आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेन्शनमागचे छुपे हेतू (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन भाजपशासित राज्यांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्र सरकारने आणीबाणीचा काळ हा दुसरे स्वातंत्र्ययुद्ध ठरवीत आणीबाणीच्या कालखंडात एक महिन्यापेक्षा अधिक तुरुंगवास भोगलेल्यांना दरमहा १० हजार रु., एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना दरमहा ५ हजार रु. पेन्शन जाहीर केली आहे. या निर्णयामुळे आणीबाणीत सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेले अनेक लोकशाहीवादी, समतावादी, समाजवादी, काँग्रेसविरोधक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

 

या मंडळींचा आक्षेप हा आहे की, सरकारच्या विरोधात निर्दशने, आंदोलने करणे हे नागरिकाचे कर्तव्य आहे ते आपण केले असल्याने पेन्शन घेणे गैर आहे. राष्ट्रीय सेवा दलाचे डॉ. सुरेश खैरनार, सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा, सुरेखा दळवी, डॅनिएल मांझगावकर व गायक अमरेंद्र धनेश्वर यांनी तर पेन्शन घेण्यास नकार दिला आहे. या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे. विनय हर्डीकर यांनी अशा पेन्शनच्या मागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे शिवसेनेने आणीबाणीला विरोध केला नव्हता. आता शिवसेना भाजपबरोबर सत्तेत असल्याने त्यांची भूमिका काय आहे याची उत्सुकता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तर त्या वेळचे सरसंघचालक देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा देऊन माफी मागितली होती याची आठवण करून देत, संघ स्वयंसेवकांना या पेन्शनमधून वगळण्यात यावे, अशी सूचना करून सरकारची गोची केली आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’ या अमित शहा-मोदींच्या राजकीय अजेंड्याच्या मुळाशी काँग्रेस पक्षाच्या बदनामीबरोबर देशाच्या राजकीय इतिहासाची स्वत:च्या इच्छेनुसार नव्याने मांडणी करण्याचा उद्योग आहे. आणीबाणीची आठवण हा त्यातील एक धडा आहे.

 

वास्तविक भाजपची पितृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याचा अनुभव नसल्याने आणीबाणीचा काळ रोमँटिक वाटतो. आणीबाणीच्या काळाची चटकदार वर्णने स्वयंसेवक सांगत असतात. आणीबाणीच्या कालखंडाचे विश्लेषण अनेकांनी केले आहे. या कालखंडाला संघ परिवार म्हणतो तसे ‘दुसरे स्वातंत्र्य’ म्हणावे का हा वादग्रस्त प्रश्न आहे. ज्या समाजवाद्यांनी आणीबाणीत जनसंघ व संघाप्रमाणे सक्रिय भूमिका बजावली ते आणीबाणी म्हणजे दुसरा स्वातंत्र्य लढा असे सध्या म्हणत नाहीत. अर्थात त्यामागे राजकीय व वैचारिक कारणे आहेत.


इंदिरा गांधींनी सत्ता टिकवण्यासाठी स्वातंत्र्य नाकारणारी आणीबाणी लादली. जनतेच्या स्वातंत्र्याला नख लावणाऱ्या या निर्णयाला निर्लज्जपणे राज्यघटनेच्या चौकटीतही बसवून घेतले. राज्यकर्त्या म्हणून इंदिराजींमध्ये असामान्य गुण होते पण आणीबाणीमुळे त्या सामान्य सत्तालोभी राजकारणी ठरल्या. इंदिरा गांधी यांनी अचानक आणीबाणी मागे घेण्याची घोषणा केली. त्यामागचे हिशेब वेगळे होते. ते चुकले व काँग्रेसचा मोठा पराभव झाला, मात्र आणीबाणीसारखा मूलभूत स्वातंत्र्याचा गळा घोटणारा निर्णय देशावर लादल्याबद्दल काँग्रेसवर जो रोष निवडणुकीत प्रगट झाला तो जनता पक्षाच्या नालायक कारभारामुळे लवकर मावळला. यामध्ये जनसंघही होता. जनता पक्षाचे सरकार टिकले असते तर काँग्रेसवरील आणीबाणीचा कलंक ठळक राहिला असता.

 

पण तितका शहाणपणा जनता पक्षाच्या नेत्यांकडे नव्हता. यामुळे दोनच वर्षांत इंदिराजी पुन्हा बहुमताने सत्तेवर आल्या. या सत्ताकाळात त्यांची निर्घृण हत्या झाल्याने जनतेच्या स्वातंत्र्याला नाकारण्याचा काँग्रेसवरील ठपका पुसला गेला. पुढील काळात भाजपचा जोर वाढल्याने पूर्वी काँग्रेसच्या विरोधात आणीबाणीत लढा पुकारणारे जनता पक्ष व अन्य दलातील नेते, आणीबाणीच्या काँग्रेसी पापाकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करू लागले. आजही हाच प्रकार होतो. वस्तुत: आणीबाणी लादणे हा अन्य कोणत्याही लोकशाही देशात अक्षम्य अपराध ठरला असता व त्या देशातील काँग्रेससारख्या पक्षाला त्याची जबर किंमत वर्षानुवर्षे मोजावी लागली असती. जनता पक्षाच्या नाकर्तेपणामुळे काँग्रेसने यशस्वीपणे पुसलेला स्वत:वरील कलंक काँग्रेसच्या माथ्यावर पुन्हा ठळक करण्याची धडपड भाजपने चालविली आहे. त्यामागे भाजपचे राजकीय हेतू आहेत.

 

महात्मा गांधींच्या हत्येशी संघाचा संबंध जोडण्याचा जसा प्रयत्न काँग्रेस व मित्रपक्षांकडून वारंवार होतो, त्याच प्रकारे देशावर आणीबाणी लादून काँग्रेसने जनतेचे स्वातंत्र्य हिरावले होते याची आठवण सातत्याने करून देण्याची भाजपची व्यूहनीती आहे. भाजपचे हे राजकीय हेतू लक्षात घेतानाच अन्य पक्ष व गटांचे हेतूही समजून घेतले पाहिजेत. देशासाठी केलेल्या स्वार्थत्यागाची बक्षीसी, भाजपचे राजकीय हेतू ओळखून, कोणी नाकारत असेल तर अशा व्यक्तींच्या राष्ट्रनिष्ठेला सलाम केला पाहिजे. मात्र, अन्य छुपे राजकीय हेतू साधण्यासाठी किंवा वैचारिक विद्वेषापायी कोणी पेन्शन नाकारत असेल तर तेही जनतेने समजून घेतले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...