आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरुसलेम व मुस्लिमद्वेषाचे सत्ताकारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जेरुसलेमच्या निमित्ताने ज्यू-ख्रिश्चन एकत्र झाले तर कधी ज्यू-मुसलमान, तर कधी मुसलमान-ख्रिश्चन एक झाले अन् उरलेल्या धर्माला त्यांनी जेरीस आणले हा इतिहास आहे. आता मुस्लिमद्वेष्टे ट्रम्प आणि इस्रायली राजवट एकत्र आली तर काय होईल हे 
सांगायला राजकीय पंडिताची गरज नाही. जगभरात इस्लामी मूलतत्त्ववाद फोफावला असताना ट्रम्प यांनी लावू घातलेल्या या आगीस भडकू द्यायचे की तिच्यावर उतारा शोधायचा, हे थेरेसा मे किंवा इमॅन्युएल मॅक्रोनसारख्या परिपक्व लोकांच्या हाती आहे.


अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘आपण अध्यक्ष झालो तर इस्रायलमधील अमेरिकन दूतावास तेल अवीवमधून जेरुसलेम येथे हलवू’ असे आश्वासन दिले होते. जगभरातील प्रसारमाध्यमांनी तेव्हा याकडे कानाडोळा केला. पण मुस्लिमांना कट्टरतावादी वा फंडामेंटालिस्ट म्हणून सातत्याने टोमणे मारणारे आणि त्यांना डिवचण्याची एकही संधी न सोडणारे ट्रम्प हे  खरे तर केवळ उजव्या विचारसरणीचेच नसून पक्के मुस्लिमद्वेष्टेही आहेत, हे आता यथावकाश स्पष्ट होतेय. अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर ‘अमेरिका फर्स्ट’ अशी साखरपेरणी करताना त्यांनी नाझिझमच नव्या रूपात अंगीकारला होता. याची अगदी ताजी उदाहरणे ब्रिटिश पीएम थेरेसा मे यांच्याशी झडलेले ट्विटरवॉर आणि दुसरे म्हणजे जेरुसलेममध्ये दूतावासाच्या स्थलांतराची घोषणा. 


थेरेसा मे यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा विरोधक असणाऱ्या ‘ब्रिटन फर्स्ट’ या कडव्या उजव्या विचारसरणीच्या  ग्रुपच्या वतीने मुस्लिमविरोधक पोस्ट्स आणि व्हिडिओ सातत्याने शेअर केले जातात. २९ नोव्हेंबरला ट्रम्प यांनी यातील काही व्हिडिओ रिट्विट केले. ट्रम्प यांच्या या कळलाव्या कृतीवर ब्रिटनकडून पंतप्रधानांच्या प्रवक्त्याद्वारे संयमी प्रतिक्रिया आली. तरीही ट्रम्प यांचे पित्त खवळले, त्यांनी थेट थेरेसा मे यांच्या ट्विटर अकाउंटला टार्गेट करत लिहिलं की, “तुम्ही तुमच्या देशातील विध्वंसक कडव्या मुस्लिम दहशतवादाकडे लक्ष द्या, आमचं सगळं आलबेल आहे.’ दहशतवादाचा उल्लेख करताना ट्रम्प मुस्लिम समुदायाचा उद्धार करायला कधी विसरत नाहीत, हे इथे पुन्हा अधोरेखित झाले. मे यांच्यावर हा शाब्दिक हल्ला चढवला तेव्हा त्या मध्यपूर्वेतील देशांच्या दौऱ्यासाठी जॉर्डनमध्ये आल्या होत्या. याच दौऱ्यात त्यांनी इराक आणि सौदी अरेबियालाही भेट दिली होती हे उल्लेखनीय. मागील दशकात एकाही ब्रिटिश पीएमनी जे केले नव्हते ते मे यांनी करून दाखवले आणि नेमक्या त्याच काळात ट्रम्प यांनी मुस्लिमांना टार्गेट करताना थेरेसा मे यांच्यावरही निशाणा साधला. 


