आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुखवटा संघाचा आणि मुखर्जींचाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अटलबिहारी वाजपेयी यांनी जे केलं, तेवढंही प्रणवकुमार मुखर्जी यांना जमलं नाही. वाजपेयी संघाचे कट्टर स्वयंसेवक. तरीही मोदी यांच्यासारख्या संघाच्या दुसऱ्या कट्टर स्वयंसेवकानं गुजरातेत २००२ च्या फेब्रुवारी—मार्चमध्ये जो मुस्लिमांचा नरसंहार घडवून आणला, त्या वेळी गुजरातच्या या मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभं राहून वाजपेयी यांनी त्यांना ‘राजधर्म पाळा’ असा जाहीर सल्ला दिला. ती एक प्रकारची कानउघाडणीच होती.

 

मोदी यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावायला हवा, असं वाजपेयी यांचं मत होतं. गुजरातेतील नरसंहारानंतर भाजपच्या कार्यकारिणीची गोव्यात बैठक होणार होती. त्यात हा निर्णय घ्यायला हवा, असा वाजपेयी यांचा आग्रह होता. पण असा निर्णय घेण्याच्या विरोधात अडवाणी होते. यासंबंधी गोव्याला जाताना विमानात कशी चर्चा झाली, याचा तपशील जसवंत सिंह यांनी आपल्या आठवणींच्या पुस्तकात सविस्तर दिला आहे. तेव्हा वाजपेयी हे ‘मुखवटा’ होते, तर अडवाणी हा संघाचा खरा चेहरा होता.  

 

...आणि संघाचा खरा चेहरा हा मुस्लिम द्वेषाचाच आहे.   
विशेष म्हणजे याच गोव्यात २०१३ मध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत २०१४ ची लोकसभा निवडणूक मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय घेऊ नये, असा अडवाणी यांचा आग्रह होता.  पण संघाला मोदी हा चेहरा हवा होता आणि मोदींच्या कट्टर चेहऱ्यावर ‘विकासाचा मुखवटा’ चढवण्याची रणनीती पक्की झाली होती. ही रणनीती कशी आखली गेली आणि ती अमलात कशी आणली गेली, त्याची साद्यंत कहाणी मोदी सरकारला चार वर्षे पुरी झाल्याच्या निमित्तानं ‘न्यूज एक्स’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत सुब्रमण्यम स्वामी यांनी अलीकडेच सांगितली होती. गुप्तहेर खातं, ‘रॉ’, सैन्य दले व पोलिस दल यांच्यातील निवृत्त अधिकारी, माजी सनदी अधिकारी, व्यापार—उद्योगातील काही मंडळी, इतर विषयांतील काही तज्ज्ञ इत्यादींचा एक गट स्थापन करण्यात आला होता आणि त्याच्यावर ‘काँग्रेसचा कसा पराभव करायचा, मोदी यांना कसं निवडून आणायचं’, याची सविस्तर रणनीती आखण्याची जबाबदारी कशी सोपवण्यात आली होती याचा सविस्तर तपशील स्वामी यांनी या चर्चेच्या ओघात सांगितला होता. अशा परिस्थितीत एकेकाळी वाजपेयी यांच्या ‘मुखवट्या’मागचा अडवाणी यांचा जो कट्टर चेहरा संघाला हवा होता, त्याची गरज बदलत्या  काळाच्या ओघात संघाला वाटेनाशी झाली होती. त्यामुळे मोदी यांच्या कट्टर चेहऱ्यावर ‘विकासाचा मुखवटा’ चढवला गेला. त्या वेळी ‘मोदी यांना विरोध करण्यावरून’ दिल्लीतील अडवाणी यांच्या घरासमोर निदर्शनेही घडवून आणण्यात आली. अर्थात संघाच्या रणनीतीला असलेला हा खास ‘मोदी टच’ होता.    

 

आता तेच अडवाणी म्हणत आहेत की, ‘मुखर्जी यांचं संघाच्या अभ्यासवर्गात भाषण होणं, त्यांनी संघाच्या मुख्यालयाला भेट देणं, ही आपल्या इतिहासातील उल्लेखनीय घटना आहे.’ येथे अडवाणी यांना ‘आपला इतिहास’ म्हणजे ‘संघाचा इतिहास’ नव्हे, तर ‘भारताचा इतिहास’ अभिप्रेत आहे. संघानं कितीही अडगळीत फेकलं तरी अडवाणी हे कट्टर स्वयंसेवक आहेत, हे विसरताच कामा नये. त्यामुळे एकेकाळी संघानं त्यांना ‘लोहपुरुष’ बनवलं आणि गरज सरल्यावर त्यांना ‘पुराणपुरुषा’चा दर्जा दिला. ‘एकदा स्वयंसेवक तो कायमचा स्वयंसेवक’ हे संघाचं बलस्थान आहे. त्यामुळे अडवाणी वा मुरली मनोहर जोशी काही तरी बंड करतील, विरोधाचा पवित्रा घेतील, ही अनेकांची अपेक्षाच अवास्तव होती. यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांनी मोदींच्या विरोधात पवित्रा घेतला, त्याचं कारण ते भाजपत होते, संघात नव्हते. संघानं बाजूला केल्यानं कितीही हतबलता आली तरी काहीही करता येत नाही, हे वाजपेयी यांनीच ‘जाएं तो जाएं कहाँ’ असं एका मुलाखतीत सांगून टाकलं होतं.   

