आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Sandesh Samant Write About Elections Of Local Government Bodies In Sri Lanka

श्रीलंका : शांततेकडून पुन्हा अशांततेकडे?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेब्रुवारी महिन्यात श्रीलंकेतील दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या पक्षाचा दणदणीत विजय झाला. सिंहली बौद्धंविरोधात सरकार कारवाई करत अल्पसंख्याकांच्या अनुनयाचे राजकारण सरकार करत असल्याच्या 
त्यांच्या आवाहनाला मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे मैत्रिपाल सिरिसेना यांचे सरकार प्रत्येक पाऊल जपून टाकत आहे.  

 

मार्चच्या पहिल्या आठवड्यातच भारताचा शेजारी असलेला श्रीलंका हिंसाचाराने हादरून गेला. ४ मार्चला बौद्ध धर्मीयांच्या एका समुदायाने कँडी येथील मुस्लिम वस्तीवर केलेल्या हल्ल्यानंतर श्रीलंकेत मोठा हिंसाचार उफाळला. यानंतर श्रीलंकेच्या सरकारने ६ मार्च रोजी देशभरात आणीबाणी लागू केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत मुस्लिम समुदायातर्फे चालवल्या जाणाऱ्या उद्योगांवर आणि मशिदींवर हल्ले झाले होते. हिंसाचाराचे लोण संपूर्ण श्रीलंकेत पसरेल, अशी भीती सरकारला वाटत होती. म्हणूनच आणीबाणीचा घोषणा सरकारतर्फे करण्यात आली.  


हा हिंसाचार उफाळला त्याआधी २२ फेब्रुवारीला कँडी प्रांतातीलच दिगाना शहरात घडलेली घटना या संपूर्ण हिंसाचारासाठी निमित्त ठरली. एका लॉरी चालकाची तेथील काही स्थानिक मुस्लिम तरुणांसोबत बाचाबाची झाली. यानंतर या समुदायाने केलेल्या हल्ल्यात हा चालक जखमी झाला. त्याचा ४ मार्च रोजी मृत्यू झाला. हा चालक सिंहली बौद्ध समुदायाचा होता. हिंसा घडू नये म्हणून स्थानिक पोलिसांनी अनेकांना या चालकाच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्यापासून मनाई केली. पण, स्थानिकांनी केलेल्या आरोपांनुसार पोलिसांनी गुन्हेगारांना अटक करण्यास बराच विलंब केला. यानंतर पोलिसांनी सिंहली समुदायातील २७ जणांना अटक केली.  


याचा राग म्हणून एका मोठ्या जनसमुदायाने मुस्लिम वस्त्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. दुकानांची लूटमार, जाळपोळ, पेट्रोल बॉम्ब फेकणे आणि मशिदींवर थेट हल्ले करणे यांसारखे विघातक प्रकार अवलंबले गेले. जनसमुदायाने एका घरावर केलेल्या हल्ल्यात अब्दुल बसिथ या तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यूच्या आधी होत असलेल्या घटनांची माहिती त्याने त्याच्या वडिलांना ध्वनिफितीच्या माध्यमातून पाठवली. ही ध्वनिफीत श्रीलंकेतील सामाजिक माध्यमांत फिरू लागली आणि हिंसाचाराला खतपाणी घातले गेले.  


श्रीलंकेला हिंसाचार काही नवीन नाही. ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम’ (LTTE) या दहशतवादी संघटनेने श्रीलंकेत जवळपास अडीच दशके हिंसाचाराची परिसीमा गाठली होती. या यादवीत हजारो जणांचा मृत्यू झाला होता. तामिळ भाषिक हिंदू आणि सिंहली बौद्ध यांच्यात प्रामुख्याने हिंसाचार घडला होता. २००९ मध्ये श्रीलंकन सरकारने उचललेल्या कठोर पावलांनंतर या यादवीला पूर्णविराम मिळाला. या काळातही श्रीलंकेतील काही ठिकाणी मुस्लिम धर्मीयांचे शिरकाण होण्याच्या घटना घडल्या होत्या. या सर्व प्रकरणानंतर श्रीलंकेने एका सबळ लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली होती.  