याच्या नंतरची घटना म्हणजे अमेरिकन दूतावास तेल अवीवमधून जेरुसलेममध्ये स्थलांतरित करण्याची ट्रम्प यांची घोषणा. या घोषणेचा सर्वात प्रखर निषेध सौदीसह अरब जगतातून झाला हे विशेष. यावरून काही पाश्चिमात्य देशांनीही ट्रम्प यांना कानपिचक्या दिल्या तर मुस्लिम जगतातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोप फ्रान्सिस यांनी काही दिवसांपूर्वी म्यानमारला गेल्यावर रोहिंग्या मुस्लिमांबद्दल धारण केलेल्या मौनावरून मुस्लिम जगतात खळबळ असतानाच ट्रम्प यांनी ही भूमिका जाहीररीत्या मांडलीय. या घडामोडींवरून  ट्रम्प यांच्या मनात ठासून भरलेला मुस्लिमद्वेषाचा विखार स्पष्ट दिसून येतो. जेरुसलेमचा उल्लेख करून ट्रम्प यांनी आग्यामोहोळास डिवचले आहे याचे कारण जेरुसलेमचा इतिहास आणि त्याचे महत्त्व. 


जगभरातील लोकांना जेरुसलेमबद्दल कुतूहल आहे. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मांचं उगमस्थान व श्रद्धास्थान असलेलं जेरुसलेम म्हणजे गेल्या तीन हजार वर्षांचा जिवंत इतिहासच आहे.  जेरुसलेमचा प्राचीन इतिहास सुसंगत असा उपलब्ध नाही. या शहरावर जोशुआची  स्वारी होण्याआधी ते इजिप्शियन लोकांच्या ताब्यात होते. पुढे सालोमनच्या कारकीर्दीत जेरुसलेमची  भरभराट झाली. इजिप्तचा राजा तिशक याने जेरुसलेमच्या राजाचा पराभव करून येथील अपार संपत्ती लुटून नेली. या नंतरचा जेरुसलेमचा तीन शतकांचा इतिहास म्हणजे हे शहर आपल्या ताब्यात आणण्यासाठी निरनिराळ्या लोकांच्या प्रयत्नांचा इतिहास होय. अरबांकडून बायझेनटाइन राजवटीचा जेरुसलेममधून पाडाव झाल्यावर जेरुसलेमवर इस्लामी खलिफांचं राज्य आलं! आधी मदिनाचे राशीदून, मग दमास्कस (सिरिया) चे उमय्यद आणि नंतर बगदादचे अब्बसीद ! या इस्लामी खालिफांनी ज्यूंना नवे सिनागोग (ज्युइश मंदिर) बांधायला मनाई घातली. ६३७ मध्ये खलिफा उमर याने हे शहर जिंकले, पण त्याने या शहराचा विध्वंस केला नाही व सर्वधर्मीयांनी त्याने शांततेने राहू दिले. जवळपास पाचशे वर्षांनी ज्यूंना जेरुसलेममध्ये राहायला अणि धर्माचरण करायला मोकळीक मिळाली होती. पुढे १०९९ सालापर्यंत हे शहर मुसलमानांच्या ताब्यांत होते. नंतर खलिफा अब्द-इल मालिकनं ज्यूंच्या फोडलेल्या मंदिरातील पवित्र दगडावर “डोम ऑफ़ द रॉक” बांधला. कारण इस्लामनुसार पैगंबर तिथून स्वर्गात जाऊन आले. यामुळे जेरुसलेम मनस्वी ‘इस्लामिक श्रद्धास्थान’ बनले. दरम्यान, मध्य-पूर्व आशियामधे जसजशी इस्लामची ताकद वाढत गेली तसतसे युरोपात ख्रिश्चन मजबूत होत गेले. ग्रीसचा झालेला पाडाव अणि जेरुसलेममधून गेलेली सत्ता पाहून पोप अर्बन (दुसरे) यांनी “क्रुसेड”ची आरोळी देत धर्मयुद्ध पुकारले. युरोपातून लाखो क्रुसेडर्सच्या टोळ्या जेरुसलेमवर धावून आल्या. ज्यू अणि मुसलमानांनी कसोशीनं प्रयत्न केले, पण जेरुसलेम पडले. असंख्य ज्यूंची कत्तल झाली. जेरुसलेम परत एकदा ख्रिश्चन शहर बनलं अणि पॅलेस्टाइनमधून पुन्हा एकदा ज्यूंची गच्छंती झाली. १५१७ सालपर्यंत हे इजिप्तच्या सुलतानांच्या ताब्यात होते, पण तुर्क ओटोमन राजा सुलेमाननं हे शहर जिंकले. यापुढची चार शतकं ज्यूंसाठी थोडी बरी राहिली. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण जगाचं राजकीय समीकरण बदललं होतं. युरोपियनांचे जगावर राज्य होते. याच काळात जगभरातल्या ज्यूंनी ‘झिओनिझम’ची चळवळ सुरू केली. झिओनिझम म्हणजे जगभरातल्या ज्यू लोकांना एकत्र आणून इस्रायल म्हणजे ओटोमन पॅलेस्टाइनमध्ये न्यायचं ! पहिल्या महायुद्धात ओटोमन साम्राज्याचा पराभव झाला आणि १९१७ मध्ये ब्रिटनने हे शहर काबीज केले. दुसऱ्या महायुद्धात नाझी फौजांनी ज्यूंचे जेनोसाइड केले. झिओनिस्ट ज्यू लोकांनी राष्ट्र उभारणीसाठी लढा उभारला. यासाठी जेरुसलेमलगतच्या अरबांशी त्यांनी उघड वैर पत्करलं. यात अनेक चकमकी झडल्या. अरबांना पॅलेस्टाइन नावाचा इस्लामी देश हवा होता, तर ज्यूंना इस्रायल हवं होतं. नियोजनपूर्वक त्या भागातील जमीन खरेदी करणाऱ्या ज्यूंची संख्या अरबांपेक्षा जास्त झाली आणि १४ मे १९४८ ला अमेरिकेचा टेकू घेत इस्रायल जन्माला आलं. याच भूमीचा उर्वरित भाग अरबांकडे राहिला, तोच पॅलेस्टाइन. आज इस्रायल आणि पॅलेस्टिनी हे दोघंही जेरुसलेमवर आपली राजधानी म्हणून दावा सांगतात.  एका आकडेवारीनुसार जेरुसलेम दोनदा पूर्णपणे उद्ध्वस्त केलं गेलं. २३ वेळा त्याला वेढा घातला गेला. ५२ वेळा या शहरावर हल्ले झाले आणि ४४ वेळा ते सत्ताधाऱ्यांकडून हिसकावून घेतलं गेलं. अर्थात ही ज्ञात इतिहासाची आकडेवारी आहे, पण त्यावरून जेरुसलेमसाठी सातत्याने कशा लढाया झाल्या याची कल्पना यावी. यावरून जेरुसलेमचे सत्ताकारणातील महत्त्व ध्यानी येते. 


