आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्य!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी, एकता मंचच्या विचारपीठासमोर आंबेडकरी अनुयायांनी प्रचंड गर्दी केली होती. यातूनच रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचीही आता चर्चा होऊ लागली आहे. रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य झाले तर ती बाब निश्चितच स्वागतार्ह ठरेल. पण रिपब्लिकन गटांचे ऐक्य खरोखरच प्रत्यक्षात साकार होईल काय, हा खरा प्रश्न आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामांतर वर्धापनदिनी औरंगाबाद शहरातील आंबेडकरी तरुणांनी ‘एक विचार एक मंच’ असा ऐक्यभावनेस चालना देणारा एक चांगला उपक्रम राबवला. दरवर्षी विद्यापीठ गेटवर वेगवेगळ्या दलित संघटना आपापले स्वतंत्र विचारमंच उभारून भाषणे देत असतात. खरे तर दलित नेत्यांनी विद्यापीठ गेटवर भाषणे देण्याची काही गरजच नाही. कारण चैत्यभूमी, दीक्षाभूमी, कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ, बाबासाहेबांचे जन्मस्थळ महू वा औरंगाबादचे विद्यापीठ गेट येथे जमणारा आंबेडकरी जनसमूह हा काही कुणा नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी येत नाही तर उपरोक्त सर्व ठिकाणे म्हणजे समतेच्या चळवळीतील समतेची प्रतीके आहेत. म्हणून या प्रतीकांना वंदन करण्यासाठी तिथे जमत असतो. या ठिकाणी लोकांनी पुस्तके विकत घ्यावीत. प्रबोधनात्मक गाणी ऐकावीत, एकमेकांची गळाभेट घेऊन आनंदोत्सव साजरा करावा, अशी अपेक्षा असते. मात्र दलित पुढारी आपापले स्वतंत्र तंबू ठोकून भाषणे करीत असतात. यास आंबेडकरी तरुणांनी यंदा शांततामय पद्धतीने अटकाव केला, हे बरे झाले. अर्थात या उपक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सहभागी होणार नव्हते, हे उघड होते. कारण ज्या एकता मंचावरून संघ भाजप सरकारवर टीका होणार हे स्पष्ट होते, त्या मंचावर उपस्थित राहून आठवले आपले मंत्रिपद कशासाठी बरे धोक्यात आणतील? 


 कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर यंदा १ जानेवारी रोजी जाती-धर्माचे राजकारण करणाऱ्या हिंदू धर्मांध शक्तींकडून जीवघेणी दगडफेक झाली. त्यांची वाहने जाळण्यात आली.  कोरेगाव भीमाच्या दंगलीमुळे दलित समाज अस्वस्थ आहे. दलित समाजाला म्हणूनच आता ऐक्याचीही गरज तीव्रतेने जाणवू लागली आहे. एकता मंचच्या विचारपीठासमोर म्हणूनच आंबेडकरी अनुयायांनी प्रचंड गर्दी केली होती. यातूनच रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचीही आता चर्चा होऊ लागली आहे. रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य झाले तर ती बाब निश्चितच स्वागतार्ह ठरेल. पण रिपब्लिकन गटांचे ऐक्य खरोखरच प्रत्यक्षात साकार होईल काय, हा खरा प्रश्न आहे. 

 
रिपब्लिकन ऐक्याचा जेव्हा जेव्हा विचार होतो, तेव्हा तेव्हा आंबेडकरी समाजाला वाटते की, सर्व छोट्या-मोठ्या रिपब्लिकन गटांच्या नेत्यांनी एकत्र येऊन एकसंध रिपब्लिकन पक्ष उभारावा. अपेक्षा चूक नाही. पण प्रश्न असा की, जातीचे चार नेते एकत्र आणले व जातीआधारित पक्षाचे संघटन  उभारले म्हणजे रिपब्लिकन पक्षाला खरोखरच सत्ता मिळेल काय? जातीचाच विचार केला तर बौद्धांची संख्या ८ टक्के आहे. सत्ता मिळवायची तर ३० टक्के मते लागतात. तेव्हा उरलेली २२ टक्के मते कुठून आणणार? सत्ता मिळवायची तर जातीच्या पलीकडे जाऊन अन्य दलित जाती, भटके-विमुक्त आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समाज वर्गाचा सहभाग वाढवावा लागेल ना... पूर्वाश्रमीचा जनसंघ आणि आजचा भाजप हा एकेकाळी शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. पण फक्त भांडवलदार-ब्राह्मणांच्या मतांवर सत्ता मिळू शकत नाही, हे संघ भाजपने ओळखले व ओबीसी, आदिवासी, दलित समाजात जाऊन पक्षसंघटन वाढवले व दोन खासदारांवरून झेप घेऊन आता केंद्रात आणि १८ राज्यांत सत्ता मिळवली. केवळ मुस्लिम वा दलित मतांच्या बळावर सत्तेचा सोपान चढता येत नाही, हे ओळखूनच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंदूंचा पाठिंबा मिळवण्यासाठी गुजरातमध्ये मंदिर भेटीवर भर दिला. मायावतींनी सोशल इंजिनिअरिंगचा यशस्वी प्रयोग करून सत्ता मिळवली होती. अशा स्थितीत आंबेडकरी जनता मात्र केवळ बौद्ध-समाजाचे जातीआधारित ऐक्य करून सत्तेची दिवास्वप्ने पाहते, हा त्यांचा राजकीय भाबडेपणाच नव्हे काय? मूळ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या जातिअंताच्या राजकारण-समाजकारणाचा पुरस्कार केला, त्याचे काय?  


