आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला हिंदूपणाचा बाज देण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रात शिवसेना या दोन पक्षांना हिंदू हिताची चिंता करणारे पक्ष ठरवून टाकलेले आहे. राजकीय भाषेत सांगायचे तर ही हिंदुत्वाची स्पेस काँग्रेसलादेखील हवी आहे. ती स्पेस मिळवायची असेल तर आमचे हिंदूपण कसे बावनकशी आहे आणि बाकीच्यांचे कसे अशुद्ध आहे हे सांगणे ओघाने आले. 
 
 
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने ‘मी हिंदू आहे आणि याचा मला अभिमान आहे,’ असे म्हटलेले जर तुमच्या वाचनात आले तर तुम्हाला काय वाटेल? कदाचित आश्चर्य वाटेल. शशी थरूर यांचे “व्हाय आय अॅम अ हिंदू’ हे पुस्तक वाचून मीदेखील चकित झालो. शशी थरूर यांचे पुस्तक कांचा इलय्या यांच्या पुस्तकाला उत्तर देणारे नाही. शशी थरूर यांनी धाडसाने आणि गर्वाने म्हटले की मी हिंदू आहे आणि याचा मला अभिमान आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चक्क गणपतीचे चित्र आहे आणि पुढे पूजेचे ताट आहे. 


दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या अभ्यासू आणि लेखक राजकारणी मंडळीत शशी थरूर हे आपल्या पुस्तकांमुळे उठून दिसतात. शशी थरूर यांचे पुस्तक अभ्यासपूर्ण आहे. त्यात भरपूर संदर्भ आहेत. भाषा ओघवती आणि सोपी आहे. सामान्य इंग्रजी ज्ञान असलेला वाचकदेखील हे इंग्रजीतील पुस्तक वाचू शकतो. शशी थरूर यांच्या पुस्तकाचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात त्यांनी वेदकाळापासून ते महात्मा गांधीजींच्या काळापर्यंतचा हिंदू प्रवासाचा आढावा घेतलेला आहे. या आढाव्यात याज्ञवल्क्य, चार्वाक, उपनिषदातील अनेक ऋषी, भगवान गौतम बुद्ध, भक्ती चळवळीतील अनेक संत, राजा राममोहन राय ते विवेकानंदांपर्यंतच्या आधुनिक काळातील थोर महात्मे यांची आपल्याला भेट होत जाते. हिंदू या शब्दाची व्याख्या करता येत नाही, ती भौगोलिक संज्ञा आहे, ती एक जीवनपद्धती आहे आणि विवेकानंदानी म्हटल्याप्रमाणे सत्य एक आहे आणि त्याकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत म्हणून सर्वच धर्म सत्य आहेत या पद्धतीत जगणाऱ्याला हिंदू म्हणायचे. एकांतिक (सेमेटिक) धर्मात येणारे जुडाईझम, ख्रिश्चनिटी आणि इस्लाम, एक ग्रंथ, एक प्रेषित, एक देव आणि एक आचार पद्धती मानणारे धर्म आहेत. हिंदू धर्माचे स्वरूप असे नाही. हिंदू हा अनेक देवता मानणारा, वेगवेगळी तत्त्वज्ञाने मानणारा, वेगवेगळ्या आचार पद्धती मानणारा समाज आहे. शशी थरूर यांनी आपल्या पुस्तकातील पहिल्या भागात हा सर्व भाग उत्तम तऱ्हेने आणला आहे. 


शशी थरूर यांना अशा प्रकारचे पुस्तक आताच लिहावे असे का वाटले, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. पराभवाची मीमांसा करताना ए. के. अँथोनी यांनी असे मत नोंदवले की, ‘काँग्रेस पार्टी हिंदूविरोधी पार्टी आहे, असे हिंदूंचे मत झाले.’ हे मत बदलणे आवश्यक ठरले. राहुल गांधी यांनी गुजरात निवडणूक प्रचाराच्या काळात मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा लावला. काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने म्हटले की, राहुल गांधी जानवेधारी ब्राह्मण आहेत. आम्ही हिंदूविरोधी नाही, हिंदू आस्थांच्या विरोधी नाही, हे राहुल गांधी आपल्या कृतीने दाखवून देण्याचा प्रयत्न करत होते. या कृतीला तत्त्वज्ञानाची बैठक देण्याचे काम शशी थरूर यांच्या पुस्तकाने केले आहे. थोडक्यात सांगायचे तर “मी काँग्रेसी आहे, पंडित नेहरू यांचा भक्त आहे, तरीदेखील मी हिंदू आहे आणि याचा मला अभिमान आहे,’ हे थरूर यांना सांगायचे आहे.

 
परंतु एवढेच सांगून पुस्तक लिहिण्याचा राजकीय हेतू सफल होत नाही. हिंदू जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रात शिवसेना या दोन पक्षांना हिंदू हिताची चिंता करणारे पक्ष ठरवून टाकलेले आहे. राजकीय भाषेत सांगायचे तर ही हिंदुत्वाची स्पेस काँग्रेसलादेखील हवी आहे. ती स्पेस मिळवायची असेल तर आमचे हिंदूपण कसे बावनकशी आहे आणि बाकीच्यांचे कसे अशुद्ध आहे हे सांगणे ओघाने आले. पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे शीर्षक आहे, “पॉलिटिकल हिंदूइझम’ या भागात शशी थरूर यांनी हे काम केले आहे. भाजपचे हिंदुत्व संकुचित आहे, असहिष्णू आहे, उदारमतवादी नाही, हिंदू धर्माला ते असहिष्णू धर्म बनवू पाहतात, एकांतिक धर्मांप्रमाणे आपल्या पद्धती दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करतात, भाजपचे हिंदुत्व विवेकानंद आणि गांधीच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे आणि ते देशाच्या ऐक्याला मारक आहे वगैरे. 