 

संघाची बदलती रणनीती कशी असते आणि त्यात व्यक्तीला किती व कसे गौण स्थान असते, महत्त्व असते, ते याची कल्पना या घटनांवरून येऊ शकते.    
भारतात ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन करणं, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उद्दिष्ट आहे. त्यापासून संघ कधीही ढळलेला नाही. चारित्र्य, नैतिकता, संस्कृती इत्यादी गोष्टी संघ बोलत असला तरी आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी रणनीती आखताना व त्याबरहुकूम वागताना अनैतिकता, अप्रामाणिकपणा, संधिसाधूपणा इत्यादीचं संघाला कधीच वावडं नसतं. सरसंघचालक देवरस आणीबाणीच्या काळात तुरुंगात असतानाही इंदिरा गांधी यांची स्तुती करणारी पत्रं त्यांना लिहीत होते आणि गांधी खुनानंतर बंदी घालण्यात आल्यावर संघानं सरदार पटेल यांच्याशी केलेला पत्रव्यवहारही हेच दर्शवतो. अंतिम उद्दिष्ट ‘हिंदू राष्ट्र’ हे आहे, त्यामुळे त्या दिशेनं वाटचाल करताना तत्त्वाला मुरड घालणं, अनैतिक वागणं, अप्रामाणिकपणा करणं हा संघाच्या दृष्टीनं डावपेचांचा भाग आहे.   
या देशात ‘हिंदू राष्ट्र’ केवळ राजकीय सत्ता स्वबळावर हाती घेतल्यासच निर्माण करता येऊ शकते, याबद्दलही संघात पूर्णत: स्पष्टता आहे. आज ‘विकास’ हा मुद्दा महत्त्वाचा बनवण्यात आला आहे. त्या त्या वेळच्या जनभावना लक्षात घेऊन संघ सोईस्करपणे पवित्रे घेत आला आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रकारची प्रतीकंही संघ सोईस्करपणे आपलीशी करून घेत असतो. गांधी हे त्याचं उत्तम उदाहरण. आंबेडकर हे दुसरं. जेथे विरोधकांना आपलंसं करून घेता येत नाही, तेथे संघ त्यांचा काटा काढतो.    

 

मुखर्जी यांचं भाषण व त्यांची संघ मुख्यालयाला भेट हे ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन करण्याच्या रणनीतीचाच एक भाग होता. मोदींना चढवण्यात आलेला ‘विकासा’चा मुखवटा आता विरविरीत झाला आहे. त्यातून मतांची बेगमी करता येणं कठीण दिसत आहे. विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या प्रक्रियेमुळे विद्वेषाचं विष पेरूनही निर्णायक विजय पदरात पडेल, याची संघाला खात्री वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे ‘या देशातील मुख्य प्रवाहाचंच आम्हाला पाठबळ आहे’ हे दाखवण्याचा संघाचा प्रयत्न आहे.  

 

...आणि प्रणवकुमार मुखर्जी यांचं भाषण व भेट हा संघाच्या या नव्या रणनीतीचा भाग असू शकतो.   
‘असू शकतो’, असं म्हणायचं कारण ही रणनीती अजून पूर्णत: उलगडत गेलेली नाही.  मोदी यांना बहुमत न मिळाल्यास मुखर्जी यांचा ‘मुखवटा’ वापरून मित्रपक्ष मिळवण्याचा प्रयत्न करण्याची ही रणनीती आहे काय? सध्या केवळ अंदाजच बांधला जाऊ शकतो.    
मात्र संघस्थानावर जाऊन घटनात्मक राष्ट्रवादाचं मुखर्जी  यांनी विवेचन केलं, ते एक प्रकारे संघाला आरसा दाखवत होते. हे विश्लेषण म्हणजे संघाचं स्वरूप, त्याची रणनीती इत्यादीबद्दलच्या अगाध अज्ञानाचं प्रदर्शनच आहे. संघाला राज्यघटनाच मान्य नाही. संघाला येथील लोकशाहीही मान्य नाही. मुखर्जी ज्या वैविध्याचा उच्चार करत होते, ती संकल्पनाच संघाला मान्य नाही. गोळवलकर गुरुजी यांनी तसं लिहूनच ठेवलं आहे आणि मुखर्जी यांनी ज्यांना ‘भारतमातेचे महान सुपुत्र’ म्हटलं, त्या हेडगेवारांनाही असं वैविध्य मान्य नव्हतंच. इतकंच काय, सरसंघचालक भागवत यांनी आपल्या भाषणात ‘वैविध्या’चा उल्लेख कटाक्षानं टाळला. त्याऐवजी भागवतांनी ‘विभिन्नता’ असा शब्दप्रयोग केला आणि ही ‘विभिन्नता’ दूर करण्याचं उत्तरदायित्व हिंदू समाजाचं आहे, असंही प्रतिपादन त्यांनी केलं.   
अशा परिस्थितीत मुखर्जी यांनी वैविध्याचा उच्चार केला तरी संघस्थानावर जमलेले स्वयंसेवक सरसंघचालक मांडत असलेली ‘विभिन्नते’ची भूमिकाच मानणार हे उघड होते.    म्हणूनच मुखर्जी यांचं भाषण म्हणजे ‘गाढवासमोर वाचली गीता’, असाच प्रकार होता. त्यामुळे ‘नेहरूवादाचे निष्ठावान पाईक’ हा मुखर्जी यांचा मुखवटा टरटरा फाडला गेला, हेच काय ते या घटनेचं एकमेव फलित.

 

prakaaaa@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...