आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांचा चकवा (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोनच दिवसांपूर्वी जी-७ बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चक्रम वागण्याचा अनुभव विकसित व समृद्ध देशांनी घेतला होता. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष मंगळवारी ट्रम्प व उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यातील सिंगापूर येथील बैठकीकडे होते. या दोघांचेही वर्तन चक्रम हुकूमशहासारखे आहे.

 

जेव्हा असे हुकूमशहा शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामधील वाटाघाटी फिस्कटण्याची शक्यता अधिकच असते. हुकूमशहांमध्ये अहंगंड असतो. त्यांना आपल्या प्रतिमेची काळजी असते. उन यांच्यापेक्षा ट्रम्प यांच्या बाबतीत कुणालाच खात्री नव्हती, अगदी व्हाइट हाऊसमधील अमेरिकी प्रशासनालासुद्धा. कारण ट्रम्प केव्हाही, काहीही बोलू शकतात व त्याचे पडसाद कसेही उमटू शकतात हे आजपर्यंत अनेक वेळा घडले आहे. गेल्याच आठवड्यात एक किस्सा घडला. ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये एका पत्रकाराने विचारले की, उ. कोरिया अण्वस्त्रमुक्त मुद्द्यावरून खरोखरीच गंभीर आहे याचा अंदाज तुम्हाला किती वेळात होईल? ट्रम्प यांनी पत्रकाराच्या अशा तिरकस प्रश्नाबद्दल आश्चर्य व्यक्त करत त्याला उत्तर दिले, ‘तुमचा प्रश्न चांगला आहे..मला पहिल्या स्पर्शात (हस्तांदोलन), एका मिनिटात परिस्थितीचा अंदाज येईल.’

 

  मंगळवारी जेव्हा ट्रम्प व किम जोंग उन यांच्यामध्ये पहिले हस्तांदोलन झाले तेव्हा जगातील मीडियाने या हस्तांदोलनाला कॅमेऱ्यात कैद करत ट्रम्प यांच्या चेहऱ्यावरचे सकारात्मक भाव वाचले व सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. अमेरिकेतील सीएनएन, फॉक्स न्यूज या वृत्तवाहिन्या, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्टसारख्या प्रख्यात वर्तमानपत्रांनी या दोघांमधल्या हस्तांदोलनाचे दृश्य ऐतिहासिक असल्याचे म्हटले. बहुतेक राजकीय विश्लेषकांना ट्रम्प यांच्याकडून काही तरी गडबड होईल असे वाटत होते. पण ट्रम्प यांनी आपल्या टीकाकारांना चकवा दिला, तर किम जोंग उन यांनी ‘इतिहासाला मागे ठेवून आम्ही पुढे जात आहोत, जगाला एक नवा बदल पाहायला मिळेल,’ अशी आश्चर्यकारक, पण आधुनिकवादी प्रतिक्रिया दिली. 
उत्तर कोरियाने आपली अण्वस्त्रे नष्ट करावीत, असा अमेरिकेचा दबाव हा कित्येक वर्षे सुरू होता. २००० मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी आपली राजकीय शिष्टाई पणास लावत उ. कोरियाला चर्चेस आणण्याचे प्रयत्न केले होते, पण ते फोल ठरले.

 

त्या काळात अमेरिकेच्या राजकारणात रिपब्लिकन पक्षाचा उ. कोरियाविरोधातला प्रचार अत्यंत टोकाचा होता. या देशावर लष्करी कारवाई करावी, असाही दबाव क्लिंटन यांच्यावर टाकला जात होता. पण क्लिंटन यांनी वाटाघाटीचा मार्ग पत्करला होता. त्यांच्यानंतर सत्तेवर आलेले रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज बुश यांनी सहा देशांच्या मदतीने उ. कोरियाशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू केला असता उ. कोरियाने एक अणुचाचणी घेऊन बुश यांचे प्रयत्न उधळून लावले होते. ओबामा यांच्या काळात अमेरिकेचे परराष्ट्र धोरण हे जगात सहमतीचे, शांतता प्रस्थापित करणारे होते. त्यांनी इराण, क्युबा यांच्याशी जुळवून घेतले. पश्चिम आशियात तालिबान, अल-कायदा या दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले.

 

पण उ. कोरियाला वेसण घालण्याबाबत ते तितकेसे आग्रही नव्हते. ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत दोन्ही देशांमध्ये युद्धखोर भाषा सुरू झाली. एकमेकांकडची अण्वस्त्रे एकमेकांवर डागण्याच्या धमक्या सुरू झाल्या. त्यामुळे परिस्थिती चिघळली होती. पण एकाएकी उ. कोरिया नरम पडू लागला. अमेरिकेने त्यांच्या नरमाईचा फायदा घेत उ. कोरिया त्यांची सर्व अण्वस्त्रे नष्ट करत असेल, शेजारी देश द. कोरिया, जपान यांच्याशी शांतता प्रस्थापित करत असेल तर या देशाशी अमेरिकाच नव्हे, तर संपूर्ण जग सबंध ठेवण्यास तयार होईल, असे स्पष्ट केल्याने वातावरण निवळत गेले. कालच्या बैठकीत उ. कोरियाकडील अण्वस्त्रे किती काळात नष्ट होतील याची कालमर्यादा अजून जाहीर झालेली नाही, पण अमेरिकेच्या देखरेखीखाली कोरिया द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त होईल, या प्रदेशातील युद्धसदृश परिस्थिती कायमची मिटेल, असे अमेरिकेने म्हटले आहे.

 

अमेरिकेने द. कोरियातले आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय द. कोरियासोबतच्या संयुक्त लष्करी कवायतीही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या घटना व्यापाराबाबत अमेरिका ज्या पद्धतीने स्वत:चे संरक्षणवादी धोरण रेटत आहे, त्या पार्श्वभूमीवर निश्चितच सकारात्मक म्हटले गेले पाहिजे. ट्रम्प यांचे अभिनंदनही करायला पाहिजे की त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या पहिल्या दीड वर्षात ६० वर्षे जगापासून हटकून दूर असलेल्या उ. कोरियाला जगाच्या रंगमंचावर आणले. उ. कोरियाची नवी सुरुवात जगाला कसे वळण देते ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

बातम्या आणखी आहेत...