आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या अवकाशयुगाचा प्रारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इलॉन मस्क यांना चांद्रमोहिमेत विशेष रस नाही. माणसाने चांद्रमोहीम आखून तिथे काही काळासाठी जाण्याऐवजी आता वसाहती वसवायला सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी जगाला केले आहे. चंद्रावर स्वयंचलित रोबोट्सकडून घरे, इतर इमारती बांधण्यात याव्यात. त्यानंतर पुढच्या टप्प्यात चंद्रावर कायमची मानव वसाहत वसवून चंद्राच्या कमी गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत अंतराळ प्रक्षेपणासाठी चंद्राचा वापर करण्याचा इलॉन मस्क यांचा मनसुबा आहे. 


स्टीव्ह जॉब्ज या व्यक्तिमत्त्वाने गेल्या दशकात अविश्वसनीय वाटणाऱ्या कल्पनांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणले व मानवी जीवन बदलवले. त्यामुळे स्टीव्हवर प्रेम करणारा व त्याच्याकडे आकर्षित झालेला मोठा वर्ग अॅपलचा ग्राहक झाला. त्यातून अॅपल जगातली सर्वात श्रीमंत कंपनी बनली. आयफोन, आयपॅड आणि मॅकबुकप्रोसारख्या आयुष्य बदलवून टाकणाऱ्या प्रॉडक्टच्या अमाप यशानंतर स्टीव्ह जॉब्ज यांचे २०११ मध्ये निधन झाले. त्यांच्या जाण्यानंतर अॅपलने नवे संशोधन बाजारात उतरवणे जणू बंदच करून टाकले. पण आयफोन-६, दुसऱ्या वर्षी आयफोन ६ एस, तिसऱ्या वर्षी आयफोन ७, ८, १० असे क्रमांक व अंत्याक्षरे वाढवून अॅपलने मोबाइल फोन आणि टॅब्लेट्सच्या बाजारपेठेवर निर्विवाद वर्चस्व राखले आहे. जगातली सर्वात श्रीमंत कंपनी असणाऱ्या अॅपलकडे ७०० अब्ज डॉलर्सहून अधिक भांडवल आहे. एवढे भांडवल उपलब्ध असूनही वजनाने कमी आणि अधिक ‘रॅम’ असलेले फोन बाजारात उतरवण्याशिवाय दुसरे काहीही विशेष ही कंपनी करीत नाहीये आणि भविष्यात ती तसे काही करील यावरून बऱ्याच जणांचा विश्वास उडत चालला आहे.  


