आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्टरवाद्यांच्या अराजकाची नांदी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिपुरापासून ते काश्मीरपर्यंत आणि दिल्लीपासून ते केरळपर्यंत एकट्या- दुकट्या माणसाला जमावाने वा एका दोघांनी घेरून अमानुष मारहाण करत सार्वजनिकरीत्या ठार मारण्याचा हा कसाई ट्रेंड आता आपल्या देशात नकळत रुजलाय. काही वर्षांपूर्वी परप्रांतीय मजुरांना चोर ठरवत अमानुष जिवे मारल्याची घटना जेव्हा मणिपूर येथे घडली होती तेव्हा सगळ्या देशातील वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्याला मोठी स्पेस दिली होती. आता मात्र अशा हत्या ही नित्याचीच बाब होऊन बसलीय. 
 
प. बंगालच्या माल्डाहून आलेल्या ४७ वर्षीय मुहंमद अफराजुल या ठेकेदारास राजस्थानातील राजसमंद येथे आयसिसच्या हत्याऱ्याप्रमाणे आधी गळा चिरून, नंतर मारहाण करून जिवंत जाळून मारले गेले. शंभूलाल रेगर या नराधमाने ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हे निर्घृण कृत्य केले. इतके करून त्याचे समाधान झाले नाही, आपली दहशत बसावी, या घटनेमुळे मुसलमानांनी भ्यावे, यासाठी त्याने या कृत्यादरम्यान याचा व्हिडिओ एका अल्पवयीन नातेवाइकास काढायला लावून तो व्हॉट्सअॅपवर पोस्ट केला. काही क्षणांमध्येच संपूर्ण देशभरात हा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तो पोस्ट करण्यात आला, तो भाजपच्या नेत्याने तयार केलेला होता. त्यामुळे याचे संबंध भाजपशी जोडले गेले. या घटनेनंतर भाजपच्या त्या नेत्याने ‘शंभूलालशी आपला कसलाही संबंध नाही’ अशी भूमिका घेतली. 
 
वास्तवात वसुंधरा राजेंचे सरकार सत्तेत आल्यापासून राजस्थानमध्ये सामाजिक परिस्थिती आणि जातीय धार्मिक सलोखा बिघडल्याच्या पुष्कळ घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर आणि देशात हिंदुत्ववादाचा, हिंदूराष्ट्राचा अजेंडा राबवू इच्छिणाऱ्या सरकारचा अंमल सुरू झाल्यापासूनच्या एकंदर घटना पाहता या घटनेकडे त्याच नजरेने पाहणे क्रमप्राप्त ठरते. एप्रिल महिन्यात स्वयंघोषित गोरक्षकांनी पेहलू खान या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याची हत्या केली. ही हत्या करणाऱ्या खऱ्या मारेकऱ्यांना अजूनही अटक झालेली नाही आणि ज्या अन्य आरोपींना अटक झाली ते जामिनावर बाहेर आलेत.  
 
