Home | Editorial | Agralekh | divyamarathi article on Bye-Election Results

लाट ओसरली (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Jun 01, 2018, 01:00 AM IST

पोटनिवडणुकीच्या निकालांवरून राजकारणाची पुढली वाटचाल निश्चित करणे अवघड असले तरी पोटनिवडणुका काही दिशा दाखवत असतात आणि शहा

 • divyamarathi article on Bye-Election Results

  पोटनिवडणुकीच्या निकालांवरून राजकारणाची पुढली वाटचाल निश्चित करणे अवघड असले तरी पोटनिवडणुका काही दिशा दाखवत असतात आणि शहाणे राजकीय नेते त्यातून बोध घेत असतात. हा बोध तटस्थतेने घ्यायचा असतो. विजयाच्या धुंदीत वा पराभवानंतर येणाऱ्या नैराश्यातून हा बोध घेतला गेला तर तो चुकीचा ठरू शकतो.

  गुरुवारी लागलेल्या पोटनिवडणुकांतून असा तटस्थ बोध घेतला तर काय दिसते? वर म्हटल्याप्रमाणे या पोटनिवडणुकीतून मोठे आडाखे बांधता येत नसले तरी काही निष्कर्ष निश्चित काढता येतात. त्यातील एक स्पष्ट निष्कर्ष म्हणजे नरेंद्र मोदी यांचा करिष्मा किंवा त्यांच्या नावावर उठणारी लाट आता पूर्णपणे ओसरली आहे. मोदींवर भरवसा ठेवून आता मतदार मतदान करत नाही. मोदी वाजवत असलेला विकासाचा ढोलही मतदारांना आकर्षित करू शकत नाही.

  विकासापेक्षा स्थानिक पातळीवरील जाती-धर्म-पंथ यांच्या अस्मिता जास्त जोरकस ठरत आहे. उत्तर प्रदेशात ही बाब अधिक स्पष्टपणे समोर आली आहे. पोटनिवडणुकांतून दिसलेली दुसरी बाब म्हणजे भाजप मुख्यमंत्र्यांचा प्रभावही कमी होत चालला आहे. योगी आदित्यनाथ यांचा पराभव मोठा आहे. त्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांनी निदान पालघरमध्ये तरी भाजपची लाज राखली. आदित्यनाथ यांचे अपयश बोचरे आहे. मुख्यमंत्र्यांना स्वत:चा मतदारसंघ राखता आला नाही. उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघही निसटला आणि आता पुन्हा सणसणीत पराभव झाला.

  विरोधी पक्ष एकत्र आल्यामुळे पराभव झाला हे विश्लेषण बरोबर असले तरी विरोधी पक्षांच्या एकत्रित ताकदीवर मात करण्याची ताकद अद्याप भाजपमध्ये आलेली नाही हेही स्पष्ट झाले आहे. लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही ठिकाणी आदित्यनाथांचा पराभव झाला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी आदित्यनाथांचे नाव जाहीर झाले तेव्हा तो मोदी यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचे म्हटले गेले होते. पण योगींच्या वर्षभराच्या कारभारावर उत्तर प्रदेशाची जनता खुश नाही. त्यातही गंभीर बाब म्हणजे आदित्यनाथ यांनी हिंदू-मुस्लिम मतदारांमध्ये ध्रुवीकरण केल्याचा आरोप वारंवार होत आहे. हे ध्रुवीकरण फसले.

  मुस्लिम मतदार भाजपपासून पुरते दुरावले. ही मानसिकता पोटनिवडणुकांपुरती मर्यादित राहणार नाही. त्याचा प्रभाव लोकसभा निवडणुकीवरही पडेल. समाजवादी पार्टी व बहुजन समाज पक्ष यांची आघाडी संपूर्ण उत्तर प्रदेशात होऊ शकणार नाही, त्यात अनेक अडथळे येतील व त्याचा फायदा भाजपला होईल, अशी गाजरे खाल्ली जात आहेत. दोन्ही पक्षांचे स्वार्थ लक्षात घेता पक्की आघाडी होणे कठीण आहे हे खरे. पण उत्तर प्रदेशात मुस्लिम मतांचे पूर्ण ध्रुवीकरण झाले तर त्याचा जोरदार फटका भाजपला बसेल. ही परिस्थिती बदलण्याइतका वेळही आता भाजपकडे नाही.

  पालघर निवडणुकीत शिवसेनेचा पराभव हा मुख्यमंत्र्यांच्या स्थानिक रणनीतीचा विजय आहे. शिवसेनेला फार न दुखावता त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सेनेला तिची जागा दाखवून दिली. पराभवानंतर शिवसेनेने निवडणूक आयोगाला लक्ष्य केले व आयुक्तांचीही निवडणूक घ्यावी, अशी हास्यास्पद मागणी केली आहे. फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली तरी उमेदवार आयात करावा लागला. म्हणजे हा विजय निर्भेळ नाही. भंडारा-गोंदियामध्ये तर मुख्यमंत्र्यांचा मोठा पराभव झाला. भाजपच्या बड्या नेत्यांची धडपड तेथे कामी आली नाही.

  शेतकरी भाजपपासून दूर गेले आहेत आणि मोदी-फडणवीस यांच्या घोषणांवर शेेतकरी आता विश्वास ठेवत नाहीत. येथे काँग्रेसने माघार घेऊन राष्ट्रवादीसाठी मतदारसंघ सोडला. उत्तर प्रदेशाप्रमाणेच एकास एक लढत झाली व भाजपचा पराभव झाला. पालघरमध्येही विरोधी पक्षांनी एकच उमेदवार दिला असता तर भाजपचा पराभव निश्चित होता. अर्थात देशातील कित्येक मतदारसंघांत विरोधी मतांची बेरीज ही विजयी उमेदवारापेक्षा जास्त असते. कारण पन्नास टक्क्यांहून अधिक मते घेऊन विजयी होणारे फार कमी उमेदवार असतात. परंतु, पालघरमध्ये उमेदवार आयात करून विजय मिळवावा लागला व गोंदियामध्ये भाजपने आपलाच उमेदवार गमावला व त्याबरोबर जागाही गमावली.

  म्हणजे महाराष्ट्रातही उत्तर प्रदेशापेक्षा फार वेगळे चित्र नाही. २०१४च्या निवडणुकीत अन्य पक्षांकडील बरीच मते मोदींनी भाजपकडे खेचली होती. त्यामुळेच लाट आली होती. मते खेचण्याची ही प्रक्रिया आता थांबलेली आहे. लोक मोदींना कंटाळले, असे इतक्यात म्हणता येत नसले तरी नव्याने भाजपकडे आलेल्या मतदारांमध्ये उदासीनता आहे. गेल्या काही महिन्यांतील निवडणुकांतून हे चित्र दिसते. कर्नाटकमधील निवडणूकही तेच सांगते. आज भाजपने लोकसभेतील दोन व विधानसभेतील एक जागा गमावली. मात्र, अन्य नऊ जागांवर विजय मिळवता आला नाही. बिहार वगळता अन्य ठिकाणी काँग्रेससह प्रत्येक पक्षाने आपली जागा राखली. भाजपला नवे मतदार मिळत नसल्याचे हा निकाल सांगतो.

Trending