आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागुलबुवा दाखवणं पाकच्याच फायद्याचं!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन वर्षांत देशभर गोरक्षकांनी जो धुमाकूळ घातला आहे त्याबद्दल मोदी  खणखणीतपणे का बोलत नाहीत, नुसती संदिग्ध विधाने का करतात, समाजमाध्यमांवर विद्वेष पसरवणाऱ्यांना ते ‘टि्वटर’वर कसं ‘फॉलो’ करतात, असे प्रश्न विचारले जात आले आहेत. मोदी यांनी प्रचारसभेत केलेला आरोप बघता त्यांच्या मूकसंमतीनेच हा सगळा विद्वेष पसरवला जात आहे, असं अनुमान काढण्याविना दुसरं गत्यंतरच उरत नाही. 

 

‘आम्ही हरलो तर पाकिस्तानमध्ये फटाके वाजतील,’ असं बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं होतं. ही निवडणूक भाजप हरला, पण पाकिस्तानमध्ये फटाके काही वाजले नाहीत.  अर्थात तसे ते वाजणारही नव्हते. मात्र पाकिस्तानचा बागुलबुवा दाखवून मतदारांना भावनिक आवाहन करण्याचा भाजपचा हा प्रयत्न होता. तो फसला. 


आता गुजरातेतील निवडणुकीची पहिली फेरी पार पडली आहे आणि दुसरी फेरी परवा गुरुवारी होणार आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा बागुलबुवा दाखवून मतदारांच्या मनात ‘मुस्लिमांचा राज्याच्या राजकारणात वरचष्मा होईल,’ अशी भीती निर्माण व्हावी हा खटाटोप केला आहे. 


त्याचं असं झालं की, गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत भारत व पाकिस्तान संबंधाबाबत ‘ट्रॅक टू डिप्लोमसी’चा एक भाग म्हणून दोन्हीही देशातील राजनीतिज्ञ, वरिष्ठ लष्करी अधिकारी व अभ्यासक यांची बैठक झाली आणि त्यानंतर या सर्वांसाठी मेजवानीही आयोजित करण्यात आली होती. हे काही कटकारस्थान नव्हतं. अशा बैठका गेली कित्येक वर्षे भारतात, पाकिस्तानात किंवा तिसऱ्या देशात होतच आल्या आहेत. 


मोदी यांनी ही संधी साधली आणि गुजरातच्या निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करीत असल्याची आवई रविवारी एका प्रचार सभेत बोलताना उठवली आहे. एवढ्यावरच थांबतील तर ते मोदी कसले! माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही त्यांनी या वादात ओढलं. त्यांच्या उपस्थितीत ‘गुजरातेत भाजपाला हरवून अहमद पटेल यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा बेत आखण्यात आला,’ असा आरोपही मोदी यांनी केला. त्याही पुढे जाऊन मणिशंकर अय्यर यांनी वावदूकपणे व नादानपणे जो तोंडाळपणा केला त्याचा फायदा उठवत मोदी यांनी असा आरोप केला की, ‘अय्यर यांनी मला उद्देशून ‘नीच’ हा शब्द वापरला तो याच बैठकीनंतर.’ 


मोदी यांचं हे वक्तव्य पूर्णतः बिनबुडाचं आहे. केवळ निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी देशाचा पंतप्रधान इतक्या खालच्या थराला जाऊन माजी उपराष्ट्रपती व माजी पंतप्रधान यांच्यावर पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याचा आरोप ठेवतो हे बेछूट व बेदरकार प्रवृत्तीचं तर लक्षण आहेच, पण कोणताही विधिनिषेध न बाळगण्याची वृत्तीही त्यातून उघड होते. 


मोदी इतक्या थराला कसे काय गेले?  
खरं तर संघ, भाजप व मोदी यांचा राजकीय ‘डीएनए’च धार्मिक विद्वेषाचा अाहे. ‘विकास’ हा फक्त मुखवटा आहे. शेवटी ‘हिंदू राष्ट्र’ आणायचं आहे. म्हणजेच भारत हा ‘हिंदूंचा पाकिस्तान’ बनवायचा हे संघाचं-म्हणूनच मोदी यांचंही उद्दिष्ट अाहे. 


पाकिस्तानला नेमकं हेच हवं आहे. 
भारतातील मुस्लिमांना जितकं असुरक्षित वाटेल तितकी ‘बहुसंख्य हिंदूंच्या भारतात मुस्लिम असुरक्षित आहेत,’ या पाकिस्तानच्या भूमिकेला पुष्टीच मिळत राहते आणि ‘द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताचे आम्ही रक्षणकर्ते आहोत,’ या पाकिस्तान लष्कराच्या पवित्र्याला पाठबळ मिळत जातं. वस्तुतः भारतात हिंदू व मुस्लिम यांच्यात सलोखा राहणं म्हणजे पाकिस्तानपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा करणं आहे. जर हिंदू व मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत असतील तर ‘हिंदू व मुस्लिम ही वेगळी राष्ट्रकं आहेत, म्हणून मुस्लिमांना त्यांची वेगळी मायभूमी हवी,’ या पाकिस्तानच्या भूमिकेला ‘खो’च बसतो. 