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रारंभी स्वतंत्र मजूर पक्ष उभारून व्यापक राजकारणाचा प्रयोग केला. पण स्वातंत्र्यपूर्व काळात जातीआधारित राजकारण प्रभावी ठरू लागल्यामुळे त्यांना परिस्थितिवश शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे राजकारण करावे लागले. पण स्वातंत्र्य मिळताच जातीआधारित पक्षाची गरज नाही, हे ओळखून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची व्यापक संकल्पना मांडली. त्यांनी एस.एम. जोशी, डॉ. राममनोहर लोहिया, आचार्य अत्रे आदींशीही रिपब्लिकन पक्ष उभारणीच्या संदर्भात पत्रव्यवहार केला होता. बाबासाहेबांना जातीचे राजकारण कदापि 
मान्य नव्हते.  


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर बौद्ध समाज राजकारणापासून वेगळा पडला होता. धर्मांतरामुळे रिपब्लिकन पक्षाची राजकीय कोंडी झाली होती. अशा स्थितीत दादासाहेब गायकवाड यांनी १९५७ च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीचा घटक पक्ष म्हणून निवडणुका लढवून रिपब्लिकन पक्षाची झालेली राजकीय कोंडी फोडली होती. त्या वेळी त्यांनी पक्षाचे आठ खासदार आणि १७ आमदार निवडून आणले होते. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असतानाच्या काळी दादासाहेब गायकवाड यांनी भूमिहीनांचा देशव्यापी सत्याग्रह केला होता. या वेळी सत्याग्रहींना ठेवायला तुरुंग अपुरे पडले. सत्याग्रहात केवळ दलितच नव्हे तर दलितेतर भूमिहीनही सहभागी झाले होते. दादासाहेबांचा हा भूमी सत्याग्रह म्हणजे जातिअंताच्याच लढ्याचा एक भाग होता. अशा स्थितीत जातीआधारित रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याची आस बाळगणे कितपत तर्कसंगत ठरते? 


बरे, रिपब्लिकन ऐक्याचा आजवरचा अनुभव काय आहे? तर ऐक्य करावयाचे आणि निवडणुकीच्या तोंडावर युती कोणत्या पक्षाशी करावयाची, या मुद्द्यावर ऐक्य फोडून टाकावयाचे. ऐक्यात पक्षाची एक राजकीय भूमिका निश्चित करून ती सर्वांनी मान्य करायला हवी. पण असे होत नाही आणि आज ऐक्य कुणी कुणाबरोबर करावयाचे? बाबासाहेबांनी हयातभर विषमताग्रस्त हिंदू-धर्म-जाती-व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला. मनुस्मृतीचे दहन केले. सनातन धर्मव्यवस्थेने नाकारलेले माणुसकीचे हक्क प्राप्त करून घेण्यासाठी हिंदुत्वविरोधी महासंग्राम केला. आणि आज काय होतंय? तर बाबासाहेबांच्या विचारविरोधी हिंदुत्वाचे धर्मांध राजकारण करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेच्या खुर्च्या उबवीत बसले आहेत. दलितांच्या विकास योजनांना कात्री लागत असताना आणि दलित विद्यार्थ्यांना दोन-दोन वर्षे शिष्यवृत्ती मिळत नसतानाही जे तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत, दलितांना रोजगाराच्या संधी नाकारल्या जात असतानाही जे गप्प बसले आहेत,  कोरेगाव भीमा, रोहित वेमुला, गुजरातेतील उना प्रकरण, सहारणपुरातील दलित अत्याचारप्रकरणी शासनास जाब न विचारता आपले मंत्रिपद कुरवाळत बसले आहेत. त्यांच्याशी ऐक्य कसे काय होऊ शकते?  


अजून असे की, आंबेडकरी चळवळीला फाटाफूट काही नवीन नाही. बाबासाहेब हयात असतानाच काँग्रेस व हिंदू महासभेच्या नादी लागून बाबासाहेबांना विरोध करणारे काही स्वजन दलितच होते. काँग्रेसने तर बाबू जगजीवनराम यांचा बाबासाहेबांच्या विरोधी वापर केला. पण बाबासाहेबांना विरोध करणाऱ्यांच्या मागे लोक गेले नाहीत तर ते बाबासाहेबांबरोबरच राहिले. दादासाहेब गायकवाड यांना बी.सी. कांबळेंनी विरोध करून रिपब्लिकन पक्षात फूट पाडली. पण लोक दादासाहेबांबरोबरच राहिले. तात्पर्य, रिपब्लिकन पक्षात जरी गटबाजी पूर्वापार राहत आली तरी जनाधार ज्या रिपब्लिकन नेत्यास मिळत गेला, तोच अधिकृत रिपब्लिकन पक्ष ठरत गेला. लोकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी व्यापक पातळीवर रिपब्लिकन ऐक्य होत असेल तर ते जरूर व्हावे. नपेक्षा जो रिपब्लिकन नेता दलित कष्टकरी समाजाचे प्रश्न घेऊन उभा आहे, त्याच्या पाठीशी जनतेने उभे राहावे. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता प्रमाण मानून आंबेडकरी चळवळ गतिमान करावयाची तर तिसऱ्या डाव्या सक्षम पर्यायाचाही विचार होऊ शकतो. सारांश, जातीआधारित रिपब्लिकन ऐक्याचा विचार करताना आपण लोकांच्या जीवनमरणाच्या मूलभूत प्रश्नांपासून तसेच जातिअंताच्या लढ्यापासून दूर जाऊन भावनात्मक ऐक्याच्या मृगजळामागे धावत आहोत की काय, याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार केलेला बरा, असे म्हटले तर चूक ठरू नये, दुसरे काय?


- बी.व्ही. जोंधळे, साहित्यिक-पत्रकार 

बातम्या आणखी आहेत...