आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्वेषाचं विष पसरवण्यात मोदी यशस्वी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी किती चांगली होती, याचे गोडवे भाजप गात आहे आणि ही कामगिरी किती वाईट होती, याचा लेखाजेखा काँग्रेस व इतर विरोधक मांडत आहेत.
मात्र, यापलीकडे जाऊन जरा बारकाईनं बघितल्यास काय आढळतं?
...तर जनमानसात खोलवर पसरलेलं विद्वेषाचं विष. ‘ते’   देशाचे शत्रू आहेत, ‘त्यांची कड’ घेणारे हे ‘देशद्रोही’ आहेत, हा समज समाजमनात पद्धतशीरपणे रुजवला गेला आहे. ‘हिंदू’ असण्याचा दुराभिमान-सार्थ अभिमान नव्हे-बाळगण्यात गैर काहीच नाही, किंबहुना तसा तो बाळगायलाच पाहिजे, असं समाजमनावर ठसवलं जात आहे. हा देश ‘हिंदूं’चा आहे आणि इतरांना येथे राहायचं असल्यास ते हिंदूंच्या मर्जीवरच राहावं लागेल, हे विविध प्रकारे दाखवून दिलं जात आहे, सुचवलं जात आहे. मग ते इतिहासावरून हेतुत: निर्माण करण्यात आलेले वादविवाद असू देत किवा सांस्कृतिक मुद्द्यावरून उभं करण्यात आलेलं वादंग असू दे. या अशा वादविवाद वा वादंगात आपल्या विरोधात उभे राहणारे सारे जण ‘हिंदुहित’ विरोधी आहे, म्हणजेच ते ‘देशभक्त’ नाहीत व कदाचित ‘देशद्रोही’ही असू शकतात, असंही सुचवलं जात आलं आहे. गोवंश हत्या बंदीच्या मुद्द्यावरून प्रथम मुस्लिमांना लक्ष्य केलं जाऊ लागलं. मग दलितांकडे मोर्चा वळवण्यात आला. माणसं मारली गेली. अगदी ठेचून मारली गेली. सरकारी यंत्रणेनं तपासाचे, न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडले. ‘आमचा याच्याशी काही संबंध नाही, हे काही अतिरेकी गटांचं काम आहे, त्यामागे सरकारला बदनाम करण्याचा उद्देश आहे’, असं मोदी सरकार व भाजप म्हणत राहिले आहेत. पण हल्ले थांबलेले नाहीत.

 

...आणि हा विद्वेष रुजवण्याकरिता पद्धतशीरपणे समाजमाध्यमांचा व प्रसारमाध्यमांचाही वापर केला जात आला आहे. किंबहुना देशाच्या विविध भागांत व परदेशांतही गट स्थापन करण्यात आले आहेत आणि ते ‘फेसबुक’, ‘ट्विटर’ इत्यादी समाजमाध्यमांतून ‘हिंदुत्वा’च्या विचारसरणीला विरोध करणाऱ्यांना लक्ष्य बनवत असतात. त्यांना धमक्या देतात. त्याच्या जिवाला धोका आहे, याची सतत जाणीव करून देत राहतात. अशा ‘विरोधकां’बद्दल खोट्या बातम्या (फेक न्यूज) ठरवून पसरवल्या जातात आणि त्या आधारे त्यांची बदनामी करण्याची मोहीमच हाती घेतली जाते. त्यात श्लील-अश्लील याची सीमारेषा सहज पुसून टाकली जाते.  
अलीकडेच राणा अयुब व रवीश कुमार या दोन प्रख्यात पत्रकारांबाबत हा प्रकार घडला. ‘फोटोशॉप’ ही संगणक प्रणाली वापरून राणा अयुब यांची ‘अश्लील’ छायाचित्रं बनवून समाजमाध्यमांवर टाकण्याइतपत आली. त्यांना सतत मोबाइलवर फोन केले जात राहिले. त्या एकदा विमानतळावर विमानात प्रवेश करण्याच्या रांगेत उभ्या असताना, त्यांच्या पुढे असलेल्या मध्यमवयीन माणसानं मागे वळून बघितलं. राणा अयुब दिसताच तो त्यांच्या अंगावर ओरडला की, ‘तुम्ही देशद्रोही आहात, तुमची जागा पाकिस्तानातच आहे.’

 

