आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गमावलं तेही कमावलं असतं!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय फिरकीच्या करामतीचे विश्लेषण दक्षिण आफ्रिकन कसोटीवीर कसे करतात? दक्षिण आफ्रिकेचा सर्वोच्च चतुरस्रवीर जॅक कॅलिस म्हणतो : ‘आमच्या देशात दर्जेदार लेगस्पिनर नाहीत.’ इम्रान ताहिरला मुळीच जमेस न धरता कॅलिस पुढे म्हणतो : ‘आमच्या फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेत दर्जेदार लेगस्पिन खेळण्याचा मोकाच मिळत नाही. लेगस्पिन उमगण्यास वेळ लागतो. मलाही याच प्रक्रियेतून जावं लागलं. 


‘दोज पॅल्स ऑफ माइन, रामाधीन अँड व्हॅलेंटाइन…’ आंग्लभूमीतील पहिल्यावहिल्या व जबरदस्त विजयाने बेहोश झालेल्या शेकडो वेस्ट इंडियन चाहत्यांनी लॉर्ड््स मैदानाचा ताबा घेतला होता. हातातील गिटार वाजवताना बेभान आवाजात ते गात होते. त्यांनीच रचलेली समर्पक कॅरेबियन गीते आपल्या फलंदाजांचं, वॉरेल-वीक्स-वॉलकॉट या तीन डब्ल्यूजचे आणि त्यापेक्षाही क्षितिजावरील या दोन नवीन ताऱ्यांचे ‘दोज पॅल्स ऑफ माइन’ माझे सवंगडी रामाधीन अन् व्हॅलेंटाइन या जोडीचं. 


रामाधीन अन् व्हॅलेंटाइन

क्रिकेट जगतात सर्वस्वी अपरिचित अशीच नावं. तेव्हा विंडीजमध्ये नाव होतं लेगस्पिनर फर्ग्युसनचं. पण निवड समिती होती रत्नपारखी. स्थानिक स्पर्धांतील वर्षभराच्या कामगिरीवरून त्यांनी या जोडीची प्रतिभा हेरली. सर्वस्वी वेगळ्या हवामानातील व वातावरणातील इंग्लिश दौऱ्यावर त्यांना धाडलं. डावखुरा चष्मीस आल्फ व्हॅलेंटाइन व अनोखा ऑफस्पिनर सोनी रामाधीन यांनी संधीचं सोनं केलं. चार कसोटीत ८० टक्के इंग्लिश फलंदाज गुंडाळले. मालिकेतील ३-१ विजयाचे ते मोठे शिल्पकार ठरले.  


त्यानंतर तब्बल ७० वर्षांनी त्या इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. जागतिक रँकिंगमध्ये मानाच्या स्थानी असलेले रवी अश्विन व रवी जडेजा यांच्या बदली, एकदिवसीय व झटपट मालिकेसाठी निवडलं गेलं लेगस्पिनर यजुवेंद्र चहल व चायनामन चेंडू टाकू शकणारा कुलदीप यादव या जोडीला. हा निर्णय धाडसी. दुसरे पर्याय फारसे दिसत नसल्यामुळे खेळला गेलेला जुगार यशस्वी ठरला. डावऱ्या कुलदीपचे बळी १७. त्याचा स्ट्राइक रेट दर १८ चेंडूत एकेक बळीचा. चहलचे बळी १६ व स्ट्राइक रेट १९.५. दक्षिण आफ्रिकेतील गेल्या झटपट मालिकेत भारतीय फिरकीचे बळी अवघे दोन अन् ही गोष्ट व हा फरक टीव्ही समीक्षक संजय मांजरेकर पुन्हा पुन्हा अधोरेखित करत होता. 


