आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग राष्ट्रकुल स्पर्धांबाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘इंग्लंडने भारताचा धसका घेतलाय, असली भाषा फारशी करू नका. गोल्डकोस्टमधील निकालांवर एक नजर टाका. २६ सुवर्णांसह ६६ पदकं कमावणाऱ्या भारताचा धसका ४५ सुवर्णांसह १३६ पदकांची लयलूट करणाऱ्या इंग्लंडने घेतलाय, असा दावा करणं भंपकपणाचंच. शूटिंग स्पर्धांबाबतची आग्रही विनंतीवजा मागणी भारताने केलीच पाहिजे, पण इंग्लंड टरकलाय असली भाषा फारशी करू नये. इंग्लंड आजच्या नव्हे, तर उद्या-परवा-तेरवाच्या भारताला वचकून आहे, एवढंच समजावं.

 

४४ सुवर्ण, २५ रौप्य अन् ११ कांस्य एकूण पदकं ८०. तीही ७१ देशांतील पाठोपाठच्या तीन आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शर्यतींतली. ही लूटमार कुणाची असावी?  
क्रीडा क्षेत्रात अशा प्रश्नाला सामोरं जाताना कुणाच्याही डोळ्यापुढे सर्वप्रथम नाव येईल महासत्ता अमेरिकेचं. यूएसए, युनाएटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं. त्यानंतर येईल २१ व्या शतकातील दुसऱ्या महासत्तेचं, चीनचं. वयस्कर पिढीच्या आठवणी चाळवतील अन् ते नाव घेतील सोव्हिएट रशियाचं उर्फ युनियन ऑफ सोव्हिएट सोशालिस्ट रिपब्लिकचं, यूएसएसआरचं. काही लोकांना आठवेल जर्मनीला दुभंगणारी कुप्रसिद्ध भिंत कोसळेपर्यंत चार दशकं टिकलेल्या पूर्व जर्मनीचं उर्फ जीडीआरचं उर्फ जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिकनचं.  

 
काही रसिकजन आठवणी काढतील ऑलिम्पिक बास्केटबॉल अन् १०० मीटर्स धाव शर्यतीतील अमेरिकेतील कृष्णवर्णीय खेळाडूंची विजयमालिका. आणखी कुणाच्या नजरेत येईल पल्लेदार धाव शर्यतीतील आफ्रिकी अॅथलिटची दादागिरी, तसेच बॉक्सिंगमधील छोट्या क्युबाचं अतुलनीय यश..आणि असंच काही..

  
भारताचही नाव जरूर घेतलं जाईल, ते मात्र हॉकीच्याच संदर्भात. दुसऱ्या महायुद्धाआधीची तीन ऑलिम्पिक अन् दुसऱ्या महायुद्धानंतरची तीन ऑलिम्पिक म्हणजे १९२८ ते १९५६ अशा लागोपाठच्या सहा ऑलिम्पिकमध्ये दोन सोनेरी हॅट््ट्रिक रचणाऱ्या हॉकीपटूंच्या संदर्भात. मेजर ध्यानचंद, रूपसिंग, किशनलाल, दिग्विजयसिंग बाबू, बलबीरसिंग, उधम सिंग प्रभृतींच्या संदर्भात, पण भारतापुरतं बोलायचं आणि विसाव्या शतकापर्यंत सांगायचं तर ितथेच पूर्णविराम.

  
आता त्या साऱ्या यशोगाथांना अतिशय माफक मर्यादित क्षेत्रात का होईना, ऑलिम्पिकच्या आसपासही येऊ न शकणाऱ्या तृतीय श्रेणीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा शर्यतीत का होईना, मलईदार दुधाची तहान पाणचट ताकावर भागवताना का असेना, ४४ सुवर्णांसह २५ रौप्यांचा अन् ११ कांस्यसह ८० पदकांच्या कमाईचा रुबाब मिरवलाय भारतीय नेमबाजांनी. समशेर जंग, अंजली भागवत, गगन नारंग, तेजस्विनी सावंत-दरेकर प्रभृतींनी. त्याच कामगिरीच्या ओघात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत इंग्लंड दुसऱ्यांदा फेकलं गेलं तिसऱ्या स्थानावर. दिल्लीत २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत भले इंग्लंडनं एकंदर १४२ व भारतानं फक्त १०१ पदकं कमावलेली असोत, पण भारताची ३८ सुवर्णपदकं इंग्लंडला मागे सारणारी. प्रथमच तिसऱ्या पायरीवर उतरवणारं ठरलं. त्याची किंमत आता भारताला द्यावी लागत आहे काय? १९७० नंतर प्रथमच शूटिंग खेळास राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांबाहेर फेकण्याचे तेही कारण असावं काय?