पण, २०१४ मध्ये श्रीलंकेत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला. देशाच्या पश्चिमेकडे असलेल्या अलुथगामा, बेरुवाला व धरगा या गावांमध्ये मुस्लिम आणि बौद्ध सिंहली यांच्यात दंगली उसळल्या. यात किमान चार जणांचा मृत्यू झाला, तर ८० पेक्षा जास्त जखमी झाले. १०,००० च्या आसपास विस्थापितांची संख्या होती. २००९ नंतर श्रीलंकेतील ही हिंसाचाराची सर्वात मोठी घटना होती. ‘बोडू बाला सेना’ या जहालवादी बौद्ध गटाची भूमिका यात मोठी होती. त्यानंतर या गटाविषयी चर्चा होऊ लागली. प्रक्षोभक भाषणे देणे, लोकांना सशस्त्र हल्ले करण्यास प्रवृत्त करणे, असे अनेक आरोप या गटावर आणि त्यातील भिक्खूंवर केले गेले. आत्ताच्या प्रक्षोभक परिस्थितीलाही हाच गट मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे मानले जात आहे.  


श्रीलंकेची लोकसंख्या साधारणतः सव्वा कोटीच्या आसपास आहे. यातील ७० टक्के लोकसंख्या ही बौद्ध सिंहलींची आहे. हिंदू तामिळींची संख्या १३ टक्के आहे, तर मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण साधारणपणे १० टक्के इतके आहे. पण, अनेक बौद्ध धर्मीयांच्या मते हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एक मुसलमान पुरुष चार विवाह करतो, अनेक अपत्यांना जन्म देतो, कुटंुबनियोजनाच्या कोणत्याही प्रयत्नांना मुस्लिम समुदाय भीक घालत नाही, आपल्या धर्मीयांची संख्या वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, असे अनेक समज सिंहली समाजात पसरवले जात आहेत. मुस्लिम धर्मीयांमार्फत जबरदस्तीने धर्मांतरण केले जात असल्याच्या बातम्यांनी गेल्या वर्षभरात श्रीलंकेत काहूर माजवले होते. यामुळेच श्रीलंकेत एकंदरच मुस्लिम समाजाविरुद्ध एक प्रकारचा तिरस्कार वाढत चालला आहे. अनेक कट्टरतावाद्यांनी तर मुस्लिम समुदायासोबत व्यवसाय आणि व्यवहार करण्याचेही थांबवले आहे. अंपारा नावाच्या शहरात एका मुस्लिम व्यक्तीने खाद्यपदार्थांत नपुंसकतेच्या गोळ्या मिश्रित करून सिंहली बौद्ध पुरुषांची प्रजननक्षमता संपवल्याच्या अफवेने हिंसाचार घडवला. एकंदरच अल्पसंख्याक समुदायाला स्वतःच्या अस्तित्वाविषयी भीती निर्माण होईल, असे वातावरण सध्या श्रीलंकेत निर्माण झाले आहे.  


