आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोककलेची ढासळती कमान...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक श्रेष्ठ तमाशा कलावंताची कथा ही संघर्षाची आहे. ही कला आता इतिहास बनून राहतेय की काय, असे दिवस आज या कलेस आलेत.   तमाशाला, वगनाट्यांना कधीकाळी चांगले दिवस होते. विविध ठिकाणी कलाकेंद्रे झाल्यावर त्यात स्थिरता आली, पण या दशकात उतरती कळा लागलीय. 

 

पंढरीतल्या एका रंगात आलेल्या फडात ढोलकी कडाडत होती. लोक मनमुराद दाद देत होते. ‘ती’ मन लावून नाचत होती. मधूनच ‘तिच्या’ चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. तिचे पोट किंचित फुगल्यासारखे वाटत होते. खरे तर ‘तिला’ असह्य वेदना होत होत्या तरीही ‘ती’ देहभान हरपून नाचत होती. तिची लावणी संपताच ती पटामागे गेली, घाईने ‘तिने’ साडी फेडली अन् पोटाचा ताण हलका झाला. पण नियतीच्या मनात काही तरी वेगळे होते. ‘तिला’ प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि काही मिनिटांत ‘तिची’ प्रसूती झाली. इकडे फडावर दोनेक लावण्या होऊन गेल्या, सोंगाड्याची बतावणी सुरू झाली आणि संपली, पुढच्या लावणीआधी लोकांनी ‘तिच्याच’ नावाचा घाेशा सुरू केला. तिची सहकलाकार एव्हाना पुढच्या लावणीसाठी मंचावर आली होती. कशीबशी ती लावणी संपली. तोवर ‘तिने’ दगड हाती घेऊन नाळ तोडून काढली. आपल्या बाळाला स्वतःपासून विलग केले, पुन्हा कासोटा आवळून साडी नेसली आणि फडावर जाऊन उभी राहिली. ती जीव तोडून नाचली. त्या लावणीचे बोल होते, ‘पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची!’   
‘ती’ नाचतच होती, ‘तिच्या’वर, ‘तिच्या’ कलेवर फिदा झालेल्या लोकांना तिच्या डोळ्यातून वाहणारे पाणी दिसत नव्हते. पायातले चाळ ‘तिला’ मणामणाचे वाटत होते. ती कोसळण्याच्या बेतात यायला आणि लावणी संपायला एकच गाठ पडली. कशीबशी ती पडद्यामागे गेली आणि तिथे जाऊन कोसळली. तिची अदाकारी अन् तिचा नाच बघणाऱ्यांनी काही वेळापूर्वी ‘तिची’ प्रसूती झाली होती यावर विश्वास ठेवला नसता. ही घटना घडली होती पंढरपुरात आणि जिच्या वाटेस हे भोग आले होते तिचा जन्मही एका बेभान आषाढी एकादशीच्या रात्रीस झाला होता! तिचे नाव होते विठा!! नृत्यसम्राज्ञी विठाबाईंच्या जीवनाची ही आठवण अभूतपूर्व अशी आहे.  
पंढरपुरी बाजाच्या, बैठकीच्या लावणीला सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडवणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करत तेव्हा घाबरलेल्या बालिका वधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन त्या घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत. एकदा लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना ‘दहावी अदा कोणती?’ असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले व ही ‘दहावी अदा’ असे करून दाखवले. सुरुवातीच्या काळात स्वतःच्या घराच्या दिवाणखान्यातच त्या लावणी सादर करू लागल्या. त्यातही बैठकीच्या लावण्या जास्त असत. पण पुढे या बैठकीच्या लावण्यांचा त्यांच्यावर शिक्का बसला. अनेक सामाजिक बंधने, स्त्रीत्वाच्या मर्यादा आणि तत्कालीन नैतिकतेचे संदर्भ पाहता सत्यभामाबाईंनी ज्या नेटाने आणि जोमाने आपली लावणीची सेवा अबाधित अखंड ठेवली त्याला तोड नाही.  
कोंडीबा टाकळीकर हा असाच कलासक्त माणूस. एकेकाळी पुणे स्टेशनला हमाली करायचे. त्यांना तमाशाचे भयानक वेड. हमालीतून आलेल्या पैशातून आणि घरातली सगळी साधनं वापरून ते एक छोटेखानी फड चालवत असत. हमाली करत हा उद्योग चाले. तमाशात ते नाच्याचं, सोंगाड्याचं, तर क्वचित नटाचे कामही करायचे. त्यांच्या दोन्ही चिमुरड्या मुली लता व सुरेखा फडासोबत असायच्या. या जोडीतली सुरेखा अगदी बालवयातच वडिलांच्या तमाशात नृत्य करू लागली होती. तिचा धिटुकला परफॉर्मन्स अन् नृत्यगुण बघून प्रेक्षक कौतुकाने यात्रेतल्या ‘शेव-रेवडी’च्या माळा तिच्या गळ्यात घालायचे. त्या दोघींनी स्वतःचा फड उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगले. पुढील नियोजन होईपर्यंत साहेबराव नांदवळकर व चंद्रकांत ढवळापुरीकर यांच्या तमाशात काही दिवस केवळ ‘शिध्यावर’ त्यांनी नृत्यसेवा केली. १९८६ मध्ये या दोन बहिणींनी “लता-सुरेखा पुणेकर’ नावाने स्वतःचा फड सुरू केला होता. गावातून सहा हजार हातउसने घेऊन आणि घरातील दागदागिने विकून २५ हजार रुपये एकत्रित करून त्यांनी फड उभा केला.  
प्रत्येक श्रेष्ठ तमाशा कलावंताची कथा ही अशी संघर्षाची आहे. ही कला आता इतिहास बनून राहतेय की काय, असे दिवस आज या कलेस आलेत.   तमाशाला, वगनाट्यांना कधीकाळी चांगले दिवस होते. विविध ठिकाणी कलाकेंद्रे झाल्यावर त्यात स्थिरता आली; पण या दशकात याला उतरती कळा लागलीय. कलाकेंद्रात किमान पाचेक पार्ट्या तरी ठेवाव्या लागतात, मगच तिथे ये-जा सुरू होते. महाराष्ट्रातली काही कलाकेंद्रं ख्यातनाम आहेत. इथे बैठकीची लावणी व खुले स्टेज असते. स्टेजसाठी ५०-१०० रु.चे तिकीट असते.तिथं तासभर लावण्या चालतात.

