आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: पाऊसमानाचा पॅटर्न!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मान्सून’ हा तसा जिव्हाळ्याचा विषय, मात्र सध्याच्या माहितीच्या युगात त्याच्या भाकितांवर बरीच उलटसुलट चर्चा रंगत असते. येत्या मान्सूनविषयी अाश्वासक अंदाज ‘अायएमडी’ने वर्तवला अाणि दीर्घकालीन सरासरीच्या ९५ टक्के पाऊसमान राहील असे संकेत दिले. थाेडक्यात सांगायचे तर हा मान्सून समाधानकारक स्वरूपाचा राहील असे अभिप्रेत अाहे.

 

खरेच देशभर समाधानकारक पाऊस हाेईल का, या प्रश्नाचे उत्तर निश्चितच ‘नाही’ असेच मिळेल. यासंदर्भात मुंबईतील ‘अायअायटी’ने ११२ वर्षांच्या नाेंदींचा अभ्यास केला अाणि पावसाचा पॅटर्न बदलल्याचे सिद्ध केले. देशातील ६४० पैकी २३८ जिल्ह्यांत ही स्थिती निदर्शनास अाली अाहे. म्हणजेच पावसाचा पॅटर्न बदलल्याने सरासरी लाभदेखील कमी हाेणार हे निश्चित. हवामान खाते असाे किंवा स्कायमेट, भेंडवळ या सगळ्यांचे काही अाडाखे असतात, एक माॅडेल किंबहुना प्रतिमान ते समाेर ठेवतात. अर्थातच त्यात काही प्रमाणात बदल गृहीत असतातच. त्यामुळे अधिक तपशिलात जाऊन पावसाची व्याप्ती किंवा प्रमाण याविषयी काेणीही ठाेस काही सांगू शकत नाही. सध्या वाढत असलेल्या उन्हाच्या झळांच्या पार्श्वभूमीवर अालेली ही हळुवार झुळूक म्हणता येईल इतकेच. वस्तुत: ढाेबळमानाने विचार करता हवामान खात्याचा अंदाज साधारणपणे पाच वर्षांतून एकदा सरासरीच्या जवळपास पाेहाेचताना दिसताे.

 

उदाहरणच घ्यायचे तर २००८ मध्ये मान्सूनविषयी वर्तवलेला अंदाज बराेबर ठरला हाेता. त्यानंतर गेल्या वर्षी ताे नेमका खरा ठरला. गेल्या २० वर्षांत पावसाचा पॅटर्न बराच बदललेला अाहे. साधारणपणे ५० वर्षांतील अाकडेवारी तपासून पाहिली तर सलग दाेन वर्षांपेक्षा अधिक काळ असमाधानकारक पाऊस जसा दिसत नाही तसेच सलग तीन वर्षे चांगला पाऊस झाल्याचेही दिसून येते. येत्या १५ मेच्या अासपास ‘अायएमडी’, ‘स्कायमेट’चा अंदाज मांडला जाणार अाहे. त्यातून अनेक बाबी स्पष्ट हाेतील. 


मान्सून वेळेवर अाला अाणि समाधानकारक बरसला तर खरिपाला त्याचा फायदा हाेऊ शकताे. कारण या वर्षी महाराष्ट्रासह देशभरातील बहुतेक ठिकाणच्या साठ्यातील पाणी अाटलेले दिसते. मार्चपासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या अाणि अाता तर तापमानाचा पारा अधिकाधिक वाढत चालला अाहे. गेल्या वर्षी साऱ्या देशाला समाधानकारक पावसाची अपेक्षा असताना ताे ६४० जिल्ह्यांचे समाधान करू शकला. उर्वरित ३८% भारताला दुष्काळाचे चटके साेसावे लागले.

 

अाॅक्टाेबर २०१७ पासूनच देशातील ४०४ जिल्ह्यांत पाणीटंचाई उग्र हाेत असताना पाहायला मिळाली. एकंदर पर्जन्यमानाचे स्वरूप असे असताना केंद्रीय कृषी सचिव एस. के. पटनायक यांनी या वर्षी अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन हाेणार असल्याचे धाडसी विधान केले. चांगला पाऊस अाणि विक्रमी उत्पादन म्हणजे शेतकरी सुखावताे असे नव्हे. कारण गेली दाेन वर्षे शेतकरी वर्ग अनेकविध कारणांनी त्रासलेला दिसताे अाहे. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे शेतमालाचे उत्पादन वाढले, मात्र बाजारपेठेत किमतीत घसरण सुरू राहिली. परिणामी शेतकऱ्याला किमान वाजवी माेबदला मिळू शकला नाही. दुसरे म्हणजे साठवणुकीसाठी सुस्थितीतील गाेदामांची सुविधा नाही. २०१५, २०१६ मध्ये फारसा पाऊस झाला नव्हता, परंतु २०१७ च्या पाठाेपाठ अाता २०१८ मध्ये समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत अाहे. अाता यापुढे जाऊन त्याचा फायदा २०१९ च्या निवडणुकीत हाेईल, असेही भाकीत राजकीय हवामानतज्ज्ञांकडून वर्तवले गेले तर अाश्चर्य वाटायला नकाे. 


महाराष्ट्राचा विचार करता राज्यातील ८२ टक्के शेती लहरी पावसावर अवलंबून अाहे. राज्यातील धरणांची पाणी साठवण क्षमता ६० हजार दशलक्ष घनमीटर इतकी असली तरी १० लाख हेक्टर जमिनीवर ऊस पिकवला जाताे. त्यामुळे अन्य पिकांना जीवदान देण्यापुरतेदेखील सिंचन करायला पाणी उपलब्ध हाेत नाही ही वस्तुस्थिती अाहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्याच्या सिंचन क्षेत्रात फारसा बदल न करता ‘जलयुक्त शिवार’ अाणि मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे देण्याची भूमिका स्वीकारली. त्यामुळे अाेढे, नद्यांचे रुंदीकरण अाणि खाेलीकरण सुरू झाले असले तरी हा उपाय दीर्घकाळ टिकणारा नाही. उसाच्या लागवडीखालील शेतजमीन कमी करणे, अन्य पिकांनाही सिंचनाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे यास पर्याय नाही हे तितकेच खरे!

 

श्रीपाद सबनीस

बातम्या आणखी आहेत...