देशभरात गायीच्या कथित कत्तलीवरून, गोमांस बाळगल्यावरून, गायीचे चामडे काढल्यावरून अनेक हत्याकांडे, दंगली, जाळपोळ घडलेत. त्या वेळी केवळ भारतातून नव्हे, तर जगभरातून यावर टीकेची तीव्र झोड उठल्यावर मोदींनी गायीला गोंजारावं तसं गोरक्षकांना गोंजारून पाहिलं. पण हे सोंग होते. याचे नकळत होणारे परिणाम स्वरूप म्हणून आणि हिंसेचा लंबक सगळीकडे झुलत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्रिपुरापासून ते काश्मीरपर्यंत आणि दिल्लीपासून ते केरळपर्यंत एकट्या-दुकट्या माणसाला जमावाने वा एका दोघांनी घेरून अमानुष मारहाण करत सार्वजनिकरीत्या ठार मारण्याचा हा कसाई ट्रेंड आता आपल्या देशात नकळत रुजलाय. काही वर्षांपूर्वी परप्रांतीय मजुरांना चोर ठरवत अमानुष जिवे मारल्याची घटना जेव्हा मणिपूर येथे घडली होती तेव्हा सगळ्या देशातील वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्याला मोठी स्पेस दिली होती. आता मात्र अशा हत्या ही नित्याचीच बाब होऊन बसलीय. मीडियाला यातले स्वारस्य नाही, अशातला भाग नाही, मेलेला कुठल्या जाती-धर्माचा होता आणि मारणारे कोणत्या जाती-धर्माचे आहेत यावरून अशा बातम्यांची स्पेस ठरते आणि तिला किती उचलून धरायचे हे ठरते. हे लोकशाहीसाठी जितके घातक आहे त्याहून अधिक पत्रकारितेसाठी घातक आहे. याहून वाईट गोष्ट अशी की, मारेकरी जमाव हा ज्याला मारत असतो त्याच्या जातधर्माबद्दल त्याला पराकोटीची घृणा असते. 
 
काही दशकांपूर्वी एकमेकाला भाईचाऱ्याचे आदर्श देणाऱ्या लोकमानसात इतका हिंसात्मक तिरस्कार कोठून आला याचे उत्तर शोधायला आपल्याला दूर जावे लागणार नाही, आपल्या हातातीलमोबाइल, चोवीस तास भडक स्वरूपाचं वार्तांकन करणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि गरळ ओकणारा सोशल मीडिया हे घटक यासाठी पायाचे दगड ठरले आहेत.
 
महाराष्ट्रातले दाभोलकर, पानसरे हत्याकांड असो वा कर्नाटकातील कलबुर्गी, गौरी लंकेश हत्याकांड असो अशीच क्रूरता आणि तिरस्कार अनुभववास आला. अद्यापही या घटनांचा तपास थंड्या बस्त्यात आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी भिन्न पक्षांची सरकारे आहेत. देशभरात या हत्यांचे अराजक कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र माजलेले आहे.  
 
ज्या शंभूलाल रेगरने ही हत्या केली त्याने हत्या केल्यानंतर दाखवण्यासाठीचे प्रक्षोभक व्हिडिओ हत्येपूर्वी काही दिवस आधीच तयार करून ठेवले होते. तो काही कामधंदा करत नव्हता, त्याची पत्नीच पोटापाण्याचे बघत होती. दिवसभर गांजा ओढायचा, मोकाट फिरायचे वा घरी बसून राहिल्यास भावना भडकावणारे व्हिडिओ पाहायचे हा त्याचा आवडता उद्योग होता. त्याने बऱ्याच मोठ्या रकमेचे कर्जही घेतले होते, याचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. कारण शंभूलालला अटक झाल्यानंतर त्याला धर्मसैनिक ठरवत त्याच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचे आवाहन केले गेले आणि तीन दिवसांत अडीच लाख इतकी रक्कम त्याच्या खात्यावर जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शंभूलालने ज्यांच्याकडून पैसे घेतले होते त्यांचा त्याच्यामागे सारखा तगादा सुरू होता त्यापासून कशी सुटका मिळवायची आणि पैसेही कसे जुळवायचे याचे उत्तर त्याला मिळत नव्हते. याच दरम्यान त्याच्या डोक्यातील मुसलमान विरोधाने पराकोटीची सीमा गाठली होती. त्याच्या डोक्यात ज्याला मारायचे होते ती व्यक्ती ही नाही हेदेखील त्याला कळले नाही, इतका द्वेष त्याच्या ठायी साठला होता. व्यक्तिगत द्वेषापायी त्याने अफराजुलची हत्या केली आणि लोकांच्या भावना भडकाव्यात याकरिता त्याला ‘लव्ह जिहाद’चा रंग देण्याचा प्रयत्न केला.  
 
