आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवयव प्रत्यारोपण शास्त्रातील नवे पर्व..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवयवदात्यांची कमतरता ही अवयव प्रत्यारोपणाच्या मार्गातील  प्रमुख समस्या आहे. जागरूकतेचा अभाव आणि अवयवदान व प्रत्यारोपणासाठी अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे अवयवदानाचा वेग कमी आहे. लोकांमध्ये याबाबत अनेक गैरसमज  आहेत आणि अवयव प्रत्यारोपणासाठी हे गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.


अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ऑस्टिन येथे ‘अमेरिकन असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’च्या वार्षिक परिषदेत अवयव विकसक संशोधनावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पॅनलने जे रिसर्च डॉक्युमेंट सादर केले आहे. या पेपरनुसार मानवी अवयव आता मानवी शरीराबाहेर नैसर्गिक पद्धतीने निर्मिले जाऊ शकतील.  


या संशोधकांनी मादी डुकराचे फलित प्रक्रिया झालेले बीजांड वापरले होते. गर्भधारणेसाठी यातील ज्या पेशी काम करतात त्यांचे वर्गीकरण करून त्यातील ज्या जीनपासून वा जीन्सच्या जोडीपासून गर्भाच्या हृदय निर्मितीचे काम चालते ते बाजूला काढले गेले. दरम्यान, ज्या रुग्णावर हृदय प्रत्यारोपण करायचे होते त्याच्या हृदयाची स्टेमसेल काढून त्या जीन्सद्वारे गर्भात इंजेक्ट केले गेले. यानंतर नऊ महिन्यांचा कालावधी जाऊ दिल्यानंतर परिपूर्ण वाढलेल्या डुकराचे हृदय मानवी पेशींनी बनलेले आढळले. या डुकराला कत्तलखान्यात नेण्याआधी हे हृदय काढून त्याचे स्टेमसेल देणाऱ्या हृदय प्रत्यारोपणाची गरज असणाऱ्या रुग्णावर रोपण केले गेले. येथे अवयव मिसमॅच (शरीराने अस्वीकार करणे) होण्याची शक्यता पूर्णतः निकालात निघते. याआधी मानवी शरीराला त्याच्या जीन्सशी अजिबातच न जुळणाऱ्या अवयवांचे यशस्वीरीत्या रोपण करणे कठीण काम होते. अशा शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर शरीराने काही दिवसांतच रोपण केलेला अवयव रिजेक्ट केले जाण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्याला या प्रक्रियेने आळा बसणे शक्य होणार आहे.  


प्रत्यारोपणासाठी अवयवांची गरज व मागणी जगभरात मोठ्या प्रमाणात वाढते आहे. नानाविध कारणांनी विविध अवयवांची गरज असणारे रुग्ण जगभरात मोठ्या रकमेच्या खर्चिक शस्त्रक्रिया करून घेण्यास तयार असूनही केवळ दाते न मिळाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावा लागतोय. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही वर्षाकाठी ७५००० बाधित व्यक्ती आपल्याला हव्या असणाऱ्या अवयवाच्या दात्याची प्रतीक्षा करतात आणि अवयव न मिळाल्यामुळे रोज किमान २० जणांचा तरी मृत्यू होतो. अशात काहींना अवयवरोपण होऊनदेखील जेनेटिक मॅचिंग न झाल्याने अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांवर या नव्या संशोधनाने नवी दिशा मिळेल. जे प्राणी कत्तलीद्वारे मारले जातात अशा पाळीव सस्तन प्राण्यांत ही प्रक्रिया करता येईल. मेंढी, गाय व डुक्कर यांत मानवी अवयव अशा रीतीने जन्माला घालता येतील. तो प्राणी मारला जाण्याआधी मानवी निकडीचा अवयव काढून घेता येईल, अशाने अनावश्यक पशुहत्याही टाळता येईल.  