स्टीव्ह जॉब्जच्या मृत्यूनंतर अमेरिकेतल्या विज्ञानपंथीय लोकांना नव्या सुपरहीरोची नितांत गरज होती. ही गरज टेस्ला मोटर्स या कंपनीचे प्रवर्तक इलॉन मस्क पूर्ण करू शकतील असा विश्वास अलीकडे काहींना वाटू लागला आहे. स्टीव्ह जॉब्ज यांच्याकडे असलेले वाक्चातुर्य, स्वाभिमान, शोमनशिप यापैकी काहीही इलॉन मस्क यांच्याकडे नाही. ते कित्येकदा पत्रकारांना साध्याशा कॅफेमध्ये सँडवीच खात मुलाखत देतात आणि तशी मुलाखत देत असताना आपल्या ओठांना लागलेले मायोनिज पुसायचेही त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यांच्या टेस्ला मोटर्सतर्फे पहिली पूर्णतः विजेवर चालणारी ऑटोमेटेड कार बाजारात येऊन आज जवळजवळ दहा वर्षे झाली आहेत. या दहा वर्षांत अवघ्या काही हजार कार बाजारात आणण्यात टेस्लाला यश आले आहे. तरीही टेस्लाची शेअर बाजारातली पत अवाढव्य आहे. टेस्लाच्या येऊ घातलेल्या मॉडेल ३ कारसाठी लाखो लोकांनी नोंदणी केलेली असून या कारच्या उत्पादनासाठी कॅलिफोर्नियात भव्य कारखान्याचे बांधकाम चालू अाहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हा जगातला सर्वात मोठा कारखाना असणार आहे. येत्या दशकात पेट्रोलियम पदार्थांचा वापर पूर्णपणे बंद करणे आणि चालकविरहित कार रस्त्यावर आणणे ही दोन मुख्य उद्दिष्टे टेस्ला मोटर्सची आहेत. सुरुवातीला बाष्कळपणा म्हणून टेस्लाच्या या दृष्टिकोनाला हसणाऱ्या इतर ऑटोमोबाइल कंपन्या अलीकडे मात्र याच उद्दिष्टांवर गांभीर्याने विचार करून विजेवर चालणाऱ्या निरनिराळ्या कार बाजारात येण्याची वाट पाहत आहेत. इलॉन मस्क आणि त्यांची कंपनी टेस्ला यांनी जगातल्या सबंध मानवजातीसाठी ‘रस्त्यावरचा प्रवास’ ही संकल्पना पूर्णपणे बदलून टाकायचे ठरवले आहे. याशिवाय बस वा रेल्वेचा प्रवासही कालबाह्य करून त्याऐवजी जमिनीखाली विशाल भुयारे बनवून त्यातून दळणवळणाचा मार्ग उभा करण्याचे प्रयत्नही इलॉन मस्क यांचीच दुसरी कंपनी ‘हायपरलूप वन’ करत आहे. ‘हायपरलूप’ भारतात जेव्हा येईल तेव्हा मुंबई ते दिल्ली हे अंतर अवघ्या एक तास दहा मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.  


प्रवासाचे समीकरणच बदलवून टाकणाऱ्या इलॉन मस्क यांचे लक्ष आता अवकाशाकडे लागले आहे. अंतराळात केल्या जाणाऱ्या प्रवासाची मूलभूत व्याख्या बदलवून टाकण्यासाठी मस्क यांचीच दुसरी ‘स्पेस एक्स’ ही कंपनी सरसावली आहे. अंतराळ प्रवासात आजपर्यंत ज्या रॉकेटचा वापर केला जात असे ती रॉकेट्स पृथ्वीच्या बाह्यकक्षेत गेल्यानंतर मूळ यानापासून वेगळी होऊन त्यांचा अवकाशातच स्फोट होत असे. पण मस्क यांच्या कंपनीचे रॉकेट हे यानापासून वेगळे झाल्यानंतर अवकाशात भरकटून किंवा जळून न जाता ते पृथ्वीवरून जेथून सोडण्यात येते त्या तळावर किंवा समुद्रात बांधलेल्या तळावर व्यवस्थित येते.   


पंचवीस वर्षांपूर्वी यातल्या बऱ्याचशा कल्पना या अव्यवहार्य, हास्यास्पद ठरवल्या गेल्या असत्या. त्या तशा आजही काहींना हास्यास्पदच वाटत अाहेत. स्वतः मस्कही आपल्या कल्पनांविषयी विनोद करीत असतात. ‘काही प्रयोग हे बावळटपणातून येतात आणि ते करीत राहायला हवे’ असे मस्क अधूनमधून म्हणत असतात. गेल्या मंगळवारी अशाच एका बावळट प्रयोगात इलॉन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ने ‘फाल्कन हेवी’ या नव्या अंतराळ प्रक्षेपकाची यशस्वी चाचणी घेतली. एकाच वेळी सहा लाख किलोहूनही अधिक भार वाहून नेण्याची क्षमता या प्रक्षेपकामध्ये असून माणसाने आजपर्यंत बनवलेल्या सर्वात मोठ्या चार प्रक्षेपकांमध्ये त्याचा समावेश होतो. ‘फाल्कन हेवी’च्या चाचणीचा उद्देश हा मोठ्या वजनदार वस्तू अवकाशात घेऊन जाणे हा होता. ही वजनदार वस्तू कुठली असावी याबद्दल सर्वांनाच कुतूहल होते. मस्क यांनी त्यांच्या कल्पनेतून साकार झालेली ‘टेस्ला रोडस्टर’ ही कार निवडली. अवकाशात उपग्रह वा यान प्रक्षेपित न करता एक कार प्रक्षेपित करणे हे अनेकांना विनोदी वाटू शकते आणि असा विनोद दुसरा कुणी आपल्यावर करण्याआधी मस्क यांनी स्वतःच स्वतःवरती केला आहे.  


