आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: वाचाळांची मुक्ताफळे!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संस्कृतीचे जतन अाणि संवर्धन करण्याची जबाबदारी केवळ अापलीच अाहे, असा समज भाजप अाणि संघ परिवारातील वाचाळवीरांनी जणू करून घेतला अाहे. या परिवारातील मंडळी अलीकडच्या काळात ज्या पद्धतीने वायफळ बडबड करीत अाहेत ते पाहता हा केवळ त्यांच्या वाचा किंबहुना वाणीचा दाेष म्हणता येणार नाही. कारण सत्तेचा माज, असंवेदनशीलता, पुरुषप्रधानता अशा काही बाबी त्यातून डाेकावत अाहेत. अर्थातच ही मानसिकता सामाजिक स्वास्थ्यासाठी मारक ठरू शकते. टीका कशी करायची याचा अादर्श पायंडा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घालून दिला असला तरी या मुखंडांना ताे नकाेसा का वाटावा? वस्तुत: राजकारण हे काय बाेलू नये याचे भान करवून देते असे म्हणतात.

 

मात्र हल्ली नव्या-जुन्या चेहऱ्यांची जीभ घसरत असल्याचेच सातत्याने दिसून येते. पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या याेगी अादित्यनाथांच्या ‘ड्रामेबाजी बंद करा’ या विधानाने तर अपघाती मृत्यू पावलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांच्या शाेकाकुल भावनांचा उपमर्द केला. आसिफावर झालेल्या अत्याचाराने सारा भारत व्यथित असताना काश्मीरचे उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी ही घटना किरकाेळ असल्याचे सांगत या जखमेवर मीठ चाेळले. ईशान्येकडील प्रांतांत जातीय अाणि वांशिक वैविध्य विपुल असले तरी विप्लव देवसारख्या मुख्यमंत्र्यांचे चामडे किती निगरगट्ट अाहे, याची साक्ष एेश्वर्या राय अाणि डायना हेडन यांच्या साैंदर्याविषयी केलेल्या असंस्कृत तुलनेवरून पटते.

 

या सर्वांवर कडी करणारा मजेशीर किस्सा म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी नारदांना ‘गुगलत्व’ बहाल केले. उल्लेखनीय म्हणजे अातापर्यंत काेणीही गुगल अाणि नारद यांचा बादरायण संबंध जाेडण्याची हिंमत केली नव्हती. मध्य प्रदेशातील भाजपचे खासदार मनाेहर उंटवाले यांनी तर महिलांच्या देखत दिग्विजय सिंह यांच्यावर मुक्ताफळे उधळण्याची संधी दवडली नाही. एकंदरीत हा सारा असंस्कृत, असभ्य प्रकार पाहता साहजिकच प्रश्न असा पडताे की, पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा दरारा अाेसरला की काय? ही वाह्यात बडबड बेशिस्त ठरत नाही का? अाणि जर ती बेशिस्त ठरत असेल तर हे वाचाळवीर मुक्ताफळे उधळतात तरी कसे? 


महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजप समर्थक प्रशांत परिचारक यांनी भाेसेच्या सभेत राजकारण कसे असते ते सांगण्यास सुरुवात केली अाणि भलतेच घसरले. त्यावर प्रशांत परिचारक यांनी अपेक्षेप्रमाणे माफी मागितली; ताेच बिहारचे मंत्री भीमसिंह यांनी जवानांवर ताेंडसुख घेतले. जवान मरण्यासाठीच सेनेमध्ये भरती हाेतात या विधानाबद्दल त्यांनाही माफी मागणे अपरिहार्य ठरले.


 एखाद्याने वादग्रस्त विधान केले की संबंधिताच्या जिभेला लगाम घालणाऱ्यांपेक्षा त्यावर टाळ्या पिटणाऱ्यांची संख्या अापल्याकडे कमी नाही, हेच प्रसंगाेपात अाजवर दिसून अाले. प्रभू रामचंद्राचा नामगजर करीत उत्तर प्रदेशात भाजपने राजकीय बस्तान बसवले, अाता हैदराबादचे भाजप अामदार टी. राजा हाच कित्ता गिरवू पाहत अाहेत. राम मंदिराला विराेध करणाऱ्यांचे मुंडके उडवण्याचा इशारा देण्यामागे प्रयाेजन तरी काय? माझ्या जेवणाने दलित पवित्र व्हायला मी श्रीराम नाही, या विधानामागे उमा भारतींना काय अभिप्रेत अाहे? सामाजिक समरसतेचा पाया खिळखिळा करण्याचा तर हेतू नसावा, असे भासत असले तरी खालच्या फळीतील नेत्याला वायफळ बाेलायला लावायचे अाणि त्याद्वारे लाेकभावना समजून घ्यायची, असा सारा मामला दिसताे. सामाजिक दुही माजवण्याचे कारस्थान टी. राजा, उमा भारतींसारखी मंडळी का करीत अाहेत? एक व्यक्ती म्हणून त्यांच्यातील संवेदनशीलता अशी विधाने करताना कुठे हरवते? 
पंतप्रधान नरेंद्र माेदींनी वाचाळवीरांना खडे बाेल सुनावत बाष्कळगंगेला बांध घालण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र ताे फाेल ठरला असेच म्हणावे लागते.

 

राजकीय शहाणपण अाणि विवेकाने यापूर्वी काँग्रेसला ‘हात’ दाखवला, याची अाठवण भाजपने या साऱ्या पार्श्वभूमीवर ठेवलेली बरी. मणिशंकर अय्यर, सलमान खुर्शीद अाणि शकील अहमद यांची वायफळ बडबड अाणि पक्षश्रेष्ठींनी दाखवलेले शहाजाेग माैन यामुळेच तर काँग्रेसला पायउतार व्हावे लागले, हा इतिहास फार जुना नाही. अर्थातच वाचाळांना दाेष देऊन चालणार नाही, तर मुळातच त्यांच्यावर जनतेचा नैतिक दबाव राहिलेला नाही. राजकीय डावपेचांत अधिक स्वारस्य असल्यामुळेच कदाचित वाचाळांना अावर घातला जात नसावा, असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. समाज माध्यमांचा पुरेपूर फायदा घेत भाजपने विक्रमी यश निश्चितच मिळवले. मात्र वाचाळवीरांच्या वाह्यात बरळण्यामुळे याच 
माध्यमांतून हाेणारा पलटवार पक्षाच्या जिव्हारी लागला नाही तरच नवल!! 

 

 - श्रीपाद सबनीस

बातम्या आणखी आहेत...