आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प-किम भेटीचे फलित काय?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यापूर्वीही अनेकदा उत्तर कोरियाने आण्विक निःशस्त्रीकरणाची आश्वासने देऊ केली आहेत. पण, त्यानंतरही अण्वस्त्रांच्या चाचण्या घेण्याचा कार्यक्रम मात्र थांबवला नव्हता. त्यामुळे यंदा दिलेले आश्वासन तरी उत्तर कोरिया पाळणार का, हा प्रश्नच आहे. यातही उत्तर कोरिया केवळ आपला आण्विक कार्यक्रम थांबवेल की असलेली अण्वस्त्रेही पूर्णपणे नष्ट करेल, हे स्पष्ट झालेले नाही. 

 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची १२ जून २०१८ रोजी सिंगापूर येथील सेंटोसा बेटावरील एका शाही रिसॉर्टमध्ये 'ऐतिहासिक भेट' झाली. या भेटीच्या चर्चा जगभरातील माध्यमांनी केल्या. या भेटीने काय साधलं, हा प्रश्न सध्या जगभर चर्चिला जात आहे. 


शीतयुद्ध काळात जगभरात घडलेल्या सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे कोरियाचे युद्ध. १९५३ मध्ये संपुष्टात आलेल्या युद्धाने कोरियन द्वीपकल्प विभागला गेला. या युद्धात संयुक्त राष्ट्राच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या फौजांनी दक्षिण कोरियात तथाकथित लोकशाही सरकारची स्थापना केली. सोव्हिएत रशिया आणि चीन या राष्ट्रांचा उत्तर कोरियाला पाठिंबा होता. तेव्हापासून साम्यवादी उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात वितुष्ट निर्माण झाले ते आजतागायत कायम राहिले आहे. शीतयुद्ध संपून २९ वर्षे झाली असली तरी कोरियन द्वीपकल्प विभाजित राहिला आहे. 


२००६सालापासून उत्तर कोरियाने सुरू केलेल्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे जगाच्या चिंतेत मोठी भर पडली होती. पुढे ही अण्वस्त्रे वाहून नेऊ शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या उत्तर कोरियाने सुरू केल्या आणि जग एका नव्या धोक्याच्या तोंडाशी येऊन उभे ठाकल्याची भावना निर्माण झाली. यामुळे उत्तर कोरिया आणि अमेरिका यांचे संबंध जास्त ताणले गेले. 


२०१६ मध्ये अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष झाले. तेव्हापासून किम आणि ट्रम्प यांच्यात साधारणपणे दर आठवड्याला अण्वस्त्रयुद्धाच्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या. याच काळात उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे दक्षिण कोरिया आणि जपान यांच्या चिंतेत मोठी भर पडली. यातूनच उत्तर कोरियाशी चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी वाढीस लागली. यावर उपाय म्हणून उत्तर कोरियावरील जागतिक समुदायातर्फे घातलेले निर्बंध आणखी कठोर केले गेले, ज्याची झळ उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेला बसू लागली. यातील काही निर्बंधांना चीनने पाठिंबा दिला आणि चर्चा करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उत्तर कोरियाकडे राहिला नाही. अचानक उत्तर कोरियाशी आपण चर्चा करणार असल्याचे ट्रम्प यांनी मार्च महिन्यात जाहीर केले. पण, या चर्चा कधी आणि कुठे होणार; शिवाय, त्यातून काय साध्य होणार, हा प्रश्न मोठा होता. या पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि किम यांची झालेली भेट जागतिक दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरते. 


या भेटीदरम्यान कोणत्याही ठोस करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या नाहीत. काही पाश्चात्य माध्यमांच्या मते या भेटीत काही गुप्त करार करण्यात आल्याच्या शक्यता आहेत. पण त्याविषयी कोणतीही ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही. या भेटीच्या निमित्ताने माध्यमांसाठी जे परिपत्रक जारी करण्यात आले त्यात चार मुख्य मुद्दे आहेत. 


पहिल्या मुद्द्यानुसार उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्या संबंधांत मैत्रीचे नवे पर्व सुरू केले जाणार आहे. त्यानुसार आजवर न झालेल्या उच्चस्तरीय बैठकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. दुसरा मुद्दा, कोरियन द्वीपकल्पात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने उत्तर कोरियाला सुरक्षिततेची हमी दिली आहे. यानुसार उत्तर कोरियाने अण्वस्त्र चाचण्या त्वरित थांबवण्याची ग्वाही दिली असून अमेरिकेचे दक्षिण कोरियात केले जाणारे युद्ध सराव थांबवण्याची आणि "दक्षिण कोरियात असलेले आमचे सैनिक भविष्यात माघारी बोलावण्याचा विचार आम्ही नजीकच्या काळात करू,' अशी घोषणाही ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना केली, ज्यामुळे दक्षिण कोरियाच्या काळजाचा ठोका चुकला आहे. हा मुद्दा आपल्याला विचारात न घेताच मांडला गेल्याची खंत दक्षिण कोरियाच्या सरकारने आणि माध्यमांनी व्यक्त केली. तिसरा मुद्दा - कोरियन युद्धाच्या काळात जीव गमावलेल्या व्यक्तींचे अवशेष त्यांच्या देशांकडे आणि नातेवाइकांकडे सुपूर्द केले जाणार आहेत. यातील चौथा मुद्दा मात्र सर्वात महत्त्वाचा आहे. या मुद्द्याअंतर्गत उत्तर कोरिया 'संपूर्ण आण्विक निःशस्त्रीकरण' करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. त्या दिशेने पावले टाकून कोरियन द्वीपकल्पाचे संपूर्ण आण्विक निःशस्त्रीकरण करणे हे अंतिम उद्दीष्ट असणार आहे. 


