आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेच्या नव्हे, चिंतेच्या राजकारणाची गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तेचे राजकारण खूप झाले. नाव बदलतात, चेहरे बदलतात, पक्ष बदलतात, घोषणा बदलतात; परंतु आर. के. लक्ष्मणच्या कॉमन मॅनमध्ये जाणवेल असा बदल होत नाही. हा बदल घडवून आणण्याचे राजकारण ही आज देशाची गरज आहे. त्यासाठी सत्तेसाठी भांडणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना सामान्य माणसाचे कल्याण याबाबतीत शंभर टक्के सहमती झाली पाहिजे. जे करू ते सामान्य माणसासाठी, हा प्रत्येक पक्षाचा अंतिम कार्यक्रम झाला पाहिजे.


पुढील वर्षी महाराष्ट्र विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत. राजकीय पक्षांच्या दृष्टीने  एक निवडणूक संपली की लगेचच दुसऱ्या निवडणुकीची तयारी सुरू होते. जसजशी निवडणूक जवळ येते तसतसे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष आपापले मतदार बांधण्याच्या कामाला लागतात. निवडणुका जिंकण्यासाठी अनेक विषय कारणीभूत होत असतात. आतापर्यंत तरी आपल्या देशातील कुठलीही निवडणूक पक्षाच्या आर्थिक, सामाजिक कामाच्या आधारावर लढवली गेलेली नाही. त्यामुळे जिंकली गेलेली नाही. सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांना लोकभावना उद्दीपित कराव्या लागतात. त्यात जो पक्ष यशस्वी होईल तो निवडणूक जिंकतो. दुसऱ्या भाषेत सामान्यतः प्रत्येक निवडणूक ही भावनिक निवडणूक असते. मतदारांच्या भावना जागवण्यासाठी आणि त्या केंद्रभूत करण्यासाठी वेगवेगळे विषय लागतात. त्यात सर्वात महत्त्वाचा विषय जातीचा आणि धर्माचा असतो.  


तसे पाहू जाता प्रत्येक पक्ष जातीनिरपेक्ष समाज आणि धर्मनिरपेक्ष समाज यावर भाषणे देत असतो, ती द्यावी लागतात. कारण आपली राज्यघटना जातीआधारित आणि धर्माधारित राजकारणाला अनुमती देत नाही. ही अनुमती कशी मिळवायची याबाबतीत सगळेच राजकीय पक्ष अत्यंत हुशार असतात. एखादा पक्ष ‘महाराष्ट्रात नवपेशवाईचे राज्य आहे’ असे म्हणेल. त्याचा अर्थ होतो ब्राह्मणशाही आहे. त्याविरुद्ध मराठा आणि इतर समाजाने उभे राहिले पाहिजे. तर दुसरा पक्ष म्हणेल हे शासन घटना बदलायला निघाले आहे. त्याचा अर्थ होतो समतेची घटना काढून विषमतेची घटना आणायची आहे. म्हणून विषमतेत जगणाऱ्या जातींनी एकत्र झाले पाहिजे. तर आणखीन एखादा पक्ष म्हणेल, तिहेरी तलाकावर बंदी ही कुराणाच्या विरोधी आहे. याचा अर्थ होतो सत्ताधारी पक्ष मुस्लिम धर्मात ढवळाढवळ करीत आहे, म्हणून मुसलमानांनी संघटित होऊन मतदान केले पाहिजे.  


शिवसेनेसारखा एखादा पक्ष म्हणतो की, भाजपबरोबर युती करणार नाही, आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू, भाजपवाले आमच्या घरात घुसले आहेत, त्यांना बाहेर काढले पाहिजे. कोरेगाव भीमाच्या प्रश्नावरून दलित समाजातील एक गट अधिक आक्रमक झालेला दिसतो. त्यांना नवीन नेता मिळालेला आहे आणि या नेत्याने डाव्यांबरोबर युती करून महाराष्ट्रातील सरकार खाली खेचण्याचा निर्धार केलेला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन लढणारे म्हणतात, आता सादर झालेल्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. त्याविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये देशव्यापी आंदोलन करून जागृती केली पाहिजे. युवकांची बाजू घेणारे बेरोजगारांचे मोर्चे काढू लागले आहेत. सरकारने बेरोजगारांसाठी काही केलेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.  


प्रत्येक राजकीय पक्ष सामान्य माणसाच्या बाजूने बोलण्याचा पवित्रा घेतो. आर. के. लक्ष्मण यांनी कॉमन मॅन (सामान्य माणूस) याची प्रतिमा आपल्या व्यंगचित्रातून फारच प्रभावीपणे मांडलेली आहे. या सामान्य माणसाच्या भूमिकेत जाऊन विचार केला तर सामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला आढळेल. प्रत्येक राजकीय पक्ष सामान्य माणसासाठी मी हे करणार, ते करणार असे म्हणतो. गेली सदुसष्ट वर्षे सामान्य माणूस हेच ऐकतो, पण त्याच्या अंगरख्यावरची ठिगळं गेल्याचा त्याला अनुभव येत नाही. तो ज्या जागी आहे त्याच जागी तो असतो. निवडणुका येतात, प्रचाराची रणधुमाळी होते, निकाल लागतात, नवीन सरकार अस्तित्वात येते आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, या म्हणीप्रमाणे राज्य आणि देश चालत राहतो.  


