आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत बसवेश्वरांच्या विचारांना वैधानिक अधिष्ठान मिळवून देण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - व्यक्तिकेंद्रित प्रवृत्तीचे वाढते स्ताेम, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याविषयी बहुचर्चित ठरलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने संत बसवेश्वर वचन तत्त्वज्ञानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक विश्वनाथ कोरणेश्वर महास्वामीजी (उस्तुरी मठ, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्याशी श्री बसवेश्वर जयंतीच्या पार्श्वभूमीवर साधलेला संवाद.

लिंगायत धर्म तर संत बसवेश्वरांनी आधीच स्थापन केला आहे. आजची धर्माच्या मागणीची चळवळ ही केवळ शासकीय लाभांसाठीच नाही, तर संत बसवेश्वरांच्या श्रेष्ठ विचारांना वैधानिक अधिष्ठान मिळवून देण्यासाठी आहे. म्हणून लिंगायत धर्माच्या मान्यतेसाठी आमचे प्रयत्न आहेत, तो आमचा हक्क असून मिळेपर्यंत आमचा लढा संपणार नाही. आम्ही धर्मसमर्थक विज्ञानवादी आहोत, विरोधक हे सनातनी आहेत, असे महास्वामीजी म्हणाले.

 
बाराव्या शतकात संत बसवेश्वरांनी लोककल्याणार्थ समानतेची चळवळ उभारली. स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. वचनांतून सामाजिक न्याय संकल्पना मांडली. व्यक्तिपूजेचे वाढते स्तोम, मंदिरे-मूर्ती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अंधश्रद्धेला मूठमाती दिली. देवधर्माच्या नावावर पिचलेल्या अज्ञानी समाजाचे शोषण थांबवण्यासाठी क्षुद्र-अतिक्षुद्र समुदायांना एकत्र आणले. आत्मिक चिंतनासाठी इष्टलिंगाचा पर्याय दिला. सनातनी विचारांची होळी केली. बसवेश्वरांचे विचार पटल्यामुळे अनेक जाती-धर्मांतून लोक अनुभव मंडपाच्या माध्यमातून एकत्र आले. प्रतिकूल परिस्थितीत एकत्र आणलेला लोकसमूह एकसंध ठेवण्यासाठी आणि विज्ञानवादी विचार भविष्यातही टिकून तो कालानुरूप प्रगल्भ होत जाण्यासाठीच बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. लिंगायत धर्मात इतर जाती-धर्माच्या समूहातूनही लोक आले होते. त्यात प्रामुख्याने शैवांचाही समावेश होता. अंधारात चाचपडणाऱ्या समाजाला जागे करण्यासाठी संत बसवेश्वरांनी परखड वचने लिहिली. समकालीन सिद्धरामेश्वरांनीही बसवेश्वरांच्या वचनांचे महत्त्व ओळखून समाजाला विधायक दिशा देण्याचा प्रयत्न केला. आजच्या आधुनिक समाजात व्यक्तिपूजेचे स्तोम वाढवणारे स्वार्थी धर्माधिकारी नष्ट होण्याऐवजी फोफावत आहेत. अशा ढोंगी नी व्यक्तिकेंद्रित प्रवृत्तींना वेसण घालण्यासाठी लिंगायत धर्मातील बुद्धिजीवी आणि उच्चशिक्षितांनी एकत्र येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे. व्यक्तिपूजेचे स्तोम माजवणाऱ्या स्वार्थी लोकांपासून सामान्य समाजाला सावध करण्याऐवजी तथाकथित बुद्धिजीवी, समाजधुरीण आणि उच्चशिक्षित लोक त्यांचे दलाल म्हणून काम करताहेत, हे दुर्दैव आहे. कारण अशामुळे समाज पुन्हा शोषणाच्या खाईत जाईल. म्हणून आता लिंगायत धर्मातील समाजासमाेर स्वार्थी लोकांना आणि त्यांच्या दलालांनाही वेळीच वेसण घालण्याचे दुहेरी आव्हान आहे. आजच्या घडीला लिंगायत धर्माच्या आग्रही मागणीबाबत महास्वामीजी म्हणाले, लिंगायत धर्म तर संत बसवेश्वरांनी आधीच स्थापन केला आहे. आजची धर्माच्या मागणीची चळवळ ही केवळ शासकीय लाभांसाठीच नाही, तर संत बसवेश्वरांच्या श्रेष्ठ विचारांना वैधानिक अधिष्ठान मिळवून देण्यासाठी आहे. म्हणून लिंगायत धर्माच्या मान्यतेसाठी आमचे प्रयत्न आहेत, तो आमचा हक्क असून मिळेपर्यंत आमचा लढा संपणार नाही. आम्ही धर्मसमर्थक विज्ञानवादी आहोत, विरोधक हे सनातनी आहेत, असे ते म्हणाले.

  
महास्वामीजी म्हणाले, जन्मभूमी कुडलसंगम (जि. विजयपूर) येथे संत बसवेश्वरांचे विचार पुढे नेण्याचे कार्य वर्षानुवर्षांपासून चालू आहे. वचनभूमी अनुभव मंडप - बसवकल्याण (जि. बीदर) येथेही अखंड विचारमंथन होत आले आहे. विश्वव्यापी समतेचे विचार मांडण्यासाठी अनुभव मंडप पीठाच्या माध्यमातून जगातील पहिली लोकशाही संसद संत बसवेश्वरांनी निर्माण केली. देश-विदेशातील हजारो विचारवंतांनी बसवेश्वरांच्या कार्याचा गौरव केला. म्हणूनच संत बसवेश्वरांचा पुतळा लंडनमधील थेम्स नदीकिनारी बसवण्यात आला आहे, मात्र कर्मभूमी मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे बसवेश्वरांच्या नावाचा एक दगडही नसावा, हे बसवेश्वरप्रणीत मानवी मूल्यांच्या अध:पतनाचे लक्षण असल्याचे महास्वामीजी म्हणाले.

 

यशवंत पोपळे 

बातम्या आणखी आहेत...