Home | Editorial | Agralekh | divyamarathi election on bypoll election

पोटनिवडणुकांचे अन्वयार्थ (अग्रलेख)

दिव्‍य मराठी | Update - Jun 05, 2018, 05:53 AM IST

पश्चिम उत्तर प्रदेशातील कैराना व महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया, पालघर लोकसभा पोटनिवडणुकांमधील भाजपच्या पीछेहाटीबद्दल माध

  • divyamarathi election on bypoll election

    पश्चिम उत्तर प्रदेशातील कैराना व महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया, पालघर लोकसभा पोटनिवडणुकांमधील भाजपच्या पीछेहाटीबद्दल माध्यमात बरीच चर्चा सुरू आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शहा-मोदींच्या भाजपला रोखायचे झाल्यास सर्व विरोधी पक्षांनी आपले मतभेद विसरून एकत्र येणे, भाजपच्या सकल हिंदुत्व राजकारणात फूट पाडायची झाल्यास हिंदू जाती-जमातींना आकर्षित करणारे राजकारण करणे, मोदी सरकारचे अपयश मतदारांपुढे सातत्याने मांडणे, भाजपमधल्या असंतुष्टांना चुचकारणे, त्यांचा मतदार आपल्याकडे खेचून घेणे याची चाचपणी सुरू आहे. त्याचे दृश्य स्वरूप कैरानात व भंडारा-गोंदियामध्ये भाजपच्या विरोधात संयुक्त आघाडी उभी करून त्यांना हरवता येते यात दिसून आले. कर्नाटकात मतदानोत्तर काँग्रेस व जेडीएसने हा प्रयोग केला होता व तेथे भाजपला सत्ता मिळवण्यापासून रोखण्यात आलेे. असे प्रयोग करण्याची संधी विरोधकांना चार लोकसभा पोटनिवडणुका व १० विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये दिसून आली.


    बहुतांश ठिकाणी भाजपची मतांची टक्केवारी घसरली व त्यांना पराभव पत्करावा लागला. विरोधकांनी गव्हर्नन्सचा मुद्दा योग्य रीतीने रेटला. या पोटनिवडणुकांना विरोधी पक्षांनी भाजपपेक्षा अधिक गांभीर्याने घेतले. कारण विरोधकांना या घडीला मतदारांचा कल अाजमावणे गरजेचे होते. त्यांना त्यांच्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवणे गरजेचे वाटले. अनेक वर्षे वैचारिकदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात राजकारण केले असले तरी जेव्हा बडी राजकीय शक्ती उदयास येते आणि तिच्या वादळात छोट्यांची जी धूळधाण होते, ती रोखण्यासाठी सामूहिक शक्ती उभी करणे हा निसर्गनियम असतो याचे भान काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना वेळीच आले. कैराना व भंडारा-गोंदिया, पालघर येथील लोकसभा पोटनिवडणुका अशा वातावरणात लढवण्यात आल्या की देशातील प्रमुख प्रसारमाध्यमांनी मोदींची देशव्यापी लोकप्रियता कायम असून त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार उत्तम कामगिरी करत असल्याचे सर्व्हे प्रसिद्ध केले होते. या सर्व्हेच्या मदतीने मोदी सरकारनेही आपल्या चार वर्षांचा कारभार लोकांपुढे मांडताना ‘साफ नियत, सही विकास’ असे मोठे कॅम्पेन सुरू केले होते. त्या कॅम्पेनला छेद द्यायचा झाल्यास भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या जागा खेचून घेणे, त्यातून मोदी लाट ओसरू लागली आहे हे मतदाराच्या लक्षात आणून देणे, ही विरोधी पक्षांची रणनीती होती. त्यात ते सफल झाले असे म्हणावे लागेल.

    कैरानाची लोकसभा पोटनिवडणूक ही पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दृष्टीने जेवढी महत्त्वाची होती तेवढी ती आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्त्वाची होती. मोदी व योगी या दोघांना उत्तर प्रदेशच्या मतदारांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भरभरून मते दिली होती. त्या वेळी भाजपने आपला पूर्ण प्रचार हिंदू-मुस्लिम धुव्रीकरण व विकासावर केंद्रित केला होता. पण सत्ता मिळाल्यानंतर काही महिन्यांत मुस्लिम-दलित अत्याचाराच्या घटना घडू लागल्या. गोरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातले सामाजिक सौहार्द बिघडू लागले. गोरखपूरमध्ये लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना घडल्या. गुन्हेगारांचे दिवसाढवळ्या एन्काउंटर होऊ लागले. ऊसदराचा प्रश्न गंभीर होऊ लागला. हे सगळे घडत असताना योगी आदित्यनाथ अापल्या कारभाराची तुलना केरळशी करू लागले. त्यांचे पोटनिवडणुकांच्या निमित्ताने देशभर दौरे आखण्यात आले. हिंदूंचा नवा पोस्टरबॉय अशी प्रतिमा त्यांची करण्यात आली. जेव्हा व्यक्तिकेंद्रित राजकारण सुरू होते तेव्हा विरोधकांना एकत्रित येण्याची संधी असते. ही संधी घेत सर्वच जातींची मोट बांधण्याचे काम काँग्रेससह समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय लोकदल अशांनी सुरू केले.


    विकासाचे प्रश्न व योगी आदित्यनाथांचा ढिसाळ कारभार असे समीकरण विरोधकांनी विविध जातींना कवेत घेऊन मांडले व मोदी-योगींना धक्का दिला. मात्र या पोटनिवडणुकांमधून दिसणारे चित्र २०१९ मध्ये कायम दिसावे यासाठी विरोधकांना स्वत:च्या महत्त्वाकांक्षांना मुरड घालणे अत्यावश्यक आहे. बहुतांश विरोधी पक्ष हे काँग्रेसच्या विरोधात व एकमेकांच्याही विरोधात पूर्वी एकत्र आले होते हा इतिहास आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात पालघरमध्ये भाजपने शिवसेनेला चीत केले असले तरी भंडारा-गोंदियामध्ये त्यांना सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन पराभूत केले आहे. कैरानात भाजपला असंतुष्टांचे आव्हान नव्हते, पण भंडारा-गोंदियात भाजपमधून बाहेर पडलेले नाना पटोले यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस-आरपीआय (गवई गट), पीआरपी अशी मोट बांधली. खुद्द पटोले यांची राजकीय ताकद भाजपला जोखता आली नाही. या जिल्ह्यात पटोले यांच्यामुळे भाजपच्या ताब्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आल्या होत्या हेही भाजप विसरला. त्यामुळे पटोलेंनी भाजपच्या चिरफळ्या सहज उडवल्या. भाजपमध्ये असे अनेक असंतुष्ट व मातब्बर नेते आहेत, जे मोदी लाट नव्हे तर स्वबळावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपला सर्व विरोधक व असंतुष्ट नेते यांचे तगडे आव्हान पेलावे लागणार आहे.

Trending