आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: अस्मितादर्शक पद्मश्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हताश आणि उदास झालेल्या आंबेडकरी चळवळीला खऱ्या अर्थाने कोणी प्रेरणा दिली असेल तर ती आंबेडकरी किंवा दलित साहित्याने. १९७० च्या दशकात उदयाला आलेल्या आणि अडीच वर्षांतच अस्तंगत झालेल्या दलित पँथरची प्रेरणा आणि उगम तर निश्चितच त्या काळातल्या दलित आणि आंबेडकरी साहित्यातून झाला होता. त्यानंतरही हा प्रेरणास्रोत अनेक वर्षे तसाच होता. चळवळीची प्रेरणा झालेल्या या दलित आंबेडकरी साहित्याला आणि पर्यायाने साहित्यिकांना प्रेरणा देण्याचे त्या काळात औरंगाबादच्या प्रा. डाॅ. गंगाधर पानतावणे यांनी केले. त्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या ‘अस्मितादर्श’ या साहित्यिक नियतकालिकाला यंदा २०१८ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच वेळी त्यांना मानाचा नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ जाहीर झाला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही मराठवाड्यासाठी अस्मितादर्शक पद्मश्री आहे. 


मूळचे नागपूरचे असलेले डाॅ. गंगाधर पानतावणे हे लघुकथा, कविता आणि समीक्षा लिहिणारे लेखक. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांचा हा लेखनप्रवास सुरू झाला होता. डाॅ‌. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली आणि त्यांच्याबरोबर हजारो दलितांनी धर्मांतर केले. त्या काळातही पानतावणे नागपूरलाच होते. त्या घटनेने त्यांना मोठी प्रेरणा दिली. पुढे बाबासाहेबांनीच सुरू केलेल्या औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १५ वर्षे तिथे सेवा दिल्यानंतर ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रुजू झाले. २० वर्षे त्यांनी तिथे अध्यापनाचे काम केले.  डाॅ. पानतावणे हे या विद्यापीठाच्या मराठी विभागाचे दुसरे विभागप्रमुख आहेत. डाॅ. यु. म. पठाण यांनाही याआधीच पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले आहे.  


डाॅ. पानतावणे हे खुल्या विचारांचे स्वागत करणारे आहेत. त्यामुळेच ‘अस्मितादर्श’ हे नियतकालिक केवळ दलितांनी लिहिलेले लेख आणि कवितांसाठीच आहे असे त्यांनी कधी म्हटले नाही. दलितेतरांनाही विचारांच्या पातळीवर त्यांनी आपल्या नियतकालिकात स्थान देऊन त्याची व्याप्ती वाढवली आहे. आंबेडकरी विचार केवळ आंबेडकरवाद्यांमध्येच राहून चालणार नाहीत, तर त्यांचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे या विचारांचे ते आहेत. त्यामुळेच ते समरसता साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरही गेले. तिथे जाऊन आपण आंबेडकरांचेच विचार सांगितले. त्यामुळे चांगलेच काम केले असे त्यांचे त्यावरचे म्हणणे होते. त्यानंतर त्यांना पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचाही मान मिळाला.  


अस्मितादर्श नियतकालिकाच्या माध्यमातून डाॅ. पानतावणे यांनी शेकडो लेखक घडवले आहेत. अस्मितादर्शमध्ये लेख किंवा कविता आली तर त्या लेखकाला लेखक, कवी म्हणून मान्यता मिळावी अशी स्थिती काही वर्षांतच या नियतकालिकाने निर्माण केली. पुढे त्यांनी अस्मितादर्श साहित्य संमेलनेही सुरू केली. अन्य राज्यांतही ही साहित्य संमेलने आयोजित होत असतात. त्यातून दलित साहित्याविषयी ग्रामीण आणि नवलेखकांना आणि वाचकांनाही जागरूकता येते, अशी त्यामागची भूमिका आहे. ती बहुतांशी साध्य होत आली आहे. यानिमित्ताने डाॅ. पानतावणे यांचे चाहते देशभर तर तयार झाले आहेतच, पण विदेशातही दलित आणि आंबेडकरी साहित्यासाठीचा एनसायक्लाेपीडिया म्हणून त्यांना ओळखणारे आणि त्यांचे मार्गदर्शन घेणारे असंख्य अभ्यासक आहेत. एका विदेशी लेखिकेने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेले पुस्तक तर डाॅ. पानतावणे यांना अर्पण केले आहे. दलित आणि अल्पसंख्याकांच्या साहित्यावर बोलण्यासाठी त्यांना अमेरिकेत बोलावण्यात आले होते. त्यानिमित्ताने त्यांनी न्यूयाॅर्कसह अनेक शहरांमध्ये असलेल्या विद्यापीठांमध्ये जाऊन भारतीय दलित साहित्याविषयी जगभरातील विद्यार्थ्यांना आणि विद्वानांना अवगत केले होते. त्यानंतर थायलंडमध्येही त्यांनी अशाच अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली आहेत.  


िकमान २७ पुस्तकांचे लेखन आणि संपादक केलेले डाॅ. पानतावणे असंख्य पीएचडीधारकांचेही मार्गदर्शक आहेत. त्यांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तर घरात शिरताच जागा दिसेल तिथे ठेवलेली पुरस्कारांची स्मृतिचिन्हे लक्ष वेधून घेतात. दलित साहित्य अकादमीपासून तर आचार्य अत्रे, राजर्षी शाहू, पद्मश्री दया पवार यांच्या नावाचे असलेले आणि इतरही सन्मानाचे असंख्य पुरस्कार त्यात िमळाले आहेत. घरातील वरच्या मजल्यावर असलेला हाॅल म्हणजे त्यांचे प्रचंड मोठे ग्रंथालय आहे.  वयाची ८० वर्षे पूर्ण केली तरी आजही त्यांचे वाचन आणि लेखन अखंडपणे सुरू असते. नुकताच त्यांना घरातच अपघात झाला. त्यामुळे ते रुग्णालयात आहेत. पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो चाहते करीत आहेत.  

 

- दीपक पटवे, निवासी संपादक, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...