Home | Editorial | Agralekh | divya marathi editorial article about olympics

सोनेरी यशाला गवसणी (अग्रलेख )

दिव्य मराठी | Update - Apr 17, 2018, 02:00 AM IST

भारतीय क्रीडा क्षेत्र सातत्याने नवे काैशल्य अाणि अात्मविश्वास साध्य करत असतानाच क्रीडा क्षितिजावर नव्या प्रतिभावंतांचादे

  • divya marathi editorial article about olympics

    भारतीय क्रीडा क्षेत्र सातत्याने नवे काैशल्य अाणि अात्मविश्वास साध्य करत असतानाच क्रीडा क्षितिजावर नव्या प्रतिभावंतांचादेखील उदय हाेत अाहे, ही बाब दिलासादायक ठरावी. विशेषत: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केले. कौटुंबिक अाेढाताण, लैंगिक विषमतेचा अडसर पार करत त्यांनी भारताला लाैकिक मिळवून दिला. टेबल टेनिसमध्ये सिंगापूरसारख्या मजबूत संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पराभूत करणे म्हणजे जणू अाॅलिंपिकमध्ये चीनवर मात केल्यासारखेच. भारतीय प्रशिक्षक मसिमाे कांस्टँटिनीला वाटायचे की, भारतीय संघ सिंगापूरच्या संघाचा स्पर्धक नसून प्रशंसकच अाहे. मात्र, हा भ्रम खाेडून काढत मनिका बत्रा अाणि माैमा दास यांच्या साथीने भारतीय संघाने जी कमाल करून दाखवली ती अभिमानास्पदच ठरते. २००६ मध्ये पुरुषांच्या संघाने सुवर्ण पटकावल्यानंतर या क्रीडा स्पर्धेत भारताला त्याची अास लागून राहिलेली हाेती अाणि महिला संघ तर २००२ पासूनच त्या प्रतीक्षेत हाेता. जेव्हा जेव्हा सिंगापूरच्या झाऊ यिहानशी सामना झाला त्या वेळी मनिकाला पराभव पचवावा लागला, मात्र या वेळच्या विजयाने तीदेखील चकित झाली. स्वत:च्या बळावर प्रशंसनीय कामगिरी केली ती मनू भाकरने. अवघ्या १६ वर्षांची मनू भाकर जेवढी अल्लड तितकीच उपद्व्यापी असल्यामुळे जसपाल राणाने तिच्या अंगभूत प्रतिभा अाणि ऊर्जेचा नेटका वापर करून घेण्यासाठी केलेली पराकाष्ठा हा महत्त्वाचा भाग ठरला. जत्रेतल्या कुस्तीपासून सुरू झालेल्या राहुल अावारेच्या प्रवासाने राष्ट्रकुलात सुवर्णाला घातलेली गवसणी, सायना नेहवाल, तेजस्विनी सावंतची नेहमीप्रमाणे दमदार हजेरी, सुपर माॅम मेरी काेमचा गाेल्डन पंच, ‘दंगल’ची पुनरावृत्ती करत बबिता फाेगटने अाणि इयत्ता नववीतल्या अनीश भनवालने मिळवलेले सुवर्ण ही स्पर्धेची वैशिष्ट्ये ठरावीत. महिला खेळाडूंची कामगिरी पुरुष खेळाडूंसाठी प्रेरक ठरली हे तर निर्विवाद. उल्लेखनीय म्हणजे ‘क्रीडाग्राम’मधील खेळाडूंसाठी भारतीय अाॅलिंपिक असाेसिएशनने तयार केलेली अाचारसंहितेची भली माेठी जंत्री अाणि राजकारण, भ्रष्टाचाराच्या विळख्यात भारतीय क्रीडा क्षेत्र अडकलेले असताना खेळाडूंनी ६६ पदके पटकावली. गटबाजी, अवसानघात अाणि संशयास्पद वातावरणात खेळाडूंनी साेनेरी यशाला घातलेली गवसणी भारतीयांचा माथा उंचावणारी अाहे.


    क्रीडा प्रकार किंवा स्पर्धा काेणतीही असाे, त्याची प्रगती ही गुणवत्तेवर अवलंबून असते. गुणी खेळाडू हेरण्याचा, त्याला मार्ग दाखवण्याचा, टिकवून ठेवण्याचा प्रयत्न क्रीडा संघटना करतात का, हा खरा प्रश्न अाहे. क्रीडा संघटनांमधील राजकारण, वैयक्तिक अाकस यातून नव्या खेळाडूंसमाेर काेणता संदेश जात असेल? मुळात गुणवंत खेळाडूंचा शाेध घेतला जात नसल्यामुळे किंवा जे अाहेत त्यांना पुरेशी संधी अाणि व्यासपीठ दिले जात नसल्यामुळे क्रीडा क्षेत्राचा पाया ठिसूळ हाेत चालला अाहे, हे राष्ट्रकुल स्पर्धेच्या या विजयाच्या पार्श्वभूमीवर अावर्जून नमूद करावेसे वाटते. एक तर नवयुवकांनी क्रीडा क्षेत्राकडे वळावे, असे अाश्वासक धाेरण नाही, शिवाय कारकीर्दीची हमी नाही; मग खेळायचे कशासाठी? असा प्रश्न त्यांच्या समाेर उभा राहिला तर चूक काेणाची? माेजक्या लाेकांच्या हाती असणारा क्रीडा संघटनांचा कारभार अाणि ते खपवून घेणारे सरकार हेच खरे दाेषी ठरत नाहीत का? अनुभवी खेळाडूंची एकाग्रता अाणि नव्या दमाच्या उत्साहाने ‘ग्लासगाे’चे सुवर्णयश मागे सारत ‘गाेल्ड काेस्ट’ अविस्मरणीय ठरवली असली तरी क्रीडा संघटनांना अार्थिक शिस्त लावणे गरजेचे नसावे का? सरकारकडून तूर्त निधी पुरवला जात असला तरी ताे बंद करावा किंवा त्यात कपात करावी, असा उपाय सुचवण्यात अाला अाहे, त्यामुळे क्राऊड फंडिंग करायचे म्हटले तरी ते जिकिरीचे ठरणारे अाहे. क्रीडा संघटनांना मदत द्यायला हवी, हे मान्य केले तरी त्यांनी ताे हक्क समजावा का? बॅडमिंटन, बुद्धिबळ संघटनांना जे जमू शकले ते अन्य क्रीडा संघटनांना का शक्य हाेत नाही? इथे उल्लेखनीय म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना प्रायाेजक मिळवण्यासाठी सरकारने विशेष कार्यक्रमाचे अायाेजन केले हाेते. मात्र, अाॅलिंपिक असाेसिएशन अाणि सरकारमध्ये खडाखडी झाली. क्रीडा संघटनांनी अात्मनिर्भर व्हावे, या भूमिकेवर सरकार ठाम राहिले, तर सरकारी अर्थसाहाय्याशिवाय पर्याय नसल्याच्या पवित्र्यावरून संघटना ढळल्या नाहीत. भारतीय क्रीडा क्षेत्राचे यश-अपयश या अर्थकारणातच दडलेले अाहे, हे वास्तव असले तरी क्रीडा क्षेत्राला प्राेत्साहन देण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाेबतच देशभर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या अाणि लालफितशाहीमुळे उद्भवणाऱ्या अडचणी नेटाने दूर केल्या तरच अाशियायी, अाॅलिंपिक स्पर्धेत भरभरून पदके मिळू शकतील.

Trending