आज इस्रायल जरी जेरुसलेमला आपली राजधानी मानत असला तरी जगातील एकाही देशाने या दाव्याला मान्यता दिली नाही. पण ट्रम्प यांच्या आततायी घोषणेनुसार जर जेरुसलेममध्ये यूएस दूतावास सुरू झाल्यास असं कृत्य करणारा तो पहिला देश ठरेल. त्याचबरोबर जगाला पुन्हा धर्मयुद्धाच्या खाईत लोटण्याचे पापही अमेरिकेच्याच माथी लागेल. कारण ट्रम्प यांनी ही घोषणा करताच पॅलेस्टिनी अरबांनी जेरुसलेममध्ये अमेरिकनांना प्रवेशबंदी केलीय. मुस्लिम राष्ट्रांच्या तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्यात. याआधी जेरुसलेमच्या निमित्ताने ज्यू-ख्रिश्चन एकत्र झाले तर कधी ज्यू-मुसलमान, तर कधी मुसलमान-ख्रिश्चन एक झाले अन् उरलेल्या धर्माला त्यांनी जेरीस आणले हा इतिहास आहे. आता मुस्लिमद्वेष्टे ट्रम्प आणि इस्रायली राजवट एकत्र आली तर काय होईल हे सांगायला कोणा राजकीय पंडिताची गरज नाही. जगभरात इस्लामी मूलतत्त्ववाद फोफावला असताना ट्रम्प यांनी लावू घातलेल्या या आगीस भडकू द्यायचे की तिच्यावर उतारा शोधायचा, हे थेरेसा मे किंवा इमॅन्युएल मॅक्रोनसारख्या परिपक्व लोकांच्या हाती आहे. नाही म्हणायला आपल्याकडे सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रम्प यांच्या आगीत तेल ओतायचे काम केले आहे.


- समीर गायकवाड, सामाजिक-सांस्कृतिक विश्लेषक
sameerbapu@gmail.com

बातम्या आणखी आहेत...