विद्वान लेखक आपले मत सिद्ध करण्यासाठी काही आधार घेतात. थरूर यांनी सावरकर, गोळवलकर आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या लेखनातील काही उतारे पुस्तकात दिलेले आहेत. या उताऱ्यावरून त्यांनी हे सिद्ध  करण्याचा प्रयत्न केला आहे की, संघ - भाजपचे हिंदुत्व/हिंदू धर्म अत्यंत संकुचित असून तो वेदकाळापासून चालत आलेल्या परंपरेला छेद देणारा आणि देशात अस्थिरता निर्माण करणारा आहे. थरूर यांनी दिलेली सर्व अवतरणे या विषयाचे वाचन करणाऱ्या मराठी वाचकांना नवीन नाहीत. मराठी भाषेत अशा लिखाणाचे अमाप पीक आहे. लेखक जेव्हा आपली ठरलेली मते सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारचे उतारे शोधतो तेव्हा ते अनेक वेळा संदर्भहीन असतात, कालबाह्य असतात आणि हेतुत: निवडलेले असतात. उदा. गोळवलकर गुरुजी यांचे, “वुई’ हे पुस्तक संघात कुणी वाचत नाही, संघाच्या अधिकृत वाङ््मयात त्याचा अंतर्भाव केला जात नाही, समग्र गुरुजींचे बारा खंड प्रकाशित झालेले आहेत, या खंडात त्याचा समावेश नाही. १९३३ च्या सुमारास प्रकाशित झालेले हे पुस्तक आहे आणि त्याला काळाचेही भरपूर संदर्भ आहेत. अशा संदर्भहीन पुस्तकाचा युक्तिवाद करण्यासाठी उपयोग शून्य असतो. हेच दोष सावरकर आणि दीनदयाळ यांच्याबाबतीत दाखवता येतात. 


काँग्रेसला हिंदूपणाचा बाज देण्याचा थरूर यांचा प्रयत्न स्तुत्य असला तरी दुसऱ्याला लहान ठरवून आपण मोठे होत नसतो. समोरच्याला काळा म्हटल्याने मी गोरा आहे, असे होत नाही. गोरेपण अंगभूत असावे लागते. शशी थरूर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला तर हिंदू जनतेने संघ आणि भाजपला आतापर्यंत कचऱ्याच्या टोपलीत टाकून द्यायला पाहिजे होते, पण उलटे झाले आहे. हिंदूंनी त्यांना डोक्यावर घेतले आहे. सामान्य हिंदू हा सर्वसमावेशक हिंदू असतो. तो कधीही संकुचित विचार करत नाही. “माझ्यासारखाच दुसरा’ या भावनेने तो इतरांशी वागत असतो. त्याला कोणत्याही प्रकारचा दुराग्रह किंवा अतिवाद सहन होत नाही आणि सामान्य हिंदूची ही मनोवृत्ती बदलण्याचे सामर्थ्य ना संघात आहे ना भाजपत आहे. असा सामान्य हिंदू डोके गहाण ठेवून संघ आणि भाजपला जवळ करत नाही. त्याच्या भावभावनांशी जेव्हा संघ-भाजपचे कार्यकर्ते एकरूप होतात तेव्हा त्याला त्या संघटना आपल्या वाटू लागतात. समाजाच्या या मानसिकतेकडे शशी थरूर यांनी काहीही लक्ष दिलेले नाही. 


नरेंद्र मोदी यांना हिंदू समाजात सर्वाधिक लोकप्रिय करण्याचे काम काँग्रेसनेच केले. ज्या कारणासाठी मोदींना शिव्या घालण्यात आल्या, मौत का सौदागर ठरवण्यात आले, हिटलरचा भाऊ ठरवण्यात आले, ती कारणे हिंदू समाजाला कमालीची अन्यायकारक वाटली. शशी थरूर पुन्हा तीच चूक करू इच्छितात. हिंदू, हिंदू धर्म, हिंदू चालीरीती, हिंदुत्व याविषयी जेवढा नकारात्मक प्रचार होईल तेवढे भाजपचे बळ वाढत जाईल. काँग्रेसला खरी गरज आपले उदारमतवादी हिंदुत्व आपल्या व्यवहारातून, नेत्यांच्या भाषणातून आणि पक्षाच्या धोरणातून व्यक्त करता आले पाहिजे. अयोध्येचा खटला आता स्थगित करावा आणि २०१९ नंतर चालवावा असे जेव्हा काँग्रेसतर्फे कोर्टात सांगितले जाते तेव्हा मंदिरभेटी या धूळफेक आहेत हे सामान्य हिंदूच्या लक्षात येते. कथनी आणि करणी यांच्यात एकवाक्यता काँग्रेसने ठेवायला पाहिजे. ज्याचा गर्व करावा असे व्यावहारिक विषय थरूर यांनी शोधून काढावेत आणि त्याचा आग्रह काँग्रेसने धरावा, त्याचा राजकारणात जरूर फायदा होईल.


- रमेश पतंगे, राजकीय विश्लेषक

बातम्या आणखी आहेत...