हे मोदी व संघ यांना उमजत नाही असं थोडंच आहे? 
तरीही ते हा मार्ग अवलंबत नाहीत. कारण हिंदुत्वाचा विचार हा धार्मिक विद्वेषावरच अाधारलेला आहे आणि हिंदू राष्ट्र स्थापन करायचं तर ‘मुस्लिमांनी बहुसंख्याकांची संस्कृती मान्य केली पाहिजे,’ ही भूमिका घेतली जाणं अपरिहार्यच आहे. म्हणूनच ‘टोपीवाले व दाढीवाले यांंची देशातील संख्या कमी केली जायला हवी,’ असं प्रचार सभेत गुजरातेतील एक पुन्हा निवडणूक लढवणारा भाजप आमदार म्हणतो आणि त्याचीच ‘री’ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेशातील भाजप नेता ओढतो. राजस्थानात एका मुस्लिमाला कुऱ्हाडीने तुकडे करून त्याला जाळलं जातं. पण तो ‘केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न’ असल्याचं संघाचा प्रवक्ता वृत्तवाहिन्यांच्या चर्चेत सांगतो. 


गुजरातेतील निवडणुकीच्या ओघात ही अशी वक्तव्यं केली जात आहेत. समाजमनात विद्वेषाचं विष भिनवायची विशिष्ट कार्यपद्धती त्यामागे आहे. ...आणि ती अमलात आणली जात आहे, माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे संपर्काच्या साधनांत व माध्यम यातील स्थित्यंतराचा फायदा उठवून. निवडणुकीचं ‘व्यवस्थापन’ हे नवं शास्त्र आता उदयाला आलं आहे. जनमताचा कौल अाजमावण्याचं तंत्रही (सेफॉलॉजी) विकसित होत गेलं आहे. भारतीय निवडणूक ही ‘व्यावसायिक’ व ‘व्यापारी’ बनत गेली आहे. याचा उच्चांक गाठला गेला तो २०१४च्या लोकसभा निवडणुकीत. समाजमाध्यमांचा कौशल्याने केलेला वापर आणि हे नवं माध्यम व वृत्तपत्रं-वृत्तवाहिन्या यांच्यातील प्रचाराचा अतिशय कौशल्याने भाजपाने केलेला वापर या वैशिष्ट्यांमुळे त्यानंतरच्या सर्व निवडणुकांतील प्रचारांचं परिमाणच बदलून गेलं आहे. नोआम चोम्स्की यांनी जाहिरात क्षेत्रासाठी  ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट’ ही जी संकल्पना मांडली तिचाच भाजपने काँग्रेसच्या विरोधात जनमत घडवण्यासाठी पुरेपूर वापर केला. म्हणजे एखादी वस्तू ग्राहकाला खरेदी करायला लावायची असल्यास या वस्तूची आपल्याला गरज आहे हे त्याच्या मनात रुजवणं गरजेचं असतं. तोच जाहिरातीचा खरा उद्देश असतो.  त्याच निकषाने काँग्रेसच्या भ्रष्ट व अकार्यक्षम कारभारावर मोदी सरकार हाच एकमेव उतारा आहे हे मतदारांच्या मनावर बिंबवून भाजपला मत देणं गरजेचं आहे, हे त्यांना पटवणं - म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट- हा प्रचाराचा मुख्य रोख होता. त्याला यश मिळालं.  


मात्र जेथे मतदारांच्या मनाचा ठाव त्यांना भेडसावणाऱ्या समस्या घेतात तेथे असा बागुलबुवा दाखवून फारसं काही साधत नाही हे बिहारने सिद्ध केलं. अशा परिस्थितीत आपल्या समस्यांवर मतदारांना जो तोडगा अपेक्षित असतो तो अमलात आणण्यात येईल हा विश्वास त्यांना द्यावा लागतो. मतदारांपुढच्या समस्या या आर्थिक आहेत. त्यांच्या पोटाला चिमटा बसत आहे. त्यावर ‘अस्मिता’ हे उत्तर असू शकत नाही. खरं उत्तर हे व्यापक जनहिताच्या दृष्टिकोनातून राबवण्यात आलेलं आर्थिक धोरण हेच असू शकतं. तसं काही मोदी सरकारला गेल्या तीन वर्षांत उल्लेखनीयरीत्या करता आलेलं नाही, अन्यथा ज्या ‘गुजरात मॉडेल’चा एवढा गवगवा झाला ते परिणामकारकरीत्या अमलात आलं असतं तर इतक्या असंतोषाला मोदी व भाजप यांना तोंड द्यावंच लागलं नसतं आणि पाकिस्तानचा बागुलबुवा दाखवण्याचीही वेळ त्यांच्यावर आली नसती. गेल्या तीन वर्षांत देशभर गोरक्षकांनी जो धुमाकूळ घातला आहे त्याबद्दल मोदी  खणखणीतपणे का बोलत नाहीत, नुसती संदिग्ध विधाने का करतात, समाजमाध्यमांवर विद्वेष पसरविणाऱ्यांना ते ‘टि्वटर’वर कसं ‘फॉलो’ करतात, असे प्रश्न विचारले जात आले आहेत. मोदी यांनी प्रचार सभेत केलेला आरोप बघता त्यांच्या मूकसंमतीनेच हा सगळा विद्वेष पसरवला जात आहे, असं अनुमान काढण्याविना दुसरं गत्यंतरच उरत नाही. अन्यथा इतके बेछूट आरोप त्यांनी केलेच नसते!

 

- प्रकाश बाळ,  ज्येष्ठ पत्रकार
prakaaaa@gmail.com

बातम्या आणखी आहेत...