  
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत पहिले तीन क्रमांक ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व कॅनडा यांच्यातच लागतात. भारताचं स्थान असे चौथे-पाचवे-सहावे-आठवे. १९९४मध्ये नायजेरिया व केनिया यांच्यानंतर सहावे. १९९८मध्ये मलेशिया, द. आफ्रिका, न्यूझीलंड व केनिया यांच्याखालोखाल आठवे अन् २०१०ला यजमान स्कॉटलंडपाठोपाठ पाचवे. सहसा इंग्लंड सव्वाशे पदकांचा अन् ऑस्ट्रेलियाने दोनशेच्या आसपास भरारी मारली तरी त्यांना जाणवायचं की, उद्या-परवा-तेरवा ना द. आफ्रिका ना न्यूझीलंड ना केनिया ना नायजेरिया आपल्याला आव्हान देऊ शकेल. ती क्षमता उद्या, परवा, तेरवा कमावू शकेल, १३० कोटींचा खंडप्राय भारतच. दीर्घकाळ झोपलेला, पण आळोखेपिळोखे देत उठू लागलेला, १९८२ नंतरचा नवभारत! 

  
बर्मिंगहॅमला २०२२मध्ये २७ जुलै ते ७ ऑगस्ट अशा १२ दिवसांत होऊ घातलेल्या २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची पार्श्वभूमी काय आहे? संयोजनासाठी मूळ दावेदार होते, दक्षिण आफ्रिकेतील डरबन अन् कॅनडातील एडमंटन अलबर्टा. २०१५च्या फेब्रुवारीत एडमंटनने माघार घेतली. साहजिकच डरबनचं नाव पक्क झालं. आफ्रिकेत प्रथमच होणाऱ्या स्पर्धांसाठी नेल्सन मंडेलांचा जन्मदिन, १८ जुलै हा उद््घाटनाखाली निश्चित केला गेला. पण भ्रष्टाचारानं पोखरलेल्या दक्षिण आफ्रिकेला संयोजनाचं आव्हान आवाक्याबाहेरचं भासू लागलं. मार्च २०१७मध्ये राष्ट्रकुल क्रीडा फेडरेशननेच त्यांच्याकडून संयोजनाचे अधिकार व जबाबदारी काढून घेतली. संयोजनासाठी लिव्हरपूल, मँचेस्टर अन् बर्मिंगहॅम ही ब्रिटिश शहरे पुढे आली. २१ डिसेंबर २०१७ला त्यातून बर्मिंगहॅम निवडलं गेलं. बर्मिंगहॅमचे नाव निश्चित झालं अन् दुसऱ्याच दिवशी बीबीसीने बातमी दिली : संयोजक शूटिंग वगळण्याची शक्यता दिसतेय. अन् त्याच वेळी महिला क्रिकेटचा समावेश करण्याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीशी बोलणी करत आहेत. मग महिनाभरात म्हणजे यंदाच्या जानेवारीत राष्ट्रकुल क्रीडा फेडरेशनचे सीईओ डेव्हिड ग्रेवेनबर्ग यांनी अधिकृत घोषणा केली : आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत शूटिंग नसेल! 

 
शूटिंग का नको? याबाबत अनधिकृतपणे सांगितलं जातं : बर्मिंगहॅम परिसरात शूटिंगच्या सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. हे अधिकृत कारण असेल तर आधुनिक शूटिंग रेंज आदी सुविधांवर खर्च करणं इंग्लंडला परवडत नाही!

