आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्व हिंदू परिषदेतील वादळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विचार सुटला आणि प्रवीण तोगडिया यांच्यातला ‘मीपणा’ जागृत झाला. मग संघटनेपुढे प्रश्न उभा राहिला की, संघटन चालवायचे की प्रवीण तोगडिया यांच्या मीपणाला 

खतपाणी घालत राहायचे? अशा वेळी संघटन एकच निर्णय करते आणि तो संघटनेला टिकवून ठेवण्याचा असतो. 

 

विश्व हिंदू परिषद हे संघ विचारधारेतील भाजपखालोखाल सर्वात मोठे जनसंघटन आहे. या जनसंघटनेला आजचे विशाल रूप देण्यात अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या जिवाचे रान केलेले आहे. दिवंगत अशोकजी सिंघल यांच्याकडे जेव्हा विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी आली, त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने व्यापक स्वरूप प्राप्त केले.  यात डॉ. प्रवीण तोगडिया यांचा वाटादेखील मोठा आहे. १९८३ सालापासून ते विश्व हिंदू परिषदेच्या कामात गुंतलेले आहेत. या कामासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले. १९८६ सालापासून विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा एक चेहरा प्रवीण तोगडिया झाले. प्रवीण तोगडिया आणि विश्व हिंदू परिषद असे समीकरण आपोआपच झाले. 

 
यामुळे ‘प्रवीण तोगडिया यांनी विश्व हिंदू परिषद सोडली’, ‘आंतरराष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी सोडले’ या बातम्या वाचायला आणि ऐकायलाही कठीण जातात.  विश्व हिंदू परिषदेत असे वादळ निर्माण झाले नसते तर बरे झाले असते, अशी सर्वांची भावना आहे. डॉ. प्रवीण तोगडिया यांनी संयम ठेवायला पाहिजे होता आणि तसेच संघ विचारधारेचा कुलाचार नीट समजून घेऊन त्याचे पालन करायला पाहिजे होते. या दोन्ही बाबतीत दुर्दैवाने ते कमी पडले आणि विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी उभे केलेले राघव रेड्डी यांचा पराभव झाला आणि व्ही. एस. कोकजे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांनी कार्यकारी अध्यक्षपदावर आलोक कुमार यांची नियुक्ती केली. डॉ. प्रवीण तोगडिया यांनी विश्व हिंदू परिषद सोडली. 

 
गेल्या काही वर्षांतील घटनाक्रम पाहता परिस्थिती या स्तराला जाईल, याचा अंदाज येत होता. जानेवारी महिन्यात प्रवीण तोगडिया आपल्या घरातून निघून गेले आणि  त्यांचे एकाएकी जाणे सनसनाटी बातमीचा विषय झाला. त्यानंतर ते एका उद्यानात बेशुद्ध अवस्थेत सापडले. नंतर ते म्हणाले की, पोलिस माझ्या मागावर आहेत आणि एन्काउंटर करून मला ठार मारण्याचा त्यांचा कट आहे. प्रवीण तोगडिया ही कुणी सामान्य व्यक्ती नव्हे. विश्व हिंदू परिषदेचे ते आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते. एन्काउंटरमध्ये सामान्यतः गुन्हेगाराला ठार केले जाते. एखाद्या संघटनेच्या नेत्याला कुणी असे मारत नाही. प्रवीण तोगडिया यांना हे सुचवायचे होते की, गुजरातचे भाजप सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी नको असल्यामुळे माझ्या जिवाचे काहीही बरे-वाईट होऊ शकते. माझ्याविषयीदेखील बनावट सीडीज तयार केल्या जाऊ शकतात. प्रवीण तोगडियांचे असे सुचवणे हा माध्यमांसाठी चर्चेसाठी चांगला विषय झाला. अशी वक्तव्ये करून आपण विश्व हिंदू परिषदेची प्रतिष्ठा कमी करत आहोत, त्याचप्रमाणे आपल्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहोत, हे प्रवीण तोगडिया यांच्या लक्षात आले नाही.  


संघविचारधारेतील कार्यकर्ता केव्हाही व्यक्तिनिष्ठ कार्य करत नाही.  व्यक्तीपेक्षा काम मोठे आणि कामामागचा विचार मोठा, हा खोलवरचा संस्कार त्याच्यावर झालेला असतो. डॉ. प्रवीण तोगडिया यांना हे माहीत नाही, असे नाही. या विषयावर त्यांनी अनेक वेळा भाषणेही दिली असतील. विश्व हिंदू परिषद म्हणजे हिंदुहित, हिंदू संघटन, समरस हिंदू समाजनिर्मिती, विश्व हिंदू परिषदेचे काम यासाठी करायचे. कुणाही व्यक्तीच्या जयजयकारासाठी नाही. डॉ. प्रवीण तोगडिया विश्व हिंदू परिषदेच्या या वैचारिक आशयाशी एकरूप झालेले होते, तोपर्यंत ठीक होते. त्यांची सभा असेल तर कार्यकर्ते जिवापाड मेहनत करून लाखो लोकांना एकत्र करत. प्रवीणजी उत्तम वक्ता असल्यामुळे आणि समर्पित असल्यामुळे त्यांच्या बोलण्याला एक धार येई. ते प्रचितीचे बोलणे वाटे. 

