Home | Editorial | Agralekh | divyamarathi editorial article on mystery of the shortage of cash

नोटटंचाईचे गूढ (अग्रलेख)

दिव्या मराठी | Update - Apr 19, 2018, 02:00 AM IST

भारतातील काही राज्यांतील एटीएमवर नोटांचा खडखडाट झाल्यावर देशभर चर्चेला उधाण आले. कोणतेही संयुक्तिक कारण दिसत नसताना नोटा

  • divyamarathi editorial article on mystery of the shortage of cash

    भारतातील काही राज्यांतील एटीएमवर नोटांचा खडखडाट झाल्यावर देशभर चर्चेला उधाण आले. कोणतेही संयुक्तिक कारण दिसत नसताना नोटांची टंचाई का निर्माण व्हावी, हा प्रश्न आहे. नोटबंदीच्या काळात सरकारनेच नोटा काढून घेतल्या होत्या. यावेळी तसे काहीही झालेले नाही. ही टंचाईही, सर्वत्र नव्हे तर काही भागातच आली. नोटबंदीसारख्या कारणामुळे ही टंचाई आली असती तर ती सर्वत्र आली असती. तसे घडलेले नसल्यामुळे यामागे वेगवेगळी कारणे संभवतात. अर्थशास्त्रीय वृत्तपत्रात त्याची व्यवस्थित चर्चा झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत कर्नाटक व आंध्र प्रदेश या भागातून पैसे काढून घेण्याचे प्रमाण अचानक वाढले. गेल्याच आठवड्याच बिझिनेस स्टॅन्डर्ड वृत्तपत्राने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या राज्यांसह अन्य मोजक्या ठिकाणी पैसे भरणाऱ्यांपेक्षा पैसे काढणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे त्यात म्हटले होते. विशेषत: दोन हजारांच्या नोटा काढून घेतल्यावर त्या पुन्हा बँकेत भरण्याचे प्रमाण कमी झाले होते. म्हणजे रोकड जमविण्याचा उद्योग सुरू झाला होता. निवडणुकीच्या काळात असे उद्योग का होतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र नोटटंचाईचे हे एकमेव कारण नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. अन्य कारणांमध्ये काही कारणे मानसिक तर काही तांत्रिक आहेत. बँकांना दिवाळखोरीतून वाचविण्यासाठी त्याच बँकातील ठेवींचा उपयोग करून घेण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. हा प्रस्ताव सध्या संसदीय समितीसमोर आहे व त्यावर निर्णय झालेला नाही. प्रस्ताव आला तेव्हा लोकांचा पैसा धोक्यात आहे अशी ओरड झाली होती. तरीही पैसे काढून घेण्याचे प्रमाण त्यावेळी वाढले नव्हते. ते अचानक गेल्या तीन महिन्यांत वाढले. वरील प्रस्तावामुळे लोकांच्या मनात थोडी धास्ती होती, पण नीरव मोदी व चंदा कोचर प्रकरणानंतर या धास्तीमध्ये भर पडली. बँकांवर जनतेचा बराच भरवंसा आहे. राष्ट्रीय बँकेतील पैसे सुरक्षित आहेत या भावनेने नागरिक निर्धास्त जीवन जगत असतात. त्या विश्वासाला या प्रकरणांनी तडा गेला. त्यानंतर पैसा काढण्याची लाट आली काय, याचा तपास केला पाहिजे. परंतु हे कारणही पुरेसे संयुक्तिक वाटत नाही. कारण लोकांचा बँकावरील विश्वास उडाला असेल तर तेथून काढलेले पैसे सोने व जमीन खरेदीसारख्या सुरक्षित क्षेत्रात गुंतवले जाणे अपेक्षित होते. तसेही झालेले नाही. तेव्हा तीन महिन्यांत काढला गेलेल्या कोट्यवधीच्या नोटा गेल्या कुठे हे गूढ राहते. यातील तांत्रिक कारणे वेगळी आहेत. अनेक एटीएम अद्याप अद्यायावत झालेली नाहीत. बँकांनी तिकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. २००च्या नव्या नोटांसाठी अनेक एटीएममध्ये सोय करण्यात आलेली नाही. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालानुसार एटीएमची संख्या गेल्या दोन वर्षांत कमी झालेली आहे. एटीएमच्या सुरक्षेवर बँकाना बराच खर्च करावा लागतो व तो खर्च ग्राहकांकडून वसूल करण्याची परवानगी बँकांना नाही. असे हे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत.


    मात्र गुंतागुंत आहे म्हणून सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. चलनातून नोटा कमी होत आहेत हे लक्षात येताच सरकारने पावले उचलली असती तर हा गोंधळ उडाला नसता. रिझर्व्ह बँक म्हणते चलनात पर्याप्त नोटा आहेत, बँकेचे चार छापखाने वेळ पडल्यास नोटा छापू शकतात. आज नोटांचा तुटवडा दिसतोय त्याचे कारण छापलेल्या नोटा एटीएम सेंटरपर्यंत पोहोचण्यास येणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी. ही कारणे पटणारी नाहीत. कॅशलेस डिजिटल व्यवहारांना लोकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. कॅशलेस व्यवहार वाढले असले तरी रोकडीवर जास्त विश्वास आहे. याचे कारण डिजिटल व्यवहारांना आवश्यक असणारे इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या दीड वर्षात वाढलेले नाही. कालच्या गोंधळानंतर बँकांनी त्वरीत पावले उचलली व आज टंचाई बरीच कमी झाली असे सांगितले जाते. बँकात कॅश कमी येत आहे हे लक्षात येताच ही पावले उचलली असती तर फजिती झाली नसती. आजच्या घडीला बँकिंग व्यवस्था व सरकार या दोघांविषयी लोकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. तो टाळता आला असता. अर्थव्यवस्था स्वच्छ करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय उपयोगी पडला हे त्यांच्या विरोधकांनाही


    आडवळणाने का होईना मान्य करावे लागते. मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी कार्यक्षमतेने झाली नाही व सरकार गोत्यात आले. आजची समस्याही कार्यक्षमतेशी संबंधीत आहे. बँकींग व्यवहार असो वा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असो, मोदी सरकारचा कारभार कार्यक्षम नाही, प्रशासनावर पकड नाही अशी भावना जनतेमध्ये निर्माण होत आहे. निवडणुकीच्या वर्षात हे ठीक नव्हे.

Trending