आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क‘र्नाटकी’ बंड बैठका (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात काँग्रेस अाणि जेडीएस अाघाडीचे सरकार सत्तारूढ झाले. मात्र मनाजाेगती खाती न मिळाल्यामुळे १५-२० असंतुष्ट काँग्रेसींनी बंडाचे निशाण हाती घेतले. अाता तर जेडीएसच्या काही मंत्र्यांनीही काँग्रेसचाच राग अाळवण्यास सुरुवात केल्यामुळे कुमारस्वामी सरकारचे अस्तित्व धाेक्यात येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली अाहे. कुमारस्वामींनी कसेबसे खातेवाटप केले अन् अामदारांच्या मनातील संतप्त खदखद उफाळून अाली.

 

असंतुष्टांचे नेते एम.बी.पाटील यांचा उपमुख्यमंत्रिपदावर दावा हाेता, मात्र राहुल गांधी यांनी धुडकावून लावत अन्य इच्छुकांनाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या. इतकेच नव्हे तर कर्नाटक काँग्रेसचे सर्वेसर्वा असणाऱ्या सिद्धरामय्यांनाही लीलया बाजूला केले. अाता कुमारस्वामी थेट राहुल गांधी यांच्या संपर्कात असतात त्यामुळे स्थानिकांना फारसे महत्त्व राहिलेले नाही, ही सलदेखील असंतुष्ट काँग्रेस नेत्यांच्या मनात खदखदत अाहे.

 

त्यामुळे पर्यायाच्या शाेधात असलेल्या १७ हून अधिक असंतुष्टांच्या बंड-बैठका सुरू अाहेत, त्यांनी भाजपशी घराेबा केला तर नवल नसावे. गेली पाच वर्षे सिद्धरामय्यांच्या राजवटीत अडगळीत पडलेल्या डाॅ. जी. परमेश्वर यांना पराभूत करण्यासाठी स्वकीयांनीच कंबर कसली, परंतु त्यांचे नशीब फळफळले तसेच मल्लिकार्जुन खरगे यांनाही झुकते माप मिळाले. परमेश्वर यांनी प्रदेश काँग्रेसवर वर्चस्व मिळवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले ताेच त्यांना शह देण्यासाठी सिद्धरामय्या यांनी बंडाेबांना फूस लावली. काँग्रेसमध्ये बंडाळीचे रान पेटलेले असताना ते बदामीत निवांत कसे राहू शकतात, असा प्रश्न परमेश्वर समर्थकांना पडला अाहे.

 

काँग्रेसच्या ‘भक्कम’ पाठबळावर कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले असले तरी कर्नाटकाच्या राजकीय रंगमंचावरील ‘मानापमान’ नाट्याचे प्रयाेग अाता सुरू झाले अाहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेताच कुमारस्वामींना ५ वर्षांसाठी पाठिंब्याची घाेषणा केल्याने अस्वस्थ परमेश्वर यांनी या मुद्द्यावर अजून निर्णय व्हायचा अाहे, असे सांगत पहिल्या प्रयाेगाची नांदी घातली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-जेडीएस अाघाडी बनली असली तरी त्यातील बिघाडीची पहिली ठिणगी परमेश्वर यांनी टाकली, असे म्हटले तर वावगे ठरू नये. 


मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून काँग्रेस अाणि जेडीएस यांच्यातील नाराजीचे अाव्हान कुमारस्वामी यांच्यासमाेर उभे असताना राहुकाळ अाणि शत्रुसंहार हाेमाचे पुरस्कर्ते देवेगाैडा कुटुंबीय अाणि स्वत:च्या भावाच्या खिशात दाेन खाती टाकणारे कुमारस्वामी यांच्याविराेधात काँग्रेस-जेडीएसच्या नेत्यांनी अाक्रमक पवित्रा घेतला तेव्हा अाठवी पास जी.टी. देवेगाैडा यांना उच्च शिक्षण खाते देऊन तर रेवण्णा यांची एकाच खात्यावर बाेळवण झाली.

 

परंतु, ऊर्जा अाणि सार्वजनिक बांधकाम खात्यावर डाेळा ठेवून बसलेल्या देवेगाैडा यांचा पुरता हिरमोड झाला. परमेश्वर यांना गृह अाणि बंगळुरू विकास खाते दिल्याने साहजिकच काँग्रेसचे मंत्री दुखावले. जेडीएसचे अध्यक्ष एच.डी. देवेगाैडा यांचे नातेवाईक डी.सी.तमन्ना यांना परिवहन, पुत्ताराजू यांना लघुसिंचन खाते मिळाल्याने तेदेखील संतापले अाहेत. वस्तुत: अपेक्षित खाते न मिळाल्यामुळे अागपाखड केली जात असली तरी प्रत्येक खात्यात प्रभावीपणे काम करण्यास पुरेसा वाव असताे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात अाहे, हे तितकेच खरे.

 

अर्थात काही लाेकांना विशिष्ट विभागात काम करायला अावडते, प्रत्येकाची तशी इच्छा असली तरी प्रत्येकाचेच समाधान कसे शक्य अाहे? काही मंत्रालयांची अपेक्षा असते की, उच्चशिक्षित किमान संबंधित खात्याचे सामान्य ज्ञान असणारा तरी मंत्री लाभावा यात काही गैर नाही. मात्र काही निर्णय पक्षांतर्गत घेतले जातात. सुरुवातीला मंत्री हाेण्यासाठी चढाअाेढ, त्यानंतर विशिष्ट विभागासाठी खुर्ची-खेच राजकारण ही अतिशय सामान्य बाब असली तरी बहुमत सिद्ध करणाऱ्या सत्तारूढ अाघाडीचे खातेवाटपाच्या पहिल्या टप्प्यातच दुबळेपण उघड झाले.

 

गेल्या ४२ वर्षांतील राजकीय वस्तुस्थिती लक्षात घेता समाजवादी राजकीय पक्षांवरील लाेकांचा विश्वास एव्हाना उडाला हाेता. मात्र कर्नाटकातील अाघाडीमुळे काहीसे अाशादायक धुमारे फुटत असताना हे सरकार टिकेल का, असा प्रश्न निर्माण झाला अाहे. असंतुष्टांचे समाधान करणे ही भाजपची जबाबदारी ठरते, असा खडा येदियुरप्पांनी टाकलाच अाहे. भाजपच्या प्रलाेभनास कुमारस्वामींचे अामदार का भुलणार नाहीत? एकूणच राजकीय स्थितीचा अदमास घेता देशभर भाजपविराेधी राजकारण करायचे असेल,  त्यासाठी पूरक वातावरण निर्माण करायचे असेल तर हे सरकार टिकवणे काँग्रेसची अपरिहार्यता ठरते. जर हे सरकार पडले तर खरा धक्का काँग्रेसला बसेल. म्हणूनच जेडीएसची नव्हे, तर काँग्रेसचीच विश्वासार्हता पणाला लागली अाहे. कर्नाटकातील बंडाळीचा प्रयाेग काेणाच्या पथ्यावर पडताे तेच पाहावयाचे.

बातम्या आणखी आहेत...