या विनोदाच्या पलीकडे पाहताना ‘स्पेस एक्स’ आणि इलॉन मस्क यांची महत्त्वाकांक्षा प्रचंड विस्मयकारी आहे. हा लेख लिहिला जात असताना टेस्ला रोडस्टर ही कार मंगळाच्या बाह्यकक्षामार्गात स्थिरावली असेल वा ती त्या मंगळाच्याही पलीकडे जाण्याची शक्यता आहे. गेली पाच वर्षे चीन, दक्षिण कोरिया, अॅमेझॉनसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या चांद्रमोहिमेची तयारी करीत आहेत. मानवाने चंद्रावर शेवटचे पाऊल ठेवण्याच्या घटनेला लवकरच पन्नास वर्षे होणार आहेत. अवकाश संशोधनाच्या या तीव्र स्पर्धेची झेप फार तर माणसाला चंद्र वा मंगळावर पाठवू शकते. इलॉन मस्क यांना चांद्रमोहिमेत विशेष रस नाही. माणसाने चांद्रमोहीम आखून तिथे काही काळासाठी जाण्याऐवजी आता वसाहती वसवायला सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी जगाला केले आहे. चंद्रावर स्वयंचलित रोबोट्सकडून घरे, इतर इमारती बांधण्यात याव्यात. त्यानंतर पुढच्या टप्प्यात चंद्रावर कायमची मानव वसाहत वसवून चंद्राच्या कमी गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत अंतराळ प्रक्षेपणासाठी चंद्राचा वापर करण्याचे इलॉन मस्क यांचा मनसुबा आहे. मंगळ ग्रहावरही वसाहती असाव्यात असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या मूळ ग्रहावरून बाहेर पडून उपग्रहावर जाणे तिथून दुसऱ्या ग्रहावर जाणे आणि त्यानंतर त्या ग्रहाच्या उपग्रहावर वस्ती बनवून पुढच्या ग्रहाच्या यात्रेवर निघणे हा इलॉन मस्क यांच्या प्रवासाचा प्लॅन आहे. तो वास्तवात शक्य झाल्यास माणूस आपली सूर्यमाला आणि त्यानंतर सूर्यमालेच्या बाहेरचा प्रवास करू शकेल.  इलॉन मस्क यांच्या अचाट कल्पना व त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी शोधलेले तंत्रज्ञान हे चकित करणारे आहे. त्यातून अनेक नव्या वैज्ञानिक संज्ञाचीही निर्मिती झाली आहे. मानवप्राण्याला केवळ पृथ्वीवरचा जीव न राहू देता तो ‘अवकाशगंगीय प्रजाती’ बनवण्याचे मस्क यांचे स्वप्न आहे. ही कल्पना अशक्य वाटत असली तरी २० वर्षांपूर्वी अवकाशात झेपावून पृथ्वीवर व्यवस्थित परत येणारे रॉकेटही अशक्यप्राय कल्पनाच होती. थेट भविष्याच्या डोळ्याला डोळा भिडवून मस्क यांनी आरंभिलेले कार्य पूर्ण झाल्यास सबंध मानव प्रजातीच्या इतिहासातली ती सर्वात ऐतिहासिक व देदीप्यमान घटना असेल हे नक्की. 


- राहुल बनसोडे,

rahulbaba@gmail.com

बातम्या आणखी आहेत...