आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिव्यक्तीचा 'ऑस्कर' सोहळा ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यानंतर ज्या काही सामाजिक, राजकीय घडामोडी घडत आहेत त्याचे प्रतिबिंब प्रतिष्ठित अशा ९० व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दिसून आले. ट्रम्प यांचे प्रत्यक्ष नाव न घेता हॉलीवूडमधील वांशिक वैविध्य व या इंडस्ट्रीमध्ये महिलांचे होणारे लैंगिक शोषण यावर अनेक तारकादळांनी आपली स्पष्ट व थेट मते मांडली. या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या अमेरिकी व्यवस्थेला नजीकच्या मेक्सिको देशातून होणाऱ्या स्थलांतराचे वावडे आहे. त्याच मेक्सिकोची छाप या सोहळ्यावर दिसून आली. महत्त्वाचे म्हणजे गेल्या पाच वर्षांत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पाचपैकी चार पुरस्कार मेक्सिकन कलावंतांनी पटकावले होते तोच ट्रेंड या वेळीही दिसून आला. मेक्सिकोत जन्मास आलेल्या गिलेर्मो देर तोरो या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या ‘शेप ऑफ वॉटर’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट व त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. तर १२ वर्षाच्या मेक्सिकन मुलाला संगीतकार होण्याची इच्छा असते त्याच्या धडपडीवर आधारित अॅनिमेशन चित्रपट ‘कोको’ला सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपट व सर्वोत्कृष्ट गीत या वर्गातले ऑस्कर पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट परकीय भाषेतील चित्रपट म्हणून चिली देशातील ‘ए फँटॅस्टिक वुमेन’ या चित्रपटाला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार देताना ऑस्कर समितीने जगभर गाजलेल्या ‘वेस्ट साइड स्टोरी’ या चित्रपटातील सहनायिका व या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहनायिकेचा ऑस्कर पुरस्कार मिळवलेल्या रिटा मोरेनो हिला खास आमंत्रित केले होते. रिटा मोरेनो ही प्युर्टो रिका देशाची अभिनेत्री आहे. ऑस्करने कलेपुढे वांशिक सीमारेषा व्यर्थ असल्याचे यानिमित्ताने दाखवून दिले.

    
काही वर्षांपूर्वी ऑस्कर सोहळ्यावर गोऱ्यांचे वर्चस्व असल्याची टीका झाली होती. ही टीका पुन्हा होऊ नये याची काळजी ऑस्कर समितीने घेतलेली दिसून आली. त्यामुळे यंदाचा सोहळा हा कोणा एका वांशिक समूहाचा सोहळा न राहता या सोहळ्यात पृथ्वीवर राहणाऱ्या शेकडो भाषा, जाती, वंशांचे प्रतिनिधित्व दिसून आले. त्याचे उदाहरण ‘गेट आऊट’ या चित्रपटाच्या पटकथेला सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार देण्यातून दिसते. या चित्रपटाची पटकथा अमेरिकेतील एका उदारमतवादी समजल्या जाणाऱ्या उपनगरातील सुप्त असलेला वंशभेद पडद्यावर साकारते. या चित्रपटाचा पटकथाकार जॉर्डन पिली याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. जॉर्डन हा आफ्रिकन अमेरिकन आहे. या सोहळ्यात महिला हक्कांसाठी सर्व हॉलीवूड एकत्र येत असल्याचेही चित्र दिसून आले. महिलांचे हक्क, त्यांचा व्यवस्थेविरोधातील संघर्ष असे विषय जगभरातल्या चित्रपटांचा एक मुख्य विषय होताना दिसत आहे. यंदाच्या ऑस्कर यादीत ‘द शेप ऑफ वॉटर’ व ‘थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मिसुरी’ या दोन चित्रपटांची चर्चा होती. अंतिम यादीत पाच चित्रपट असले तरी या दोघांपैकी एक चित्रपट ऑस्कर पटकावेल असेच जगभरातील चित्रपट समीक्षकांचे मत होते. ‘द शेप ऑफ वॉटर’ हा चित्रपट शीतयुद्धातील फँटसी असला तरी तो एका मूक महिलेचा एका समुद्री जीवावर बसलेले प्रेम व त्याला वाचवण्यासाठी तिची धडपड यांनाही व्यक्त करणारा आहे. तर ‘थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मिसुरी’ हा चित्रपट लैंगिक समानता व स्त्री हक्क यांना केंद्रस्थानी ठेवत बलात्कार झालेल्या आपल्या मुलीला न्याय मिळवून देणाऱ्या आईचा संघर्षपट आहे. या दोन चित्रपटांच्या केंद्रस्थानी महिला व तिचे भावविश्व असल्याने आणि या दोन्ही चित्रपटांचे विषयही वेगळे असल्याने ऑस्कर समितीने या दोघांना पुरस्कार देऊन त्यांची दखल घेतली. ‘थ्री बिलबोर्ड्स...’ या चित्रपटात काम करणाऱ्या फ्रान्सिस मॅकडोरमंड या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. फ्रान्सिसने आपल्या भाषणात महिलांचे भावविश्व दाखवणाऱ्या विपुल कथा आहेत, पण त्यासाठी चित्रपटसृष्टीने पुढे आले पाहिजे, कॅमेऱ्याच्या पलीकडे काम करणाऱ्या वर्गाची दखलही घेतली पाहिजे असे आवाहन केले. हाच धागा पकडत सलमा हायेक, अॅश्ले ज्यूड व अॅनाबेला स्किओरा या तीन अभिनेत्रींनी हॉलीवूडमध्ये निर्मात्यांकडून महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाचाही मुद्दा पुन्हा मांडला. गेल्या महिन्यात गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सर्व महिला अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या हार्वे विनस्टेन या प्रभावशाली चित्रपट निर्मात्याच्या कथित कृत्याचा निषेध म्हणून काळा वेश परिधान केला होता. ऑस्कर सोहळ्यात जवळपास सर्वच हॉलीवूड अभिनेत्री लैंगिक शोषणाविरोधात एकजूट करताना दिसल्या. चित्रपट माध्यम हे केवळ मनोरंजनासाठी नसून ते व्यापक मानवी अभिव्यक्ती, हक्क व शोषणविरहित समाज निर्मितीचे माध्यम आहे हे यानिमित्ताने दिसून आलेे. प्रकाश राज वा अमोल पालेकर वगळता ही जाणीव दुर्दैवाने आपल्याकडील पुरस्कार सोहोळ्यात दिसत नाही.

बातम्या आणखी आहेत...