आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; यशाच्या वारूला लगाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एकहाती सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपने त्यानंतर झालेल्या बहुतांश निवडणुकांत घवघवीत यश मिळवले. निवडणूक कोणतीही असो, मग ती गावपातळीची किंवा कितीही मोठी, तेथे भाजपने तगडे आव्हान उभे केले, आणि यशही संपादन केले. काँग्रेसमुक्त देशाचा नारा देत एक-एक सत्ताकेंद्र हस्तगत करत निघालेला भाजप आणि मोदींच्या यशाचा वारू कसा रोखायचा, हा प्रश्न सर्वच विरोधकांसमोर आहे. सरकार आणि व्यवस्थेच्या विरोधातील वातावरणाचा लाभ मिळवत सत्ता हस्तगत होईल अशी आशा लागलेल्या काँग्रेस आणि इतर पक्षांना मधल्या काळात कोणत्याच निवडणुकांनी मोठे यश मिळवून दिले नाही. गुजरात आणि इतर ठिकाणी झालेल्या निवडणुकांत काही ठिकाणी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या जागा किंवा मतदान वाढले; पण सत्ता  मात्र भाजपच्याच ताब्यात गेली. मोदी आणि भाजपचे सरकार असलेल्या सगळ्याच ठिकाणी त्यांच्यावर प्रचंड टीका होत असताना सत्ता पुन्हा त्यांनाच कशी मिळते, यावर भले भले चिंतित आहेत. 


देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना गुरुवारी राजस्थानमधील २ लोकसभा आणि १ विधानसभा तसेच पश्चिम बंगालमधील १ लोकसभा आणि १ विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत होते. त्यात मात्र भाजपला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसले. या पाचही ठिकाणी भाजपचा दणदणीत पराभव झाला. राजस्थानातील तीनही जागांवर काँग्रेस तर पश्चिम बंगालमधील २ जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. या ठिकाणी भाजपला केवळ अपयशाचा सामना करावा लागला नाही तर त्यांच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला.


 लोकसभेच्या अलवर जागेवर काँग्रेस उमेदवार १ लाख ९६ हजार मतांनी निवडून आला,  तर अजमेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवाराला भाजप उमेदवारापेक्षा ८४ हजार अधिकची मते पडली. पश्चिम बंगालमधील उलबेडिया लोकसभा मतदारसंघात तृणमूल उमेदवाराला भाजप उमेदवारापेक्षा ३ लाख ६७ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत.  
 
 
पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला असला तरी भाजपचे मताधिक्य वाढले आहे याकडे दुर्लक्ष करता येत नाही. तेथे माकपची बराच काळ सत्ता होती. त्या ठिकाणी माकप आणि तृणमूल अशी थेट लढत आहे. त्यानंतर काँग्रेसचा नंबर लागतो, पण या पोटनिवडणुकांत तृणमूलपाठोपाठ भाजपने मताधिक्य मिळवले. तेथे माकप तिसऱ्या आणि काँग्रेस चौथ्या नंबरवर गेल्याचे पाहायला मिळत आहे.  


राजस्थान विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर लागलेल्या या निकालामुळे भाजपमध्ये चिंता तर काँग्रेसमध्ये उत्साह संचारल्याचे चित्र आहे. निकालाचे विश्लेषण करताना जाणकार, सरकारने काहीच विकासकामे केली नाहीत, सुरू होती ती थांबवली, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था आणि व्यवस्थेच्या विरोधातील वातावरण ही प्रमुख कारणे सांगतात. त्यामुळेच मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली, पंतप्रधानांनी बाडमेरचा दौरा केला ‘रॉयल रिफायनरी’ च्या कार्यारंभाचा समारोह केला, पण मतदारांवर भुरळ पाडू शकले नाहीत, असे सांगितले जाते. इकडे राहुल गांधींनी गटातटात विखुरलेल्या काँग्रेसला सचिन पायलट यांच्या माध्यमातून नवीन नेतृत्व दिले आणि सगळ्यांना एकत्र येत लढण्याच्या सूचना केल्या. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना राजस्थानचे प्रभारी करत तेथे कामाला लावले. तसेच पुढील विधानसभा कोणाच्या नेतृत्वात लढवल्या जातील या काँग्रेसजनांच्या कळीच्या प्रश्नावर काही न बोलता उत्तर दिल्यामुळे समाज मोठ्या संख्येने काँग्रेसच्या बाजूने आला. आणि तसेही राजस्थानात प्रत्येक निवडणुकीच्या वेळी वेगवेगळ्या पक्षांना संधी देण्याची एक प्रथा रूढ झाली आहे. त्याचा भाग म्हणून हे निकाल पाहायला मिळाल्याचेही सांगितले जात आहे.   या पोटनिवडणुकांच्या निकालावरून लगेच भाजपच्या विजयाच्या प्रवासाला पुढे धोका आहे का, या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. एखाद-दुसऱ्या निकालाने एकदम फरक पडणार नाही असे भाजपला वाटते, तर इतर विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेसला मात्र दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठीच्या यशाचा मार्ग या निकालातून सापडल्याची भावना निर्माण झाली आहे. प्रत्येक ठिकाणचे वातावरण आणि राजकारण वेगवेगळे आहे. राजस्थानात काँग्रेस जशी गटातटात विखुरलेली आहे तशीच ती सगळ्याच ठिकाणी आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या काँग्रेसला हा विजय म्हणजे भविष्यातील विजयाची नांदी म्हणून पाहणे घातक ठरू शकते. भाजपच्या विकासाच्या उधळलेल्या वारूला या निकालाने थोडासा लगाम मात्र नक्कीच लागला आहे.


- सचिन काटे, कार्यकारी संपादक, अकोला  

बातम्या आणखी आहेत...