आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायमंड किंगचा गंडा ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाेटाळा, संशयास्पद व्यवहार हे घटक अार्थिक क्षेत्रात जणू नियमित झाले अाहेत. बँकिंग क्षेत्रही त्याला अपवाद नाही. परंतु १२२ वर्षांची परंपरा असलेल्या व  देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या बँकेतही सरकारी बँकिंग क्षेत्राला हादरवून टाकणारा ‘भूकंप’ हाेईल असे कुणाच्या ध्यानीमनी नसावे. देशभरात १० काेटी खातेदार, ६९४१ शाखा, ९०४ काेटीचा निव्वळ नफा, ५७ हजार ६३० कोटीची बुडीत कर्जे असलेली स्टेट बंॅकेनंतरची सर्वात माेठी बँक असा ‘पीएनबी’चा लाैकिक अाहे. विजय मल्ल्याने ८१५ कोटींचे कर्ज थकवले असतानाही ‘अायजीच्या जिवावर बायजी उदार’ या सर्वज्ञात म्हणीसारखाच प्रकार ‘पीएनबी’मध्ये घडला. या बँकेतील वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांना २०११ पासूनच ‘अर्थ’पूर्ण भ्रष्टाचाराची वाळवी पाेखरत हाेती. त्याकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले; म्हणूनच अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव माेदी ११ हजार ४०० काेटींचा चुना लावून पाेबारा करू शकला. एव्हाना १० कर्मचारी निलंबित झाले तर खडबडून जागे झालेल्या ‘ईडी’ने नीरव माेदीच्या घरासह ९ ठिकाणांवर छापे टाकले, अाता अर्थ मंत्रालयास अहवाल दिला जाईल, सीबीअाय चाैकशी वगैरे साेपस्कार पार पडतील. दरम्यान, हर्षद मेहताच्या अगाेदरपासून सरकारी बँकांना कैक ठकसेन भेटले, २०१५ मध्ये बँक अाॅफ बडाेदात ६ हजार काेटींचा घाेटाळा उघड झाला तरीही धडा घेतला गेला नाही. बँकिंग प्रशासनात सुधारणा अाणण्याच्या, कार्यप्रणाली अधिकाधिक नितळ करण्याच्या दृष्टीने ठाेस पावले पडली नाहीत. घाेटाळेबाजांचे सत्ताधाऱ्यांशी लागेबांधे असतात त्यामुळे प्रत्येक वेळी अडचणीत अाले त्या बँका अाणि गुंतवणूकदारच. ‘पीएनबी’ला गंडवल्याची वार्ता पसरताच शेअर ७.८ टक्क्यांनी गडगडला त्यामुळे गुंतवणूकदारांचे ३ हजार काेटी पाण्यात गेले. यापूर्वीही ‘पीएनबी’तील काही ठरावीक खातेदारांच्या संगनमताने २८० काेटींचा घाेटाळा करण्यात अाला. त्याप्रकरणी नीरव माेदीच्या अाई, भावावर गुन्हा दाखल अाहे. सीबीअायला नाेटीसही पाठवली गेली. उल्लेखनीय म्हणजे डायमंड किंग अशी अाेळख असलेल्या नीरव माेदीचे मुंबई, दिल्लीपासून लंडन, हांॅगकांॅग, न्यूयाॅर्कपर्यंत २५ लक्झरी स्टाेअर्स अाहेत. प्रियांका चाेप्रा, िसद्धार्थ मल्हाेत्रा, केट विन्सलेट, डकाेटा जाॅन्सन हे त्याचे ब्रँड अॅम्बेसेडर अाहेत. १२ हजार काेटींची संपत्ती बाळगणाऱ्या या डायमंड किंगने प्रियांका चाेप्रालादेखील गंडवण्यात कसूर ठेवली नाही.


२०१६ मध्ये अरुण जेटलींसाेबत दावाेसच्या अार्थिक परिषदेस गेलेला नीरव माेदी गेल्या महिन्यातच पंतप्रधान माेदींसाेबत पुन्हा सहभागी झाला. भाजपशी सख्य जाेपासणाऱ्या नीरव माेदीने ‘पीएनबी’ साेबतच अॅक्सिस बँक, अलाहाबाद बँकेलाही तडाखा दिला. एकीकडे सरकारी बँका बुडीत कर्जाच्या समस्येशी झुंजत असताना एका माेठ्या सरकारी बंॅकेतील घाेटाळा बाहेर येणे हे साऱ्या सरकारी बँकांसाठी तसे धक्कादायक अाहे. कारण, डिसेंबर महिन्यावर जरी नजर टाकली तरी या एका महिन्यात सरकारी बँकांची बुडीत कर्जे ३४.५ टक्क्यांनी वाढलेली दिसतात. या पार्श्वभूमीवर सरकारी बँकांना दिल्या जाणाऱ्या पुनर्भांडवलीकरण निधीचा अाढावा घेण्याची गरज निर्माण हाेते. एकीकडे केंद्र सरकार बँकांची अार्थिक विवंचनेतून सुटका करू पाहत असताना दुसऱ्या बाजूला ठेवींवर सामूहिक दराेडा घालण्याचा अशा पद्धतीने प्रयत्न हाेताे, याचाही साकल्याने विचार व्हायला नकाे का? बँकेतील व्यवस्थेनेच सहेतुक मदत केल्यामुळे ‘संशयास्पद व्यवहार’ या गाेंडस नावाखाली नीरव माेदीला ठेवीदारांची गुंतवणूक अाेरबाडणे शक्य झाले. ज्या ‘एलअाेयू’च्या अाधारे २०१० पासून ताे क्रेडिटवर खरेदी करीत हाेता,  ताे ‘एलअाेयू’ काेअर बंॅकिंग साेल्यूशन एेवजी स्विफ्ट टेक्नाॅलाॅजीने देण्यात अाला, जाे फॅक्सप्रमाणे असताे, ताे ‘सीबीएस’शी संलग्न नसताे. खरे तर या ‘एलअाेयू’ची मुदत ९० दिवसांची असते तरीही भारतीय बंॅकांच्या विदेशी शाखा त्याकडे कानाडाेळा करीत राहिल्या. हे सारे ‘पीएनबी’तील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने घडत राहिले असे म्हणायला पुरेसा वाव अाहे. एरव्ही सामान्य खातेदाराला किमान शिल्लक रक्कमेसाठी काेणतीही बँक भंडावून साेडते. मात्र इथे तर एक रूपयाही बँकेत न ठेवता नीरव माेदीला ८ लेटर अाॅफ अंडरटेकिंग जारी केले. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे ‘पीएनबी’ने दिलेले हे ‘एलअाेयू’ बनावट अाहेत. अर्थात याप्रकरणी उपव्यवस्थापक गाेकुळनाथ शेट्टी यांच्यावर कारवाई हाेईल ताे भाग निराळा मात्र बँकिंग क्षेत्रातील व्यवस्थाच जर अशी भ्रष्टाचाराने बरबटलेली असेल तर तात्काळ शुद्धीकरण हाेणे गरजेचे ठरते, अन्यथा खातेदारांचा विश्वास उडाला नाही तरच नवल.

बातम्या आणखी आहेत...