अशा पद्धतीने मानवी अवयव तयार करण्याची ही पहिली वेळ असली तरी बायोटेक्नोलॉजीच्या २०१२ मधील जेनेटिक इंजिनिअरिंगमधील नव्या ऊतीनिर्मिती प्रक्रियेचाच हा एक भाग आहे. मानवी प्लुरीपोटेंट पेशी विविध प्राण्यांच्या पेशीत वाढवल्या जाऊ शकतात हे याआधी २००६ मध्ये सिद्ध केले गेलेय. आता झालेले संशोधन हे या दोन्ही क्रियांचे एकत्रीकरण आहे. कॅलिफोर्निया येथील साल्क इन्स्टिट्यूटमध्ये संशोधकांनी याची आधीची पायरी पूर्ण करताना उंदराच्या छोट्या पिल्लात दुसऱ्या उंदराच्या पॅनक्रियाज, हृदय, डोळे आणि अन्य अवयवांच्या पेशीपासून बनलेले अवयव निर्मिले होते. याचाच पुढचा टप्पा स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या हिरोमित्सू नाकाऊची यांच्या नेतृत्वाखालील टीमने यशस्वीरीत्या पार पाडला. ज्या उंदरांमध्ये हे अवयव निर्मिले गेले ते नॉर्मल आयुष्य जगले हे विशेष. त्यातील ज्या घुशीच्या पॅनक्रियाजच्या स्टेमसेलपासून दुसऱ्या उंदराच्या शरीरात पॅनक्रियाज बनवल्या गेल्या होत्या त्यांचे दात्या उंदरात प्रत्यारोपण केले गेले तेव्हा त्याच्या डायबेटिक डिसऑर्डरवर ताबा मिळवता आला. हे संशोधन अफलातून होते आणि त्याचा पुढचा टप्पा गाठताना शास्त्रज्ञांनी मानवी अवयव मानवी शरीराबाहेर विकसित करून बायोटेक्नॉलॉजीत आणि जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये क्रांतिकारी पर्व आणले आहे.   


अवयवदान आणि प्रत्यारोपणामुळे दरवर्षी हजारो लोकांना जगण्याची दुसरी संधी मिळते. श्रीमंत आणि गरीब यांच्यातली वाढती दरी, मानवी अवयवांची मागणी आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता यामुळे अवयवांचा व्यापार हा काही लोकांसाठी पैसे कमावण्याचे साधन झाला आहे, तर काहींना यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र अवयवांच्या व्यापारामुळे  गरिबांचे शोषण होते. दरवर्षी शेकडो भारतीय अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत मरण पावतात. अवयवदान करणाऱ्यांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांची संख्या यातील तफावत यामागील कारण आहे. दरवर्षी सुमारे २ लाख भारतीयांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असते, मात्र  प्रत्यक्षात केवळ ३ ते ४ हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जाते. हृदय प्रत्यारोपणाच्या बाबतीतही परिस्थिती काही  वेगळी नाही. देशभरात दरवर्षी ४ ते ५ हजार लोकांना हृदय प्रत्यारोपणाची गरज असताना, केवळ १०० लोकांचे  हृदय प्रत्यारोपण होऊ शकते. नॅशनल प्रोगाम ऑफ कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस (एनपीसीबी)च्या २०१२-१३ च्या अहवालानुसार २०१२-१३ मध्ये देशात ८० हजार ते एक लाख कॉर्नियाची गरज असताना केवळ ४४१७ कॉर्निया उपलब्ध होते. देशभरात सध्या १२० प्रत्यारोपण केंद्रे असून तिथे दरवर्षी साडेतीन ते चार हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. यापैकी चार केंद्रांवर १५० ते २०० यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात, तर काही केंद्रांवर क्वचित एखादे हृदय प्रत्यारोपण केले जाते.  