सामान्य माणसाला काय हवं असतं? त्याची अपेक्षा दोन बेडरूम किचनची नसते, घरासमोर चारचाकी गाडीची नसते, भरगच्च बँकबॅलन्सची नसते, सामान्य माणसाच्या अपेक्षा सामान्य असतात. दोन वेळची भाकरी आणि त्यावरची भाजी कष्ट करून मिळाली पाहिजे. मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या शाळा पाहिजेत, लोकलमधून प्रवास करताना किमान आरामात उभे राहता यावे एवढी तरी जागा मिळावी, रस्त्याने जाताना मागून येणाऱ्या बाइकरने आपल्याला उडवू नये, अशी त्याची अपेक्षा असते. शिक्षण झाल्यानंतर मुला-मुलींना त्यांच्या योग्यतेप्रमाणे कामधंदा मिळावा आणि ती मार्गी लागावीत, आजारपण आले असता माफक किमतीत औषधे मिळावीत, वैद्यकीय सेवा मिळाव्यात. लूटमार करणारे हॉस्पिटल आणि डॉक्टर असू नयेत. मुले ज्या शाळेत जातात त्या शाळेत मनापासून शिकवणारे शिक्षक असावेत. शाळा शिक्षणासाठी असाव्यात, तो पैसे कमावण्याचा धंदा होऊ नये. एखादी तक्रार घेऊन पोलिस स्टेशनला गेल्यास पोलिसांनी सेवकाच्या भूमिकेत ती तक्रार लिहून घ्यावी. सामान्य माणसाला दमदाटी करू नये. सरकारी कामासाठी एखाद्या कार्यालयात गेल्यास तिथल्या सरकारी कर्मचाऱ्याने हेलपाटे मारायला लावू नयेत. साध्या साध्या कामासाठीसुद्धा पैशाची मागणी करू नये. अमुक प्रकारच्या कामाचे असे दर आहेत, असे त्याला सांगू नये. या एवढ्या माफक अपेक्षा सामान्य माणसाच्या असतात. त्या सोडून त्याच्या अपेक्षांच्या कक्षेत न येणारे विषय सर्वच राजकीय पक्ष बोलत राहतात. समतेचे राज्य आणायचे आहे, जातीयता संपवायची आहे, धर्मवाद गाडायचा आहे, पेशवाई हाकलायची आहे, शिवशाही आणायची आहे, बळीचे राज्य आणायचे आहे, खरं सांगायचं तर यापैकी सामान्य माणसाला काहीही नको असते. त्याला शब्द समजतात, परंतु शब्दामागे दडलेले राजकीय अर्थ, राजकीय व्यूहरचना समजत नाही.  


अशा या सामान्य माणसाचा विचार देशातील दोन महापुरुषांनी केला. पहिल्या महापुरुषाचे नाव आहे-स्वामी विवेकानंद. त्यांनी राजकारण केले नाही, पण त्यांनी मूलभूत विचार केला की, देव सामान्य माणसात बघा, गरिबात बघा, भारत झोपडीत राहतो. त्याच्या अन्न, वस्त्राची चिंता करा. दरिद्रनारायण हा त्यांनी दिलेला शब्द आहे. या दरिद्रनारायणाची आपल्या सर्वांना सेवा करायची आहे, असा त्यांनी मंत्र दिला. त्याच्या नावाने राज्य करायचे नसून राज्य त्याच्यासाठी करायचे आहे.  


दुसरे महापुरुष महात्मा गांधी आहेत. सामान्य माणसाला अंग झाकण्याइतकेही वस्त्र मिळत नाही. म्हणून हा महात्मा मरेपर्यंत पंचात राहिला. राजकारण उदंड केले, पण ते सत्तेसाठी नाही केले. सामान्य माणसाच्या कल्याणासाठी केले. दिवस-रात्र त्याची चिंता केली. त्याच्या झोपडीत दिवा कसा लागेल, त्याच्या पानात भाकरी कशी पडेल, त्याच्या हाताला काम कसे मिळेल, त्याच्या अंगावर वस्त्र कसे येईल, आपल्या परिसरात तो स्वाभिमानाने कसा जगेल याची चिंता या महात्म्याने केली.  


आज देशाला या ‘चिंतेच्या राजकारणाची’ गरज आहे. सत्तेचे राजकारण खूप झाले. नाव बदलतात, चेहरे बदलतात, पक्ष बदलतात, घोषणा बदलतात, परंतु आर. के. लक्ष्मणच्या कॉमन मॅनमध्ये जाणवेल असा बदल होत नाही. हा बदल घडवून आणण्याचे राजकारण ही आज देशाची गरज आहे. त्यासाठी सत्तेसाठी भांडणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना सामान्य माणसाचे कल्याण याबाबतीत शंभर टक्के सहमती झाली पाहिजे. जे करू ते सामान्य माणसासाठी हा प्रत्येक पक्षाचा अंतिम कार्यक्रम झाला पाहिजे, मार्ग वेगळे राहतील, कार्यक्रमात विविधता राहू शकते, विचारधारेमध्येदेखील वेगळेपण राहू शकते, परंतु सर्वाचा केंद्रबिंदू सामान्य माणूसच हवा.


- रमेश पतंगे, ज्येष्ठ पत्रकार

बातम्या आणखी आहेत...