Home | Editorial | Agralekh | Divya marathi article on AAP strike

निवडणुकीसाठी नौटंकी (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Jun 18, 2018, 05:10 AM IST

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी व भाजप यांच्यातील कुरघोडी आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. ही कुरघोडी राष्ट्रीय मुद्दा होईल या

 • Divya marathi article on AAP strike

  दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी व भाजप यांच्यातील कुरघोडी आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. ही कुरघोडी राष्ट्रीय मुद्दा होईल याची खबरदारी भाजप विरोधकांनी घेतल्याने आणि भाजपने आढ्यताखोरपणा व मूर्खपणा एकाच वेळी दाखवल्याने दिल्लीतले नाट्य अधिक चिघळत चालले आहे.

  सात दिवसांपासून हे नाट्य दिवसागणिक अधिक रंगत गेले ते नायब राज्यपालांच्या संशयास्पद वर्तनाने. दिल्लीतल्या आयएएस लॉबीने संप पुकारल्याचा आरोप करत हा संप मिटवण्यासाठी नायब राज्यपालांनी मध्यस्थी करावी, असा आग्रह मुख्यमंत्री केजरीवाल यांनी नायब राज्यपालांकडे धरला होता. पण नायब राज्यपालांनी केजरीवाल यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खवळलेल्या केजरीवाल यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांसोबत नायब राज्यपालांच्या निवासस्थानातच उपोषणास सुरुवात केली. या मंडळींनी असाही एक गंभीर आरोप केला की, आयएएस अधिकाऱ्यांनी काम करू नये, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. मोदींच्या इशाऱ्यावरून दिल्लीतली विकासकामे पावसाळ्यापूर्वी ठप्प होतील व सरकारविरोधात एक आक्रोश तयार होईल असे केजरीवाल यांना म्हणावयाचे आहे.

  तर काँग्रेसच्या मते, दिल्ली सरकारने प्रचलित कायदे व नियमानुसार राज्य चालवावे, त्यांच्या मनासारखे नव्हे. दिल्लीत हे नाट्य रंगत असतानाच नीती आयोगाची पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक बैठक रविवारपासून सुरू झाली. केजरीवाल यांचे केंद्राशी सुरू असलेले भांडण पाहून प. बंगालच्या ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे एन. चंद्राबाबू नायडू, केरळचे पिनारयी विजयन व कर्नाटकचे कुमारस्वामी या भाजपेतर मुख्यमंत्र्यांना भाजपला घेरण्याची चांगलीच संधी मिळाली. शनिवारी या चारही मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांची भेट घेण्याची विनंती नायब राज्यपालांनी नाकारल्याने केजरीवाल यांच्या हातात कोलीत मिळाले. आपल्याला केंद्राकडून सापत्नभावाची वागणूक मिळत आहे तसा अनुभव बिगर भाजपशासित राज्यांतल्या मुख्यमंत्र्यांनाही मिळाला, असा दावा केजरीवाल आता ठामपणे सांगू शकतात.

  या चार मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी हा पेच सुटावा म्हणून मध्यस्थी करावी, असे आवाहन करून मोदींसमोर अडचण निर्माण केली. मोदी मध्यस्थी करतील याची खात्री कुणालाच नाही. पण मोदीच हा प्रश्न सोडवू शकतात असे वातावरण विरोधकांनी निर्माण केले आहे. पंतप्रधान हा तिढा सोडवू शकत नाही तर कोण सोडवणार, असा सवालही उद्या सगळेच पक्ष उपस्थित करणार आहेत. मोदींची केजरीवाल यांच्याशी असलेली दुश्मनी नवी नाही. या सगळ्या राजकीय नाट्याला आणखी एक वळण मिळाले ते आयएएस संघटनेच्या प्रतिक्रियेने. दिल्लीत काम करणाऱ्या आयएएस संघटनेने पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन दिल्ली प्रशासनातले आयएएस अधिकारी संपावर वगैरे गेलेले नसून रोज अधिकाऱ्यांच्या बैठका होतात, कामकाजाची चर्चा होते, सुटीतही अधिकारी काम करतात, असे स्पष्टीकरण दिले.

  आयएएस लॉबीवर केजरीवाल यांच्या सरकारकडून निराधार, द्वेषयुक्त व राजकीय हेतूने आरोप केले जात असून अधिकाऱ्यांवर दबाव व दडपशाही लादली जात आहे, असे या संघटनेचे म्हणणे आहे. या संघटनेला आपली बाजू मांडण्यासाठी इतकी उशिरा का जाग आली, हा प्रश्न आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, आपल्याला मारहाण होईल याच्या भीतीने काही खात्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी बैठकांना उपस्थित राहताना दिसत नाहीत. गेल्या फेब्रुवारी महिन्यात केजरीवाल यांच्या निवासस्थानी दिल्लीच्या मुख्य सचिवांना मारहाण झाल्याचे वृत्त आले होते. त्या घटनेनंतर आयएएस अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांनी मारहाण केल्याप्रकरणी माफी मागावी व भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करावी अशा दोन अटी ठेवल्या आहेत. तर नायब राज्यपालांचे असे म्हणणे आहे की प्रशासनात निर्माण झालेले भीती व अविश्वासाचे वातावरण निवळण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत. हे वातावरण निवळणार कसे हा मुद्दा आहे. कारण केंद्रातले सरकार या विषयात जेवढे जातीने लक्ष घालेल तितका केजरीवाल यांना फायदा आहे.

  कारण हा तिढा सुटला तर त्याचे श्रेय केजरीवाल स्वत:कडे घेणार; पण हा मुद्दा चिघळला तर त्याचे खापर ते केंद्रावरच म्हणजे मोदींवर फोडणार. २०१९च्या लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने बिगर भाजपशासित राज्ये विविध आर्थिक मागण्या पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहेत. या राज्यांनी नीती आयोगाच्या बैठकीत तशा मागण्याही केल्या आहेत. या मागण्या पुऱ्या होत नसतील तर ती रस्त्यावरही उतरण्याच्या तयारीत आहेत. आज केजरीवाल रस्त्यावर उतरले आहेत, उद्या ही मंडळी केंद्राच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरणार आहेत.

Trending