 
लाखांच्या सभा घ्यायची सवय लागली की, कळत-नकळत त्याची हवा डोक्यात जाते. माझ्यामुळेच लोक गोळा होतात. मी जननेता आहे, असे वाटू लागते. संघ विचारधारेतील संघटना लाखा-लाखांच्या सभा घेतात. संघाचे मेळावेदेखील काही लखांचे होतात, परंतु ते कुणाही व्यक्तीच्या आकर्षणाने होत नाहीत, अगदी सरसंघचालकांच्या आकर्षणानेही होत नाहीत. त्यामागे गंभीर विचार असतो.  विचार सुटला आणि प्रवीण तोगडिया यांच्यातला ‘मीपणा’ जागृत झाला. मग संघटनेपुढे प्रश्न उभा राहिला की, संघटन चालवायचे की प्रवीण तोगडिया यांच्या मीपणाला खतपाणी घालत राहायचे? अशा वेळी संघटन एकच निर्णय करते आणि तो संघटनेला टिकवून ठेवण्याचा असतो. व्यक्ती कितीही मोठी असली तरी संघटन तिच्यापेक्षा फार मोठे, हा संदेश संघटनेला द्यावा लागतो.  काही संघ कार्यकर्ते प्रवीण तोगडियांप्रमाणे बंड करतात. स्वतःला संघटनेपेक्षा मोठे मानायला लागतात आणि मग त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी लागते. जनसंघातदेखील अशा कारवाया केल्या गेल्या.

राष्ट्रीय नेते बलराज मधोक यांना पक्षातून दूर करण्याचा कठोर निर्णय करावा लागला. अन्य विचारधारांच्या संघटनांत काय होते, हे आपल्याला माहीत आहे. राजकीय पक्षात लोकनेत्याला बाहेर काढण्याची त्या पक्षातील कुणी हिंमत करत नाही. तेथे माणूस मोठा आणि विचार छोटा, या सिद्धांतावर काम चालते. संघ विचारधारेचे काम माणूस मोठा खरा, परंतु त्यापेक्षा विचार मोठा या सिद्धांतावर चालते.  


प्रवीण तोगडिया यांनी उपोषण करण्याची घोषणा केली, भाजप सरकार राम मंदिरासाठी काही करत नाही, मोदींच्या काळात कोणताही विकास झालेला नाही, मोदी सरकार हिंदुहिताची काळजी घेत नाही, असे आरोप त्यांनी केले आहेत. हे आरोप, ज्या हिंदू समाजाच्या वतीने त्यांनी केले आहेत, त्या हिंदू समाजाला ते खरे वाटत नाहीत. हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जाव्यात, असे नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत काहीही केलेले नाही, याउलट हिंदू माणसाला अभिमान वाटेल अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. पाकिस्तानच्या गोळीबाराला तोफगोळ्यांनी उत्तर दिले जाते, चीनच्या दादागिरीला कवडीची किंमत दिली जात नाही, अमेरिकेसारख्या बलाढ्य सत्तेला बरोबरीच्या नात्याने वागण्यास मोदींनी भाग पाडलेले आहे.  प्रवीण तोगडिया म्हणतात त्याच्या उलट स्थिती आज आहे. ज्या पद्धतीने काँग्रेस आणि त्यांचे डावे मित्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत, तो प्रयत्न आपल्या मुळावर येणार आहे, असे हिंदू माणसाला वाटते. सत्तर-एक वर्षांनंतर आपल्या हिताची चिंता करणारा पंतप्रधान लाभलेला आहे, तो हिंदू शत्रूंच्या मनात खुपतो, हे सामान्य हिंदू माणासला समजते, म्हणून तो जागरूक आहे आणि योग्य संधी येताच तो या सर्वांना चांगला धडा शिकवील. 

 
राम जन्मभूमीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. खटल्याची सुनावणी सुरू होईल. बहुधा राम जन्मभूमीवर मंदिर बांधण्याचा मार्ग खुला होईल. ते बांधण्याच्या कामात नरेंद्र मोदी किंवा भाजप कसल्याही प्रकारचा गतिरोध निर्माण करू शकत नाहीत. गतिरोध निर्माण करण्याचे त्यांना काही कारण नाही. मुसलमानांची मते मिळावीत म्हणून त्यांचे तुष्टीकरण करण्याचे धोरण या सरकारचे नाही. हे सरकार आपण सर्व भारतीय आहोत आणि सर्वांचा विकास करायचा आहे, या भावनेतून काम करते. हिंदू माणसाचीदेखील तीच अपेक्षा आहे.
सर्वांना सारखा न्याय द्या, कुणालाही डोक्यावर बसवू नका, एवढी माफक अपेक्षा हिंदू माणसाची आहे. आपले सरकार ती पूर्ण करत आहे. प्रवीण तोगडिया म्हणतात ती वस्तुस्थिती नाही. नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची व्यक्तिगत स्पर्धा राहू शकते, तो मनुष्य स्वभाव आहे, परंतु व्यक्तिगत स्पर्धा म्हणजे हिंदुहिताची लढाई नाही. हे प्रवीण तोगडियांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
 
- रमेश पतंगे, ज्येष्ठ पत्रकार

बातम्या आणखी आहेत...