Home | Editorial | Agralekh | divyamarathi article on Nawaz Sharif Interview

शरीफ यांची अपरिहार्यता (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - May 14, 2018, 02:00 AM IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी ‘डॉन’ या पाकिस्तानमधील प्रतिष्ठित दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत २६ नोव्हेंबर २००

 • divyamarathi article on Nawaz Sharif Interview

  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी ‘डॉन’ या पाकिस्तानमधील प्रतिष्ठित दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची कबुली दिली आहे. शरीफ यांच्या अशा कबुलीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची जी मोहीम गेली दहा वर्षे सातत्याने सुरू आहे त्याला लगेचच बळ मिळेल असे नाही, त्याचबरोबर चीन आपल्या जवळ येईल याचीही शाश्वती नाही.


  शरीफ यांनी मुंबई हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करण्यामागचे एक संभाव्य कारण असे असू शकते की, पाकिस्तानच्या सध्याच्या अस्थिर राजकारणात त्यांना भारताच्या मित्रदेशांकडून छुप्या राजकीय पाठबळाची आवश्यकता असावी. पाकिस्तानात लवकरच सार्वत्रिक निवडणुका होत असून सगळीकडून कोंडी झालेल्या नवाझ शरीफ यांना सुटकेची संधी हवी आहे. त्यांना त्यांच्या पक्षातून जाहीर आव्हाने वगैरे मिळालेले नाहीत. पण माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने शरीफ यांच्याविरोधात जोरदार कंबर कसली आहे. इम्रान खान यांचा पक्ष कट्टरवादी राजकारणाच्या जवळ जाणारा असून या पक्षाला मिळत असलेला वाढता पाठिंबा भारतासाठी धोका आहे. शनिवारी इम्रान खान यांनी एका सभेत शरीफ यांची तुलना भारतीय इतिहासात गद्दार ठरवण्यात आलेल्या मीर जाफरशी केलेली आहे.


  सेनापतिपदी असलेल्या मीर जाफर याने १७५७च्या प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराज-उद्दौला याच्याविरोधात कपट-कारस्थान करून ईस्ट इंडिया कंपनीला मदत केली होती. या मदतीच्या बदल्यात ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीची लढाई जिंकून मीर जाफरला बाहुला म्हणून बंगालच्या गादीवर बसवले होते. इतिहासाचा हा संदर्भ इम्रान खान यांनी सभेत दिला यावरून इम्रान खान यांचे राजकारण कोणत्या दिशेला जात आहे याची कल्पना येते. इम्रान खान हे नवाझ शरीफ यांच्या तुलनेत अधिक भारतविरोधी आहेत. ते लोकप्रिय असले तरी त्यांना भारताशी संबंध चांगले हवेत या दृष्टीने त्यांनी काही विधाने केलेली नाहीत. त्या अर्थाने शरीफ यांनी मुंबई हल्ल्यासंदर्भात जे काही विधान केलेले आहे त्याने आपण हुरळून जाण्याचे कारण नाही.


  उलट आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. पंतप्रधानपदावर असताना नवाझ शरीफ यांनी मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी गट कार्यरत होते असे विधान केले असते तर तो भारताच्या राजनैतिक दबावाचा नि:संशय विजय मानला गेला असता, त्याने पाकिस्तानच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली असती व पाकिस्तानचे सत्ताधीश खरे बोलले याची इतिहासात नोंद झाली असती. पण शरीफ दुधखुळे नाहीत, ते कसलेले नेते आहेत. त्यांनी पंतप्रधानपदावर असताना २६/११ च्या खटल्यात भारताला मदत केलेली नाही. उलट पाकिस्तानने नेहमीच कसाब आपला नागरिक नाही अशी भूमिका घेत मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून लष्करी प्रशिक्षण वा मदत नव्हती असे अनेकदा जाहीर केलेले आहे.

  त्यामुळे या घडीला मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची कबुली देण्यामागे शरीफ यांची राजकीय अपरिहार्यता आहे. त्यांचा रोख तहरिक-ए-इन्साफकडून पाकिस्तानातील दहशतवादी गटांच्या होत असलेल्या लांगूलचालनावर अधिक आहे. तेहरिक-ए-इन्सानचे अफगाणिस्तान व भारतात ज्या दहशतवादी टोळ्या थैमान घालत असतात त्याच्याप्रति स्पष्ट धोरण नाही. त्या तुलनेत शरीफ यांना भारताशी संघर्ष नको आहे.


  ‘डॉन’ला दिलेल्या मुलाखतीत शरीफ यांनी आणखी एक पण अत्यंत महत्त्वाचे विधान केलेले आहे. ते म्हणतात, ‘देशात एकाच वेळी दोन-तीन समांतर सरकारे असतात तेव्हा देशाचा गाडा हाकणे अशक्यप्राय असते. अशा वेळी घटनात्मक पद्धतीने निवडलेल्या सरकारकडे देशाची संपूर्ण सूत्रे देण्याची गरज आहे.’ नवाझ शरीफ यांना पदच्युत करण्यामागे तेथील लष्कर व न्यायव्यवस्था यांचे साटेलोटे होते हे उघड गुपित आहे.


  या साट्यालोट्याचे परिणाम शरीफ यांची ज्या पद्धतीने मुस्कटदाबी सुरू झालेली आहे त्यातून स्पष्टपणे दिसते. शरीफ यांचीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांची व त्यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाची राजकीय कोंडी करण्यासाठी सर्वच विरोधी गट एकत्र येत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील ‘नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो’(नॅब) कडून शरीफ यांची भारतात कथित मार्गातून सुमारे साडेचार अब्ज डॉलर एवढा पैसा पाठवल्याबाबत चौकशी सुरू आहे. या ‘नॅब’ने जागतिक बँकेचा एक अहवाल पुढे करत हा एवढा प्रचंड पैसा भारतात पाठवल्याने पाकिस्तानचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला आहे. या दाव्याला शरीफ यांनी जाहीर आव्हान दिले आहे. एकुणात पाकिस्तानच्या राजकारणात अनेक धोके जन्मास येत आहेत हे स्पष्ट दिसत आहे.

Trending