अशा प्रकारचा, पण वेगळ्या तऱ्हेचा अनुभव रवीश कुमार यांना आला. त्यांच्या मोबाइल फोनवर ‘व्हिडिओ क्लिप’ पाठवण्यात आली आणि त्यात उघडपणे बजरंग दलाचा एका कार्यकर्त्यानं त्यांना धमकी दिली की, ‘तुम्ही सनातन धर्माच्या विरोधात बोलत आहात, याद राखा, तुम्हाला मारून टाकू, पाकिस्तानपर्यंत नेऊन तुमचा बळी घेऊ; कारण तुमची जागा तेथेच आहे.’ ‘इसिस’ जसा पत्रकारांचा शिरच्छेद करत असे, तशी तुमची गत करू, असा दुसरा एक व्हिडिओही रवीश कुमार यांना पाठवण्यात आला आहे. रवीश कुमार यांना धमकी देणाऱ्यांपैकी एक तरुण तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा जवान राहिला होता. हे जे ‘पाकिस्तान’चं भूत  समाजमनात भिनवलं गेलं आहे, त्याला पूर्णत: मोदी व शहा जबाबदार आहेत. बिहार निवडणुकीच्या दरम्यान ‘आमचे विरोधक जिंकले, तर पाकमध्ये फटाके वाजतील,’ असं अमित शहा यांनी जाहीर सभेत म्हटलं होतं. गुजरातच्या निवडणुकीत मोदी यांनी माजी उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांच्यावर ‘पाकिस्तानशी हातमिळवणी’ केल्याचा ठपका ठेवला होता. कर्नाटकाच्या निवडणुकीत टिपू सुलतानचा मुद्दा अमित शहा यांनी उठवला, तर मोदी यांनी माजी लष्करप्रमुख करिअप्पा व थिमय्या या कर्नाटकी अधिकाऱ्यांवर पंडित नेहरूंनी कसा अन्याय केला, काश्मीर प्रश्नावर कारवाई करण्यापासून त्यांना कसं रोखलं, याची खोटीच कहाणी ऐकवली. त्याच वेळी कर्नाटकापासून दूरवर असलेल्या उत्तर प्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापीठातील जीना यांच्या तैलचित्रावरून वादंग हेतुत: उभं करण्यात आलं. वस्तुत: हे तैलचित्र १९३८ मध्ये लावण्यात आलं होतं. ते काढून टाकावं, अशी मागणी भाजपच्या स्थानिक खासदारांनी केली. सांगावयाचा मुद्दा इतकाच की, हे ‘पाकिस्तान प्रकरण’ हा समाजमनात विद्वेषाचं विष पसरवण्याच्या रणनीतीचाच एक भाग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेल्या ‘हिंदुत्वा’चा पायाच ज्यांची ‘पुण्यभू’ भारताबाहेर आहे, त्यांच्या द्वेषावर आधारलेला आहे. हे जे ‘इतर’ आहेत, त्यांना ‘शत्रू’ ठरवणं व बहुसंख्य हिंदूंच्या अधिपत्याखाली ‘ते’ राहावयास ‘तयार’ असतील, तरच त्यांना ‘अभय‘ देणं, हा या ‘हिंदुत्वा’चा गाभा आहे. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांनी तर देशाचे खरे ‘शत्रू’ हे मुस्लिम, ख्रिश्चन व कम्युनिस्ट आहेत, असं लिहूनच ठेवलं आहे. सावरकर व संघ यांच्यात मतभेदाचा मुद्दा होता, तो फक्त रणनीतीबाबतचाच. राजकीय सत्ता मिळवण्याला सावरकरांची प्राथमिकता होती, तर समाजात रुजत व पसरत जात अखेर राजकीय सत्तेपर्यंत पोहोचायचं, अशी संघाची रणनीती होती.  

 

सावरकरांनी हिंदू महासभा हा पक्ष काढला. पण तो प्रयोग फसला आणि हा पक्ष फक्त नावापुरताच उरला. आज संघाच्या हातात सत्ता आली आहे. मात्र, संघाच्या सर्व वैचारिक मांडणीचा पाया हा सावरकरांचं ‘हिंदुत्व’हाच आहे आणि या ‘हिंदुत्वा’ची कट्टर अभिव्यक्ती मोदी यांच्या रूपानं आपल्याला गेली चार वर्षे बघायला मिळत आहे. त्या अर्थानं मोदी हे सावरकरी मुशीतील संघाचे पंतप्रधान आहेत. या काळात भाजपानं एकही मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही. या ‘हिंदुत्वा’च्या विचाराला ‘विकासा’चा मुखवटा चढवून मोदी यांनी भाजपाला २८२ जागा मिळवून दिल्या. पण ही ‘मोदी लाट’ आता ओसरली आहे. गुजरातेत त्यांचं पहिल्यांदा प्रत्यंतर आलं. भाजपचा ‘दारुण विजय’ झाला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात  केवळ विद्वेषाचं विष पसरवून भाजप ९९ जागांपर्यंत पोहोचला आणि त्यानं पराभव टाळला. हेच कर्नाटकात झालं. काँग्रेसचा निर्विवाद पराभव झाला, हे तर खरंच. पण भाजपचा निर्विवाद विजय झाला नाही. ज्या १०४ जागा मिळाल्या, त्या शेवटच्या टप्प्यात मोदी यांनी झंझावाती प्रचार करून वातावरण विद्वेषानं भारून टाकल्यानंच.  

 

...आणि येथेच नेमका समाजमनात विद्वेषाचं विष भिनवण्यात गेल्या चार वर्षांत मोदी व संघाला जे यश आलं आहे, त्याचा संबंध येतो. आगामी सर्व निवडणुकांत संघाची हीच रणनीती राहणार आहे, कारण घोषणा कितीहा केल्या तरी ‘विकासा’ला मतं मिळण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.  असा विद्वेषाचं विष भिनलेला समाज हेच वास्तव आहे, असं दर्शवलं जात आहे. मोदी ज्याला ‘नवा भारत’ म्हणत आहेत, त्याचा पाया हा असा परंपरागत सामाजिक बहुसांस्कृतिकतेची वीण उसवलेला, हिंदू धर्मातील सर्वसमावेशकतेचा पोत बिघडवून टाकलेला व ‘विकासा’च्या मृगजळाच्या मागे धावणारा समाजच असणार आहे. ‘हिंदू राष्ट्रा’च्या स्थापनेच्या दिशेनं टाकलेलं ते पहिलं ठोस पाऊल आहे. हेच मोदी सरकारचं गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठं यश आहे.

 

prakaaa@gmail.com

बातम्या आणखी आहेत...