अपेक्षेप्रमाणे पंतप्रधानांनी या घटनेचा निषेध केला नाही. जो पक्ष संसदेपासून ते विविध राज्यांच्या विधानसभेत मुसलमानांनी येऊ नये यासाठी त्यांना उमेदवारी देणेच बंद करत आहे त्या पक्षाकडून अशी अपेक्षा करण्यात काय हशील? मोदीजी हे भाजपचे पंतप्रधान नसून देशातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांचे नायक आहेत, याचा विसर पडावा हे खेदजनक आहे. मात्र, त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे काही बेलगाम हिंदुत्ववाद्यांना चेव चढतो आणि त्यातून जन्माला येतो तो धर्मविघातक अंधोन्माद. याचीच प्रचिती म्हणजे शंभूलालला न्यायालयात नेत असताना शेकडोंचा जमाव गोळा झाला, काहींनी भगवा ध्वज नाचवत शंभूलाल हाच आपला हीरो असल्याच्या घोषणा दिल्या. या वेळी पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते, पण जेव्हा बघ्यांची संख्या वाढू लागली, रहदारी तुंबू लागली तेव्हा पोलिसांनी या निदर्शकांच्या म्होरक्यास अटक केली. तो राजस्थान भाजयुमोचा पदाधिकारी निघाला. एका माणसाला बेदम मारून जिवंत जाळले जाते आणि काहीशे लोक त्या मारेकऱ्याच्या समर्थनार्थ गोळा होऊन झुंडशाही करतात आणि प्रशासन कारवाईचा फार्स करत राहते हे सगळेच धक्कादायक आणि असमर्थनीय आहे.  
 
धर्मद्वेषाची पाळेमुळे खणताना मीडियाचा पंचनामा अनिवार्य आहे. काही वृत्तवाहिन्यांवरून रोज न चुकता ‘आयसिस’ या कडव्या इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेकडून केल्या जाणाऱ्या निर्घृण हत्यांचे व्हिडिओ प्रसारित करण्यात कदाचित इस्लामद्वेषाची भावना वाढीस लागावी हाच हेतू असू शकतो. इंटरनेटवर बंदी घातलेले व्हिडिओदेखील आपल्या काही वाहिन्या धूसर करून दाखवतात! याला प्रत्युत्तर म्हणून त्यांना धडा शिकवण्याची भाषा केली जाते. याचे कर्ते करविते राजकारणी असतात आणि डोक्यात कट्टरतावाद रुजत चाललेले तरुण त्याला बळी पडतात! परिस्थिती हाताबाहेर गेल्यास सर्वोच्चपदी नेता कोणताही असला तरी गर्दीचे मानसशास्त्र त्याला जुमानत नसते, असा आजवरचा इतिहास सांगतो. क्रियेला प्रतिक्रिया म्हणून माणसे मारली जाणार असतील तर आपण ‘आयसिस’च्या पुढे जातो आहोत कारण ‘आयसिस’ जिथे धुमाकूळ घालते आहे तो सैनिकी प्रशासनाचा अंमल असणारा देश आहे आणि आपल्याकडे लोकशाही आहे. 
 
हिंदुत्ववाद्यांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपणच निवडून दिलेले बहुमतातले सरकार डावलून धर्मद्वेषापायी मुसलमानांच्या हत्या कराव्या वाटत असतील, त्या हत्यांचे समर्थन करावेसे वाटत असेल तर खऱ्या अर्थाने ते हिंदुत्ववादाचे विच्छिन्न रूप असेल.
 
इस्लामी वा हिंदू दोन्ही धर्मांतील धर्मप्रसारकांकडून याला वेसण घालण्यासाठी कोणतेही ठोस उपाय योजले जात नाहीत ही बाबही येथे दुर्लक्षित करता येत नाही. कट्टरतावाद्यांच्या अराजकाची ही नांदी आपल्या नेत्यांना समजत नसेल यावर कोणी विश्वास ठेवणार नाही.   \\
 
- समीर गायकवाड (राजकीय-सामाजिक विश्लेषक) 
sameerbapu@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...