आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: मुलींची आगेकूच जोशात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुप्रतीक्षित असणारा इयत्ता बारावीचा निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. हा निकाल दरवर्षी जाहीर होत असला तरी प्रत्येक वर्षी निकालाचे वेगळेपण दर्शवणारी आकडेवारी समोर येते, हा अनुभव आहे. यंदा अशाच काही वैशिष्ट्यपूर्ण आकडेवारीचे दर्शन या निकालाच्या निमित्ताने घडले आहे. ‘आकडे बोलतात’ हे केवळ एखादे शीर्षक नसून, वस्तुस्थितीचा तो आरसा असल्याचे यंदाचा निकालात स्पष्ट दिसते आहे.

 

यंदा बारावीची परीक्षा राज्यभरातील एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी दिली. त्यामध्ये मुलांची संख्या सात लाख ८३ हजार ८९६ इतकी होती, तर मुलींची संख्या सहा लाख ३३ हजार ९०  इतकी होती. उत्तीर्णतेचे प्रमाण पाहिल्यास तब्बल ९२.३६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. हेच प्रमाण मुलांमध्ये ८५.२३ टक्के आहे. गेल्या आठ – दहा वर्षांत मंद गतीने का होईना, पण परीक्षेला बसणाऱ्या आणि उत्तीर्ण होणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ होत आहे, हे स्वागतार्ह चित्र आहे. दुसरी आकडेवारी गमतीदार आहे.

 

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये सर्वाधिक निकालाची टक्केवारी कोकणात आहे (९४.८५), मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण  मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कोकणात सर्वांत कमी म्हणजे ५७ आहे. दुसऱ्या बाजूला १०० टक्के निकाल असणाऱ्या शाळांची संख्या कोकणात ५५ आहे. राज्यभराचा विचार केल्यास, शंभर टक्के निकालाच्या एकूण १३५६ शाळा आहेत. सर्वाधिक १०० टक्के निकालाच्या शाळा पुणे विभागात (३०८) आहेत. अर्थात कोकण विभाग अन्य विभागीय मंडळांच्या तुलनेत नवीन आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.

 

शंभर टक्के निकालाच्या शाळांची संख्या शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांपेक्षा खूपच कमी आहे, हेही खरे आहे. निकालाच्या सांख्यिकीय तथ्यांकडे लक्ष दिल्यास अजून एक गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे विज्ञान शाखतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची जास्त आकडेवारी. यंदा ९५.८५  टक्के विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखा निवडली आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य (८९.५०), व्होकेशनल (८२.१८) आणि कला (७८.९३) अशी घसरण आहे.

 

यातही व्यावसायिक अभ्यासक्रमांचा निकालही गेल्या वर्षीच्या तुलनेत (८६.२७) यंदा सुमारे सव्वाचार टक्क्यांनी खाली आला आहे (८२.१८). अजूनही पारंपरिक वैद्यकीय, अभियांत्रिकीचा प्रभाव कायम असल्याचे ही आकडेवारी सांगते. खेळाडू विद्यार्थ्यांना २० गुणांचा फायदा झालेला आहे, याचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांपैकी अंतर्गत मूल्यमापनाचे गुण खिरापतीसारखे वाटले जातात, कनिष्ठ महाविद्यालये आपला निकाल चांगला लागावा, यासाठी विद्यार्थ्यांना भरपूर गुण अंतर्गत मूल्यमापनाच्या वेळी देतात, असे बोलले जाते कारण प्रॅक्टिकल परीक्षा कनिष्ठ महाविद्यालयांच्या अखत्यारीत होतात. कदाचित त्याचेही प्रतिबिंब विज्ञान शाखेकडील वाढता कल दर्शवत असावे.

 

बहुसंख्य विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेसाठीची तयारी करणे सोपे जावे म्हणून राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात, परीक्षा पद्धतीत व स्वरूपात बदल केले जातील, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २०१६ मध्ये बारावीच्या निकालानंतर केली होती. त्यावर अद्याप तरी कोणतेही कृतिशील पाऊल उचलले गेले नाही. मंडळ पूर्वीप्रमाणेच परीक्षा पद्धती अवलंबत आहे. परीक्षांचे स्वरूप आणि काठिण्य पातळीवर अनेकदा चर्चा होत असते.

 

विशेषत: सीबीएसईच्या धर्तीवर बदल करावेत, अशी मागणी होती, पण यंदाच्या परीक्षेत आणि निकालात त्याचे कोणतेही प्रतिबिंब पडलेले नाही. शिवाय अशा स्वरूपाचे बदल एकदम बारावीमध्ये करण्यापेक्षा ते दहावीपासून केले जावेत, असाही मतप्रवाह आहे. मंडळाच्या निकालाने गेल्या सहा ते आठ वर्षांत मुलींचे शिक्षण घेण्याचे, बारावीपर्यंतचे शिक्षणातील सातत्य, यशस्वी होणाऱ्यांची संख्या, वाढती टक्केवारी.. ही सुचिन्हे दाखवून दिली आहेत. 

 

२००५ पूर्वीच्या निकालात मुलींचे परीक्षेला प्रविष्ट होण्याचे प्रमाणही कमी होते. आता त्यात सकारात्मक बदल घडत आहेत. शिवाय ग्रामीण भागातील मुलींचे लहान वयात लग्न करून देण्याचे प्रमाणही तेव्हा अधिक होते. शिक्षणाचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचत असल्याचे हे चिन्ह मर्यादित अर्थाने तरी नक्की म्हणता येईल. संधी मिळाली तर मुली आपल्या पंखात बळ भरून उंच झेप घेऊ शकतात, याचे हे निदर्शक वाटते. हे प्रमाण, ही टक्केवारी अशीच वाढती राहावी, सावित्रीच्या लेकी आपल्या बुद्धिमत्तेच्या तेजाने अशाच उत्तरोत्तर तळपत राहाव्यात, या शुभेच्छा....

 

 

जयश्री बोकील

बातम्या आणखी आहेत...