केवळ एक झटपट मालिकेतील अद््भुत कामगिरीवरून चहल-कुलदीप यांना रामधीन-व्हॅलेंटाइन यांच्या पंगतीत मी मुळीच बसवणार नाही. त्या विंडीज जोडीला सामना करावा लागला. लेन हटन-सिरील वॉशब्रुक-डेविस कॉम्प्टन अशा श्रेष्ठ दर्जाच्या फलंदाजांशी अन् ट्रेव्हर बेली व गॉडफ्रे एव्हन्स यांच्या मधल्या फळीशी. याउलट जॅक कॅलिस व ग्रॅमी स्मिथ यांच्या निवृत्तीने दक्षिण आफ्रिकन फलंदाजीचा कणा मोडलेला. त्यातून एबी डिव्हिलियर्स, फाफ डुप्लेसिस व यंदा फॉर्मात असलेला डिकॉक हे दुखापतींमुळे तीन-चार सामन्यांत प्रेक्षक बनलेले. डेल स्टेन व व्हर्नन फिलेंडर ही जगप्रसिद्ध जलद जोडी मालिकेबाहेर राहिल्याने भारतीय फलंदाजांचे फावलेले व त्यांच्या धावराशींमुळे भारतीय गोलंदाजांचा भार हलका झालेला. 


तरीही या दोन फिरकी जोड्यांचा सर्वांना अचंबित करणाऱ्या कामगिरीत एक धागा सामाईक 
तो म्हणजे चाणाक्ष निवड समितीने त्यांची गुणवत्ता हेरल्याचा आणि त्यांना पूर्णपणे वाव देण्याच्या जुगाराचा. या यशस्वी ठरलेल्या जुगाराची बीजं रोवली गेली गतसालच्या चॅम्पियन करंडक झटपट स्पर्धेत प्रथम श्रीलंका व मागाहून अंतिम फेरीत पाकिस्तान यांनी अश्विन-जडेजा यांची भरपूर धुलाई केली. तिथेच संघ व्यवस्थापनाने विचार सुरू केला पर्याय शोधण्याचा. लेगस्पिनर अमित मिश्र, डावखुरा अक्झर पटेल, अष्टपैलू ऑफस्पिनर जयंत यादव व पुण्याचा केदार जाधव.. त्यातूनच नावं पुढे आली चहल व कुलदीपची. 


याबाबत संघ व्यवस्थापनाचे म्हणजे ज्यांना ताळमेळ उत्तम जपलाय असे कर्णधार विराट कोहली व प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे विचारमंथन. शास्त्रीजींच्या शब्दांत सांगतो : ‘हाताच्या बोटापेक्षा मनगटी हिसक्याने चेंडू िफरवणारे फिरकीपटू हवेत या मतावर आम्ही आलो, सहमत झालो. खरं सांगायचं तर असा विचार माझ्या पहिल्या नियुक्तीपासून (२०१५ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यापासून) सुरू झाला होता.’ 


‘तेव्हाही विराटशी झालेल्या चर्चेत एक विषय वारंवार यायचा. डावाच्या मध्यात, मिड ओव्हर्समध्ये म्हणजे सुमारे १६-१८ ते ३५-४० षटकांच्या खेळात गडी बाद करू शकणारे गोलंदाज आम्हाला हवे होते. जमलेल्या जोड्या काही करून फोडल्या पाहिजेत, त्यांना स्थिरावू दिलं तर खेळ हातांबाहेर जातो. हे काम करणाऱ्या गोलंदाजांच्या शोधात आम्ही राहिलो.’ 


‘आमचं व भारताचं सुदैव की आम्हाला गवसले चहल व कुलदीप. ते दोघे एकमेकांना किती छान पूरक ठरले आहेत! अशी विविधता खेळाची प्रेक्षणीयता वाढवते. फलंदाजी, तेज गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यांसह फिरकीतील नजाकत रसिकांना भावते.’ 


भारतीय फिरकीच्या करामतीचे विश्लेषण दक्षिण आफ्रिकन कसोटीवीर कसे करतात? दक्षिण आफ्रिकेचा सर्वोच्च चतुरस्त्रवीर जॅक कॅलिस म्हणतो : ‘आमच्या देशात दर्जेदार लेगस्पिनर नाहीत.’ इम्रान ताहिरला मुळीच जमेस न धरता कॅलिस पुढे म्हणतो : ‘आमच्या फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेत दर्जेदार लेगस्पिन खेळण्याचा मोकाच मिळत नाही. लेगस्पिन उमगण्यास वेळ लागतो. मलाही याच प्रक्रियेतून जावं लागलं. लेगस्पिन हेरण्याचे दोन मार्ग : गोलंदाजाच्या मनगटावर वा चेंडूचा टप्पा पडू दिल्यावर आजमावणं. आपला मार्ग ज्याचा त्याने शोधायचा असतो आणि हे ज्ञान केवळ अनुभवातून मिळत असतं.!’ 