श्रीलंकेपासून हजार सागरी मैलांवर असलेला म्यानमारही गेल्या वर्षी बौद्ध आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये झालेल्या दंग्यांमुळे चर्चेत आला होता. तेथील रखाईन प्रांतातील हजारो रोहिंग्या मुसलमानांवर बेघर होण्याची वेळ आली होती. बौद्ध धर्मीय हे शांतताप्रिय आणि अहिंसक म्हणून मानले जातात. पण, म्यानमारमधील हिंसाचारातही तेथील स्थानिक बौद्ध भिक्खूंचा सहभाग मोठा होता. म्यानमार सरकारचाही ह्या संपूर्ण हिंसाचाराला छुपा पाठिंबा होता, असे आरोप केले गेले. हे विस्थापित जगभर आश्रय शोधत असताना श्रीलंकेतील सिंहली गटांनी मुसलमानांना श्रीलंकेत सरकारने आश्रय देऊ नये यासाठी निदर्शने केली होती. गेल्या काही वर्षांत श्रीलंकेत सुफी इस्लामचा प्रभाव कमी होऊन वहाबी इस्लामचा प्रभाव वाढीस लागला आहे. पारंपरिकदृष्ट्या श्रीलंकेतील बौद्ध आणि मुस्लिम एकमेकांच्या सण-उत्सवांमध्ये उत्साहाने सहभागी होत असत. श्रीलंकेतील यादवीच्या काळात खरे पाहता बौद्ध सिंहली आणि मुस्लिम गट यांच्यात बरीच जवळीक होती. बहुतांश मुस्लिम समुदायाची भाषा तामिळ असली तरीही मुख्यतः व्यापारी असणारे हे गट सिंहलींशी चांगले संबंध प्रस्थापित करून होते. पण, वहाबी इस्लामच्या वाढत्या प्रमाणानंतर धार्मिक शिक्षणाकडे त्यांचा कल वाढल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. यातूनच अगदी वाढत्या वयातच सर्वच धर्मांतील तरुणांच्या मनात धार्मिक कट्टरता पेरली जात असल्याचा अंदाज आहे.  


अलीकडच्या काळात जगभरात समाजमाध्यमे आणि इंटरनेट यांचे राजकीय स्थित्यंतरातील स्थान यांवर चर्चा होत आहे. काही देशांत समाजमाध्यमांनी क्रांती केल्याचे दावेही केले गेले. पण, श्रीलंकेतील हिंसाचारात याच समाजमाध्यमांचा सिंहाचा वाटा असल्याचे समोर आले आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘इस्लामोफोबिया’चा प्रसार केल्याचे निदर्शनास आले आहे. फेसबुकवर इस्लाम आणि मुस्लिम धर्मीयांवर टीका करणारे अनेक गट कार्यरत आहेत. यातूनच तरुणांचे संघटन होत आहे. यात केवळ अशिक्षितच नव्हे, तर अनेक उच्चशिक्षित आणि धार्मिक गटांशी संबंधित तरुणांचाही समावेश आहे. त्यामुळेच, हिंसाचारानंतर श्रीलंकेच्या सरकारने श्रीलंकेतील अनेक भागांत इंटरनेट आणि मोबाइल सेवा पूर्णपणे बंद केली आहे.  


पण, फार कोणावर कारवाई करण्यास श्रीलंकन सरकार धजावलेले नाही. सिंहली बौद्ध राष्ट्रवाद श्रीलंकेत वाढीस लागला आहे. फेब्रुवारी महिन्यात श्रीलंकेतील दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या पक्षाचा दणदणीत विजय झाला. सिंहली बौद्धंविरोधात सरकार कारवाई करत अल्पसंख्याकांच्या अनुनयाचे राजकारण सरकार करत असल्याच्या त्यांच्या आवाहनाला मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे मैत्रिपाल सिरिसेना यांचे सरकार प्रत्येक पाऊल जपून टाकत आहे.  गेल्या वर्षी म्यानमार आणि आता श्रीलंका... आशिया खंडातील हे दोन देश बौद्ध विरुद्ध मुस्लिम संघर्षाने ग्रासले आहेत. गेल्या सहा दशकांत या दोन्ही देशांनी अनेक राजकीय संघर्ष केले आहेत. येत्या काळात आणखी कोणत्या स्थित्यंतरातून हे देश शांतीचा मार्ग कसा साधतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


- संदेश सामंत,परराष्ट्रविषयक अभ्यासक
messagesamant@gmail.com

बातम्या आणखी आहेत...