अवयवदात्यांची कमतरता ही अवयव प्रत्यारोपणाच्या मार्गातील  प्रमुख समस्या आहे. जागरूकतेचा अभाव आणि अवयवदान व प्रत्यारोपणासाठी अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे अवयवदानाचा वेग कमी आहे. लोकांमध्ये याबाबत अनेक गैरसमज  आहेत आणि अवयव प्रत्यारोपणासाठी हे गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. अवयवांचे विच्छेदन किंवा ते शरीरापासून वेगळे करणे हे निसर्ग आणि धर्माच्या विरुद्ध असल्याचे बहुसंख्य भारतीयांचे म्हणणे आहे. अवयव हवे असल्यास रुग्णालयातले कर्मचारी रुग्णाला वाचवण्याचे परिश्रम घेणार नाहीत असा काहींचा समज आहे. तर काहींचे म्हणणे आहे की मरण पावण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले जाऊ शकते. याशिवाय, अवयवदानासाठी केंद्रीय नोंदीकरण व्यवस्था नसल्यामुळेदेखील लोकांना अवयवदानाबाबत किंवा अवयवदात्याबाबत माहिती मिळू शकत नाही. ब्रेन डेथला प्रमाणित करणे हीदेखील समस्या आहे. जर लोकांना ब्रेन डेथ बाबत माहिती नसेल, तर रुग्णांच्या नातेवाइकांना अवयवदानासाठी तयार करणे अवघड होऊन बसते. 


सरकारने १९९४ मध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा मंजूर केला होता. या कायद्यांतर्गत, असंबंधित  प्रत्यारोपणाला  बेकायदा ठरवण्यात आले आणि असंबंधित  प्रत्यारोपणावर निर्बंध आणणे अपेक्षित होते. मात्र या कायद्यामुळे अवयवांचा व्यापार थांबला नाहीच आणि मेंदू मृत झालेल्या स्थितीत अवयवदान करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली नाही. ‘ब्रेन डेथ’ या संकल्पनेला कधीच प्रोत्साहन दिले गेले नाही किंवा त्याचा व्यापक प्रमाणावर  प्रचारही झाला नाही. दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अभ्यासानुसार, यापैकी ६५ टक्के लोकांच्या मेंदूला मार लागलेला असतो. याचाच अर्थ ९० हजार लोक ब्रेन डेथचे असू शकतात. 


असे नाही की, भारतात लोक अवयवदान करू इच्छित नाहीत. मात्र ब्रेन डेथचे रुग्ण ओळखणे आणि त्यांचे प्रमाणीकरण करण्याची  कोणतीही यंत्रणा रुग्णालयांकडे नाही. मेंदू मृत झाल्याच्या स्थितीमध्ये यकृत, हृदय, फुप्फुस, मूत्रपिंड, आतडे असे महत्त्वाचे अवयव, कॉर्निया, हृदयाचे व्हॉल्व्ह, त्वचा, हाडे, अस्थि, शिरा, नस यांसारख्या पेशी दान करता येतात. अवयवांना वस्तू बनवणे हा सामाजिक, नैतिक मूल्यांचा ऱ्हास आहे आणि सभ्य समाजात अवयवांची गरज पूर्ण करण्यासाठी हा पर्याय स्वीकारता येणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेने अवयवांच्या विक्रीबाबत स्पष्टपणे म्हटले आहे की मानवी हक्कांच्या सार्वभौमिक जाहीरनाम्याबरोबरच स्वत:च्या संविधानाचे हे उल्लंघन आहे. शरीर आणि त्याचे अवयव वाणिज्यिक व्यवहाराचा विषय होऊ शकत नाहीत. त्यानुसार अवयवांसाठी पैशांच्या देवाणघेवाणीचा निषेध करायला हवा. अवयवदानासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. यात नागरी समाज, धार्मिक नेते आणि अन्य हितधारकांनी सहभागी होणे आवश्यक आहे.


- समीर गायकवाड
sameerbapu@gmail.com

बातम्या आणखी आहेत...