिस्तानदरम्यान धावणाऱ्या समझौता एक्स्प्रेसमध्ये आणि राजस्थानमधील अजमेर शरीफमध्ये बॉम्बस्फोट झाले होते.

    या सर्व बॉम्बस्फोटांमध्ये एक समान सूत्र असल्याची खात्री पोलिस व राष्ट्रीय तपास यंत्रणेला पटल्यानंतर स्वामी असीमानंद, कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूर, सुनील जोशी व काही अन्य जणांना देशभरातून अटक करण्यात आली. या सर्व आरोपींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचे दुवे सापडल्याने तर आणखी खळबळ उडाली होती. आजपर्यंत देशात हिंदू-मुस्लिम दंगली पेटाव्यात, देशात धार्मिक असंतोष उफाळावा या कुटिल उद्देशाने पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले केले जात होते. पण आता असे हल्ले करणाऱ्यांमध्ये देशातल्याच कट्टर हिंदुत्ववादी संघटना सामील असल्याचे चित्र उभे राहिल्याने सगळेच चक्रावून गेले. देशाला नक्षलवादाच्या समस्येशी दोन हात करताना नाकी नऊ येत असताना कट्टर धार्मिक हिंदू संघटनांचे हे आव्हान गंभीर होते. महत्त्वाची बाब म्हणजे स्वामी असीमानंद यांनी दिल्लीतील तीसहजारी न्यायालयात मुस्लिमांच्या धार्मिक स्थळी स्फोट घडवून आणणे किंवा मुस्लिमबहुल भागात बॉम्बस्फोट घडवून आणून देशात दंगली पेटवण्याचा आमचा प्रयत्न होता, अशी कबुलीही दिली होती. त्यांनी आपला हात अजमेर शरीफ, समझौता एक्स्प्रेस, मक्का मशीद, मालेगाव बॉम्बस्फोटात असल्याचाही जबाब दिला . शिवाय जबाबात आरएसएसचे एक नेते इंद्रेश कुमार, साध्वी प्रज्ञा ठाकूर, संघप्रचारक सुनील जोशी या साथीदारांचेही नाव घेतले होते. स्वामी असीमानंद यांचा हा जबाबच एका अर्थाने या सगळ्या घटनांना वळण देणारा होता. या जबाबामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान भारताच्या विरोधात रान पेटवू लागला. दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पाकिस्तानविरोधातील जी मोहीम सुरू होती त्यात अडथळे आले. नंतर या प्रकरणाला दुसरे वळण लागले ते आणखी एका निर्णयाने. याअगोदर सीबीआय मक्का मशीद बॉम्बस्फोटाचा तपास करत होती. पण नंतर हा तपास त्यांच्याकडून काढून घेऊन तो राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिला गेला. या यंत्रणेने सीबीआयने गोळा केलेले पुरावे आपल्याकडे मागून घेतले, शिवाय स्वत:ही या प्रकरणाचा तपास केला होता. दरम्यानच्या काळात स्वामी असीमानंदनी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आपला जबाब फिरवला, त्यात अनेक साक्षीदार उलटल्याने हे प्रकरणच खिळखिळे झाले. आता सोमवारी स्वामी असीमानंद यांच्यासह पाच आरोपींची मक्का मशीद स्फोटातून पुराव्याअभावी सुटका झाली आहे. यापूर्वी स्वामी असीमानंद यांची अजमेर शरीफ बॉम्बस्फोट प्रकरणातून सुटका झाली होती व आता त्यांच्यावर फक्त समझौता एक्स्प्रेस प्रकरणाचे आरोप आहेत.

    मक्का मशीद प्रकरणाचा खटला ११ वर्षे न्यायालयात होता व आरोपींविरोधात सबळ पुरावे नसल्याच्या कारणावरून सर्वच आरोपी निर्दोष सुटत असतील तर हा स्फोट कुणी केला व त्यामागे कोणत्या यंत्रणा आहेत, अशा खटल्यांवर कोणता राजकीय पक्ष, संस्था दबाव आणत आहे, सर्वच साक्षीदार कशामुळे फिरतात, केंद्रातले सरकार तपास यंत्रणांच्या कारभारात हस्तक्षेप करते का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

    वर उल्लेख केलेली सर्वच प्रकरणे देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर आहेत. पोलिस यंत्रणा, न्याययंत्रणा, गुप्तहेर यंत्रणा सर्वच पातळ्यांवर निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले आहे. पोलिसांची तपास पद्धती व बड्या अधिकाऱ्यांचे सत्तेपुढे लीन होणे ही आता नवी बाब राहिलेली नाही. दहशतवादाचे राजकारण करणे, त्यावर निवडणुका जिंकणे हा राजकीय पक्षांचा उद्योग असला तरी पोलिस, न्यायव्यवस्थेचे ते काम नाही. पण या व्यवस्था राजकीय पक्षांच्या अजेंड्यात स्वत:ला सामील करून घेणाऱ्या दिसतात. या यंत्रणांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असलेली प्रकरणे, हायप्रोफाइल खटले शेवटपणे तडीस नेण्यात येणारे अपयश निश्चितच संतापजनक आहे. पोलिस सुधारणांचे कायदे आणून गुन्हेगारांना शिक्षा होईल हा दावा अपुरा आहे. मुळात पोलिसांनी सचोटीने, नि:पक्षपातीपणाने, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून काम केले तर अनेक गोष्टी साध्य होतील व या देशात न्याय मिळतोय यावर सर्वांचा विश्वास बसेल.

Trending