Home | Editorial | Columns | article on Farmer researcher Ramoji Khobragade

‘दादा’ संशोधक!

जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक | Update - Jun 05, 2018, 06:01 AM IST

दादाजी रामोजी खोब्रागडे हे अल्पभूधारक, तिसरीपर्यंत शिकलेले शेतकरी. मात्र त्यांची दखल जगप्रसिद्ध ‘फोर्ब्ज’ मासिकाने २०१०

  • article on Farmer researcher Ramoji Khobragade

    दादाजी रामोजी खोब्रागडे हे अल्पभूधारक, तिसरीपर्यंत शिकलेले शेतकरी. मात्र त्यांची दखल जगप्रसिद्ध ‘फोर्ब्ज’ मासिकाने २०१० मध्ये घेतली. सर्वाेत्तम ग्रामीण उद्याेजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले यातच त्यांच्या महत्तेसह सर्वकाही सामावलेले आहे. या अवलिया संशाेधकाची दखल शालेय अभ्यासक्रमातील ‘थाेरांची अाेळख’मध्ये राज्य शासनाने घेतली हेही नसे थाेडके! उल्लेखनीय म्हणजे ज्या विदर्भापासून शेतकरी आत्महत्यांचे लाेण देशभर पसरले त्याच विदर्भाचे दादाजी हे भूमिपुत्र होत. त्यांना जडलेला पक्षाघात हा काही असाध्य आजार नव्हता. मुंबई-पुण्यातील रुग्णालयांमध्ये या आजाराने ग्रासलेले असंख्य रुग्ण दाखल होतात अन् ठणठणीत बरे होऊन घराकडे परततात. त्यामुळे दादाजी यांचे निधन हे व्यवस्थेच्या अनास्थेचा बळी म्हणावा लागेल. चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड हे दादाजी यांचे गाव. अवघ्या दीड एकरात १९८५-९० या काळात एचएमटी धानाचे वाण विकसित करण्याचे प्रयाेग त्यांनी सुरू केले. त्यात त्यांना यशही अाले. या वाणाने नंतर अनेक विक्रम नाेंदवले. ‘एचएमटी’ने त्यांची ख्याती जगभर पसरवली. सध्या पाच राज्यांतील १ लाख हेक्टरवर त्याची लागवड हाेते. त्यानंतरच्या ३० वर्षांत त्यांनी याच काळ्या मातीच्या कुशीत अाणखी ९ प्रजाती विकसित केल्या. त्याबद्दल त्यांना १२ राष्ट्रीय-अांतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.

    जगभर गाैरवपूर्ण ठरलेले ‘एचएमटी’ वाण विकसित करण्याचे प्रयाेग अवघ्या दीड एकरात त्यांनी केले. त्यामुळे सरकारी व्याख्येत बोलायचे तर दादाजी खाेब्रागडे हे अत्यल्प भूधारक. सामान्यपणे संशोधकाला विज्ञान शाखेचे ज्ञान व पदवी असल्याखेरीज संशोधक म्हणून मान्यता मिळत नाही. मात्र प्रचलित सगळे समज मोडीत काढण्याची किमया दादाजी खोब्रागडे यांनी केली. त्यांनी तांदळाच्या एचएमटीसह नांदेड चेन्नूर, डीआरके, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड दीपक, नांदेड हिरा, काटे एचएमटी, डीअारके टू अाणि डीअारके ही वाणे विकसित केली. तांदळाच्या वाणांची नावे लक्षात घेतली तरी अापल्या गावाप्रति असलेली अस्मिता वा जिव्हाळा त्यातून ध्वनित होतो. आजही प्रचलित व्यवस्थेत अग्रगण्य मानले जाणारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी महाविद्यालय असो की, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ -या संस्थांसारखी शेकडो एकर सुपीक जमीन, मुबलक पाणी, सिंचनासाठी साधनसामग्री, अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च विद्याविभूषित संशोधक वा शेतीतज्ञ दिमतीला नसतानाही दादाजी यांनी ‘धान’ अर्थात तांदळाच्या प्रजातींविषयी केलेले संशोधन अजरामर ठरेल असेच आहे. संशोधक म्हटला की, त्याचे वेगळेच व्यक्तिमत्त्व नजरेसमोर उभे राहते. यापैकी बरीच मंडळी साधारणपणे संकुचित असतात. आपण केलेले संशाेधन स्वत:च्याच नावावर कसे राहील याची पुरेपूर दक्षता घेतात. दादाजींच्या स्वभावात याचा लवलेशही नव्हता. कारण या संशोधनाच्या परिणामातून बाहेर आलेल्या अनेक वाणांची त्यांनी एक छोटेखानी बँक तयार केली होती. विदर्भासह देशाच्या कानाकोपऱ्यातून कुणीही जिज्ञासू शेतकरी त्यांच्याकडे माहिती घेण्यासाठी जात असे तेव्हा ते संशोधनाची बारीकसारीक माहिती देत. एवढेच काय तर संशोधित वाणाचे सॅम्पल्सही पुरवत.


    शेतकऱ्यांना शिक्षित करण्याची आवड अन् स्वज्ञान गरजूंना देण्याची दानत त्यांच्या ठायी होती. ‘कृषिभूषण’सह १०७ पुरस्कारांचा सन्मान त्यांच्या वाट्याला अाला. चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेडसारख्या पडद्याआडचे दुर्लक्षित गाव ही दादाजी यांची संशोधनभूमी असली तरी तांदळाच्या संशोधनातील त्यांच्या योगदानामुळे जगाच्या नकाशावर ठळकपणे ओळखली जात अाहे. दादाजी यांनी विकसित केलेल्या धानाच्या प्रजातीचे पेटंट घेतले नाही किंबहुना त्याचे मार्केटिंगही केले नाही. कारण कॉर्पोरेट जगतातील मार्केटिंगचा फंडा त्यांच्या गावी नव्हता. म्हणूनच त्या प्रजातींचे पेटंट स्वत:च्या वा कुटुंबीयांच्या नावे ते करू शकले नाहीत. त्यांच्या सान्निध्यात आलेले शेतकरी संपन्न झाले, स्वत: मात्र अखेरपर्यंत कफल्लक राहूनदेखील तांदळाच्या प्रजातींच्या रूपात अमर्त्य ठरले.

Trending