लेगस्पिन टाकणं व खेळणं ही दक्षिण आफ्रिकन क्रिकेटमधील पारंपरिक उणीव. त्यांचं भाग्य मोठं की, त्यांना सुभाष गुप्तेला सामोरं जावं लागलं नाही. पण जुन्या जमान्यातील क्लॅरी ग्रिमेट, बिल ओरैली, रिची बेनॉ, कॉलिन मॅकूल, जॉन ग्लीसन ते शेन वॉर्न व मॅकगिल यांनी त्यांना नाचवलंय. पूर्वी लेगब्रेकपेक्षा गुगली जास्त टाकणाऱ्या अनिल कुंबळेला ऑफस्पिनर मध्यमगती इनस्विंग गोलंदाज म्हणून ते काही काळ खेळले. पाकिस्तानी अब्दुल कादर व मुश्ताक अहमद यांनीही त्यांना सतावलं असतं. दक्षिण आफ्रिकेचे अॅथॉल रोवन, ह्यू टेफिल्ड, पॅट सिमकॉक्स हे सारे ऑफ स्पिनर्स. पण दीर्घकाळ उंच, अति उंच जलद व अति जलद गोलंदाजांची पूजा करताना त्यांनी लेगस्पिन उपेक्षित ठेवलंय. त्या धोरणाचे काही फायदे तसे काही तोटे! 


झटपट मालिकेत विराट कोहलीची दादागिरी डॉन ब्रॅडमनना साजेशीच! कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात डिव्हिलियर्स त्याच्यापेक्षा सरस खेळला. पण त्यानंतरचा दोन्हीही कसोटीवर छाप विराटचीच. मालिकेतील एकमेव शतकवीर तोच. धावा ४७.६६ सरासरीने २८६ झटपट मालिकेत तर दोन देशातील मालिकेत पाचशेचा पल्ला पार करणारा तो पहिलाच फलंदाज. सहा सामन्यांत तीन शतकांसह ५५८ धावा. शिखर धवन व रोहित शर्मा यांचे एकेक शतक. या त्रिमूर्तीची धावराशी हजारावर. 


जसप्रीत बुमराह हा भारताला गवसलेला हिरा. त्याला वगळायचं म्हणजे धवन व रोहितला वगळल्यासारखं अशी तारीफ विराट करतो. भुवनेश्वरकुमारनं कसोटीपाठोपाठ झटपट कसोटीही गोलंदाजीसह फलंदाजीतील उपयुक्तता सिद्ध केली. नवोदित पंड्यात या सगळ्यांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. प्रश्न एवढाच. शिकून घेणारा तो कितपत उत्सुक आहे? 


सरतेशेवटी सवाल बीसीसीआयला. 
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत हवामान व खेळपट्ट्या यांच्याशी रुळावण्याकरता पाच दिवसच दिले. त्याऐवजी तीन आठवडे दिले असते अन् कसोटीआधी तीन वा चार दिवसांचे किमान तीन सामने दिले असते तर कसोटी मालिकेचाही निकाल वेगळा लागण्याची शक्यता खूप वाढली नसती? 
मला मान्य आहे की, अशा सराव सामन्यात कोणताही यजमान देश आपले प्रमुख फलंदाज खेळवतो, पण प्रमुख गोलंदाज लपवतो-छपवतो. अशा परिस्थितीत निव्वळ सरावासाठी भारतातून नेलेले व ताशी १३५-१४० किमी मारा करणारे चौघे भारतीय भारताविरुद्ध खेळवता आले असते. 
एवढं नक्की, कसोटी मालिकेत जे गमावलं ते कमावता आलं असतं. बीसीसीआयला आपला गुन्हा आज तरी मान्य आहे का? घाबरू नये बीसीसीआयने! गुन्हेगारांना भारतात शिक्षा होते कुठे?


- वि. वि. करमरकर (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)

बातम्या आणखी आहेत...