आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडव्या हिंदुत्वाला सुरुंग ( अग्रलेख )

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्याच आठवड्यात २५ वर्षे डाव्यांचा गड असलेले त्रिपुरा राज्य हातात आल्यानंतर भाजपमध्ये मोठा उत्साह आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आपला विजय विचारधारेचा असल्याचे सांगत पक्षात चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला होता. या चैतन्यामुळे दोन आठवडे त्रिपुरा विजयाचा सोहळा माध्यमात वारंवार दाखवला जात  असताना उत्तर प्रदेशातील गोरखपूर व फुलपूर आणि बिहारमधील अररिया व जहानबाद या लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात हार पत्करावी लागली. भाजपचे डोळे पांढरे करणारा, योगी आदित्यनाथ यांच्या साम्राज्याला भगदाड पाडणारा व पक्षातील तमाम बुजुर्ग चाणक्यांना चकवा देणारा असा हा पराभव आहे. या पराभवाची चिकित्सा भाजपचे चाणक्य कसे करतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे. कारण ज्या गोरखपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक झाली तो मतदारसंघ भाजपकडे गेली २८ वर्षे आहे. सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ. तेथे ते गेली पाच वर्षे निवडून येत आहेत. त्याअगोदर दोन वेळा त्यांचे गुरू अवैद्यनाथ तेथून निवडून आले होते. या मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांचे कडवे हिंदुत्व मांडणारी त्यांनीच स्थापन केलेली युवा हिंदू सेना आक्रमकपणे राज्य करते. या आक्रमक हिंदुत्वाच्या राजकारणामुळे योगी आदित्यनाथ यांनी २०१४मध्ये भाजपला उत्तर प्रदेशात ८० पैकी ७२ लोकसभा जागा व २०१७मध्ये तीनशेहून अधिक विधानसभा जागा जिंकून दिल्या होत्या. या दोन महत्त्वाच्या व निर्विवाद विजयांमुळे भाजपची केंद्रातील सत्ता शक्तिशाली झाली होती. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ यांचे भाजपमधील राजकीय वजनही कमालीचे वाढले होते. ते इतके वाढले होते की गेल्या वर्षभरात देशात जिथे काही विधानसभा निवडणुका झाल्या तेथे योगी आदित्यनाथ यांना पक्षाकडून प्रचारासाठी पाचारण करण्यात येत होते. गुजरातमध्ये मोदींची पीछेहाट पाहून पक्षाने त्यांच्या सभा जागोजागी लावल्या होत्या. मोदींनंतर योगी आदित्यनाथ हा भाजपचा चेहरा असल्याची ही तशी मोहीमच होती. मोदींनी जसे विकासाच्या मुद्द्याआडून कडवे हिंदुत्व आणले त्याच मार्गावर योगी आदित्यनाथ चालत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशात गुंतवणूक आणण्यासाठी भव्य जंगी कार्यक्रम हाती घेतला होता. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात पुन्हा भगवी लाट आणावयाची झाल्यास विकासाचा मुद्दा पुढे करता येईल अशा पद्धतीने ही पावले होती. पण सपा व बसपाच्या अनपेक्षित युतीने-जातीय समीकरणाने- योगी आदित्यनाथ यांचा गडच उद्ध्वस्त झाला. महत्त्वाची बाब म्हणजे सुमारे २५ वर्षांपूर्वी बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाला रोखण्यासाठी सपा व बसपा यांनी युती केली होती, त्याचीच पुनरावृत्ती करत या दोन्ही पक्षांनी भाजपला दोन्ही मतदारसंघांत अस्मान दाखवले. भाजपने उत्तर प्रदेशातील लोकसभा व विधानसभा जागा जिंकल्यानंतर सर्व जातींना एकत्र आणल्याचा दावा केला होता. हा दावा मान्य केला तरी केवळ एका वर्षात योगी आदित्यनाथ यांच्या कारभाराविरोधातील नाराजी का व्यक्त झाली, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. भाजपचा झालेला पराभव त्यांनी राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडवल्यामुळे झालेला आहे हे स्पष्ट आहे.         


एक गोष्ट महत्त्वाची की, चारही लोकसभा जागांमधील पराभवानंतर भाजपला २०१९ची लोकसभा िनवडणुकांची रणनीती नव्याने तयार करावी लागणार आहे. कारण या पक्षाने आपल्या आघाडीतील बऱ्याच मित्रपक्षांना दुखावले आहे. हे दुखावलेले मित्रपक्ष भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरतील अशीही परिस्थिती आहे. भाजपच्या हिंदुत्ववादी विकासवादी (?)  राजकारणाला रोखण्यासाठी प्रादेशिक पक्षांची जातीय समीकरणे कामी येतात हे पूर्वीही सिद्ध झाले आहेत. तसाच प्रयोग २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये होणार हे साफ आहे. मंगळवारी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी १९ पक्षांची बैठक झाली होती. या बैठकीत भाजपला रोखण्यासाठी संभाव्य राजकीय चाली काय असू शकतात यावर मंथन झाले होते. कदाचित २००४ सारखी मोठी राजकीय मोट भाजपच्या विरोधात उभी राहू शकते. ही मोट निश्चितच भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे. बिहारमध्ये नितीशकुमारांशी लगट करून भाजपला काही साध्य झालेले नाही असेही दिसून येते. तेथे लालूंच्या राजदने दोन्ही लोकसभा जागा राखल्या आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्ये लोकसभा निवडणुका कोणत्या पद्धतीने खेळल्या जाऊ शकतात याचे दिशादर्शन करत असतात. भाजपमधील चाणक्यांना हिंदुत्वाला लागलेला सुरुंग समजून घ्यावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...