 

कलाकेंद्राच्या व्याप्तीनुसार बैठकीसाठी खोल्या असतात. भिंतीचे पोपडे उडालेल्या, लोड-तक्के जीर्ण झालेल्या, जागोजागी पानतंबाखूच्या खुणा मिरवणाऱ्या हजार रु.च्या खोलीपासून ते अगदी राजमहालाला शोभतील अशा २० हजार रु.च्या खोल्या इथं उपलब्ध असतात. हौशी लोक आपल्याला हवी ती पार्टी निवडतात, बजेटनुसार खोली ठरवतात, मग बैठक संपन्न होते. बैठकीत एक गायिका, एक ढोलकीपटू, एक हार्मोनियम वादक (पेटी मास्तर), कमीत कमी दोन नर्तिका असा लवाजमा असतो. नर्तिका बहुतांश करून तीनच्या पुढेच असतात, पण जेव्हा ही संख्या जास्त असते तेव्हा नक्कीच बैठक मोठी असते. दीड-दोन हजार रु.त सहसा बैठकी ठरतात.

 

   मात्र, या दशकात हा व्यवसाय रोडावत चालल्याने, मोठं बिऱ्हाड सांभाळणं आतबट्ट्याचं ठरत असल्याने अनेक कलाकेंद्रे घटका मोजत आहेत. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव म्हणजे तमाशा पंढरी. इथे तंबू कनातीत पार्ट्यांच्या सुपाऱ्या फुटतात. पण आता मोसम रोडावत चाललाय. अनेक कलाकेंद्रांत बोलीच लागत नाही, बैठका बसत नाहीत. 


उपजीविकेचे अन्य मार्ग हाताळताना यांचे साहजिकच शोषण होऊ लागलेय. गावोगावच्या बड्या असामींच्या लग्नाच्या वरातीत आणि छोट्या-मोठ्या उत्सवात बँजो-डॉल्बीवर कलाकेंद्रातील मुली रस्त्यावर नाचताना मोठ्या प्रमाणात आढळू लागल्या आहेत. मुली नाचवण्याचं हे प्रमाण इतक्या वेगाने वाढतेय की पुढचा धोका लगेच दृष्टिपथात येतोय. यूपी, बिहार, एमपी, झारखंड, उत्तरांचल, हिमाचलमध्ये आता भोजपुरी, हिंदी गाण्यांच्या नावाखाली जो हिडीस, बीभत्स प्रकार विविध कार्यक्रमांत सादर होतोय तो लाजेने मान खाली घालावयास लावणारा आहे.

 

डान्सबार बंद पडल्यानंतर हजारोंच्या संख्येने मुली यात लोटल्या गेल्या. आपली ही लोककला त्याच दिशेने जातेय अशी भीती वाटते. त्यातही कोल्हाटी समाजाचे कौतुक करावे वाटते, ९ मार्चला मढी येथे यंदाच्या वर्षापासून समाजाची एकही मुलगी घुंगरू बांधून उतरणार नाही, असा त्यांनी ठराव केलाय. मढी, सोनारी, जेजुरी व माळेगाव येथे जात पंचायतीऐवजी प्रबोधन मेळावे घेऊन सामाजिक ऐक्य व संवाद संघशक्तीचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कोल्हाटी बांधव सरसावले आहेत. विविध कलाकेंद्रे, संगीतबारी, विवाह यात्रा-जत्रा उरुसामधून नाचगाणे करत मनोरंजन करणाऱ्या महिला प्रामुख्याने कोल्हाटी समाजाच्या असतात.

 

नाच-गाण्यांची परंपरा देवादिकांसह राजे- महाराजांपासून सुरू असून आम्हीसुद्धा सेवा करतो, अशी या समाजाची भावना. कोल्हाटी समाजाचे अॅड. अरुण जाधव यांच्या शिकवणीनुसार ‘आम्ही कुठपर्यंत ढोलकी अन् घुंगराच्या तालावर दमायचं? आता नाचायचं नाही; शिकायचं, अधिकारी-पदाधिकारी व्हायचं!’ हा निर्धार करत नाच-गाण्याला मूठमाती देण्याबाबत सर्वच समाज आग्रही आहे. सगळीकडेच अशी जागृती नाही आणि जागृती असूनही खूप काही उपयोग नाही कारण या मुलींवर जी कुटुंबे अवलंबून आहेत त्यांची पोटे कोण भरणार? याचे उत्तर कुणाकडेच नाही. पोटासाठी नाचणाऱ्या या जीवांची खरेच 
कुणाला पर्वा नाही का?     

 

समीर गायकवाड 

sameerbapu@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...