  
शूटिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च येणार तो किती? तोही खर्च न परवडण्याइतकी बर्मिंगहॅमची व इंग्लंडची हालत झालीय, अशी जाहीर कबुली देणं इंग्लंडला परवडण्याजोगं आहे का? तशीच निकड असेल तर स्पर्धक देशांकडे इंग्लंडने आर्थिक मदत मागावी. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भरवण्यास इतर कोणी पुढे येत नसताना इंग्लंडमधील तीन शहरे पुढे आली. या स्पर्धा भरवण्यास आशिया, आफ्रिका, कॅरेबियन यातील अर्धविकसित देश फार मोजक्या वेळा पुढे आले. त्यांनी कर्तव्य मानून छोटे-मोठे योगदान द्यावेही. त्यातही काही गैर नाही. 

 
आणखी एक मुद्दा : लंडनला २०१२चं ऑलिम्पिक बऱ्याचशा वाजवी खर्चात यशस्वी झालं. त्याआधी मँचेस्टरला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत. या दोन्हीही शहरांत शूटिंग अद्ययावत, इन्फ्रास्ट्रक्चर असणारच. ही शहरंही इंग्लंडमध्येच आहेत. महिला क्रिकेटसह इतर सारे खेळ बर्मिंगहॅमला होत असताना मँचेस्टर वा लंडन येथे शूटिंग स्पर्धा झाल्या तर काय बिघडलं? एरवीही ऑलिम्पिक संयोजनाचे शहर हे बंदर नसल्यास सागरी वा तळ्यातील शर्यती (यॉटिंग, कनोइंग, कायाकिंग, रोइंग) अन्यत्र होत नाहीत का?

  
बर्मिंगहॅम स्पर्धा होणार जुलै-ऑगस्ट २०२२ला. त्याला अजून सव्वाचार वर्षे आहेत. वाटाघाटींनी, बैठकींनी हा प्रश्न सोडवण्यास भरपूर वेळ हाताशी आहे. पण यातील रस्सीखेच शेवटच्या क्षणापर्यंत  गेली तर जागोजागच्या शूटर्सना पूर्वतयारीचे वेळापत्रक कसे आखता येईल? 

 
सरतेशेवटी माझ्या देशबांधवांना आग्रहाची विनंती : इंग्लंडने भारताचा धसका घेतलाय, असली भाषा फारशी करू नका. गोल्डकोस्टमधील निकालांवर एक नजर टाका. २६ सुवर्णांसह ६६ पदकं कमावणाऱ्या भारत देशाचा धसका ४५ सुवर्णांसह १३६ पदकांची लयलूट करणाऱ्या इंग्लंडने घेतलाय, असा दावा करणं भंपकपणाचंच. शूटिंग स्पर्धांबाबतची आग्रही विनंतीवजा मागणी भारताने केलीच पाहिजे, पण इंग्लंड टरकलाय असली भाषा फारशी करू नये. इंग्लंड आजच्या नव्हे, तर उद्या-परवा-तेरवाच्या भारताला वचकून आहे, एवढंच समजावं.

   
गोल्डकोस्टला चमकलेले मोजके असली तारे म्हणजे नेमबाज मनिका भामर अन् अनिश भानवाला, वेटलिफ्टर मीराबाई चानू व भालाफेकपटू नीरज चोप्रा अन् पहिलवान बजरंगी व विनेश फोगट. तसेच बॅडमिंटनपटू सिंधू, सायना व प्रणॉयसह श्रीकांत ऑलिम्पिकसाठी हीच खरी आशास्थाने. मल्ल राहुल आवारे व नेमबाज तेजस्विनी सावंत या मराठी खेळाडूंसह पंजाबची (महाराष्ट्राची नव्हे) हिना संधू व टेबल टेनिसपटू मनिका बात्रा अन् दुहेरी जोडी चिराग शेट्टी व सात्त्विक यांच्या एशियाडमधील कामगिरीकडेही मोठ्या अपेक्षांसह पाहूया.

     

बातम्या आणखी आहेत...