यापूर्वीही अनेकदा उत्तर कोरियाने आण्विक निःशस्त्रीकरणाची आश्वासने देऊ केली आहेत. पण, त्यानंतरही अण्वस्त्रांच्या चाचण्या घेण्याचा कार्यक्रम मात्र थांबवला नव्हता. त्यामुळे यंदा दिलेले आश्वासन तरी उत्तर कोरिया पाळणार का, हा प्रश्नच आहे. यातही उत्तर कोरिया केवळ आपला आण्विक कार्यक्रम थांबवेल की असलेली अण्वस्त्रेही पूर्णपणे नष्ट करेल, हे स्पष्ट झालेले नाही. 


या भेटीचे जगभरातील बहुतेक देशांकडून स्वागत करण्यात आले आहे. नॉर्वेच्या दोन खासदारांनी तर या भेटीसाठी ट्रम्प यांना शांततेचे नोबेल पारितोषिक दिले जावे, अशी शिफारस नोबेल समितीकडे केली आहे. जपानने या भेटीला 'कोरियन द्वीपकल्पात शांततेच्या दिशेने नवीन सुरुवात' असे म्हटले आहे. आण्विक युद्धाचा परिणाम जपान फार पूर्वीपासून जाणून आहे. त्यामुळे कोरियन द्वीपाच्या संपूर्ण निःशस्त्रीकरणाला जपानचा संपूर्ण पाठिंबा आहे. चीनच्या दृष्टीनेही ही भेट होणे महत्त्वाचे आहे. उत्तर कोरियाची सुरक्षितता अबाधित राहिल्याने दक्षिण कोरिया आणि चीनच्या उत्तर सीमांमध्ये एका 'बफर' देशाचे अस्तित्व राहणे चीनच्या फायद्याचे आहे. त्यामुळे या चर्चांना चीनने पाठिंबा दिला होता. मार्च आणि मे या दोन महिन्यांत किम यांनी दोनदा चीनचा दौराही केला होता. ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे भविष्यात अमेरिकेच्या फौजा दक्षिण कोरियातून माघारी गेल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा चीनलाच होणार आहे. भारताने या भेटीकडे सकारात्मक दृष्टीने पहिले आहे. 


अमेरिकेतील आणि जगातील काही माध्यमांनी मात्र या भेटीतून अमेरिकेसाठी नक्की काय साध्य झाले, हा प्रश्न उचलून धरला आहे. या भेटीपूर्वी ट्रम्प हे नेहमी उत्तर कोरियाकडून होत असलेल्या मानवाधिकार उल्लंघनाच्या मुद्द्यावर किम यांना माध्यमांच्या टीकेचे लक्ष्य करत असत. पण, या भेटीदरम्यान त्यांनी उत्तर कोरियातील या गंभीर मुद्द्याविषयी किम यांना साधा प्रश्नही विचारला नाही. इतकेच काय, पण येत्या काळात अमेरिका संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडणार असल्याच्याही शक्यता आहेत. 


गेल्या काही दशकांमध्ये जगभरात घडलेल्या अनेक युद्धांअंती अमेरिकेने जगातील हुकूमशहांना सत्तेपासून दूर केले, किंवा काहींना जिवे मारले. अशीच टांगती तलवार ही उत्तर कोरियावरही असल्याची भीती किम यांना वाटणे स्वाभाविक आहे. आण्विक अस्त्रांनी उत्तर कोरियाला अमेरिकेशी वाटाघाटी करण्याची ताकद दिली, असा एक मतप्रवाहही जगात आहे. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाने आण्विक निःशस्त्रीकरणाचा मार्ग स्वीकारल्यास उत्तर कोरियाच्या सुरक्षेला निर्माण होणारा धोका किम कसा टाळणार, हा प्रश्न आहेच. हे जाणणारे किम खरेच निःशस्त्रीकरण स्वीकारणार का, हा प्रश्न आहेच. 


किम आणि ट्रम्प हे दोघेही आपण घेतलेल्या भूमिकांपासून फारकत घेऊन अगदी विरुद्ध काम करतात, अशी त्यांची ख्याती आहे. पूर्वीच्या ओबामा प्रशासनाने इराण सोबत केलेला करार असो की पॅरिसचा हवामान करार असो, ट्रम्प सत्तेत आल्यापासून त्यांनी अगोदरचे अनेक निर्णय बदलले आहेत. त्यामुळे "सिंगापूरहून मायदेशी परतलेले ट्रम्प हे अमेरिकेत उतरण्याच्या आतच या निर्णयापासून फारकत घेत नाहीत ना, याची काळजी उत्तर कोरियाने घ्यावी,' असा खोचक सल्ला इराणने उत्तर कोरियाला दिला आहे. त्यामुळे जगाच्या दृष्टीने गाजलेली ही किम आणि ट्रम्प यांची ही भेट म्हणजे एका इतिहासाची सुरुवात आहे की बोलाची कढी आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होऊ शकेल. 


- संदेश सामंत (आंतरराष्ट्रीय संबंध विश्लेषक) 
messagesamant@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...